हात आमचे दगडाखाली
बोलायची झाली चोरी
आम्ही दिली दुसर्याच्या हाती
आमच्या अस्तित्वाची दोरी
नको ते उपकार घेतले
झोळी आम्ही भरून घेतली
आज तीच लाचारी आमच्या
सार्या हक्कांवरती बेतली
गुलामीचे जीवन जगतो
अब्रू घालवली सारी
आम्ही दिली दुसर्याच्या हाती
आमच्या अस्तित्वाची दोरी
पश्चात्ताप होतोय आम्हाला
पण सांगू कसे कुणाला
या सार्याची खंत माहित
आहे आमच्या मनाला
स्वार्थ साधला असला तरी
मनाला येईना उभारी
आम्ही दिली दुसर्याच्या हाती
आमच्या अस्तित्वाची दोरी
वाटते आम्हालाही बोलावे
मत आमचे व्यक्त करावे
झाल्या चुकांची मागून माफी
सहकाऱ्यांचे पाय धरावे
पण चुगल्या करून बरबटलो
विश्वास न कोणी करी
आम्ही दिली दुसर्याच्या हाती
आमच्या अस्तित्वाची दोरी
स्वार्थ साधला दोन घडीचा
भोग मात्र आयुष्यभराचे
माणूस असलो आम्ही तरीही
जगतो जीवन जनावराचे
सत्यासाठी लढणाऱ्यांचे
लढे उध्वस्त करी
आम्ही दिली दुसर्याच्या हाती
आमच्या अस्तित्वाची दोरी
आमच्यासारखे असंख्य लाचार
आहेत अवतीभवती
म्हणूनच तर सामान्यजनांच्या
जीवनाची झाली माती
आदेशाचे गुलाम आम्ही
पाप्यांची करी चाकरी
आम्ही दिली दुसर्याच्या हाती
आमच्या अस्तित्वाची दोरी
✒ K. Satish