Monday, November 15, 2021

स्वप्नातले स्वप्न

स्वप्नातं येऊनी तू

का स्वप्नं दाविले मला,

देऊन हात हाती

का सांग भुलवले मला 


रेशीमगाठ ऐसी

प्रेमाची बांधूनी तू ,

का ओलेचिंब केले

या कोरड्या जीवाला 


स्वप्नातले हे स्वप्नं

वाटे हवेहवेसे,

फुटली ती पालवी बघ

कोमेजल्या मनाला 


आता हवीस मजला

प्रत्यक्ष तू समोरी,

तुजविन अर्थ नाही

आता या जीवनाला

K. Satish



Sunday, November 14, 2021

व्यथा बालमनांची

नाजूक अन् कोवळी आम्ही छोटी मुले

सगळे म्हणती आम्हा देवाघरची फुले


वय असते आमुचे खेळण्या बागडण्याचे

खाऊ खाण्याचे अन् मस्ती करण्याचे


हळूहळू घ्यायचेच असते आम्हालाही शिक्षण

पण धिंगा मस्ती करणे हेच खरे आमचे लक्षण


पुस्तकांच्या ओझ्याखाली जर दबले आमचे बालपण

तर तुम्हीच सांगा होईल कसे चांगले आमचे संगोपन


बरेचदा ह्या ओझ्याखाली मान आमची मोडते

शाळेत जातो की व्यायामशाळेत हे कोडे आम्हाला पडते


थकलेल्या शरीराने जाऊन बसतो वर्गात

असंख्य प्रश्नांचे वादळ उठते आमच्या बालमनांत


ऊंच इमारतींच्या शाळा बांधून साध्य तुम्ही काय केले

मैदानविरहित शाळांनी फक्त अभ्यासू कीडेच घडविले


सर्वांगीण विकास महत्त्वाचा, अभ्यास म्हणजे सर्वस्व नव्हे

मार्कांच्या शर्यतीत ढकलण्यापेक्षा आमच्यातील गुण हेरायला हवे


अपेक्षांचे ओझे तुमचे असह्य होते आम्हाला

याचे दुष्परिणाम कदाचित भोगावे लागतील देशाला


नाजूक ह्या शरीरांवरचा भार कमी करा

विकासाचे गणित तुम्ही पहा बदलून जरा


कौशल्य आमच्या अंगीचे जाणून घ्या गांभीर्याने

नव्या युगाची सुरूवात होऊद्या महासत्तेच्या पर्वाने...


बालपणीचा आनंद लुटलेल्या पिढीचे अभिनंदन 

व बालपणीचा आनंद लुटण्यासाठी

उत्सुक असलेल्या पिढीला त्यांची इच्छा पूर्ण होवो ही सदिच्छा...!!!

   बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

K. Satish




Tuesday, November 9, 2021

नाव जीवनाची

नाव जीवनाची
घेई ती हेलकावे,
पाय रोवूनी मी
अजूनी उभाच आहे 

आल्या असंख्य लाटा
कठीण प्रसंगांच्या,
थोपवूनी त्यांना
पुढे मी जात आहे 

भावभावनांच्या
वार्‍याचे ते तडाखे,
अविरत सोसूनीही
हर्षाने गात आहे 

आस किनार्‍याची
कधीच नव्हती मजला,
इतरांच्या होड्यांना
आधार देत आहे 

नाव अशी ही माझी
झाली जरी हो जीर्ण,
ज्ञानाने सजवण्याची
उर्मी मनात आहे
✒ K.Satish


Friday, October 29, 2021

सूर्य

किती झाकला तो सूर्य

तरी तेज ना लपावे,

तेजातूनी मग त्याच्या

काळोख दूर व्हावे 


भीती किती ती वाटे

अंधारमय जगाची,

भय दूर सारण्याला

हवी साथ त्या रवीची 


सौंदर्य या धरेचे

आहे विलोभनीय,

पण ते दिसावयाला

हवाय आम्हा सूर्य 


किरणे त्या भास्कराची

जगवी असंख्य जीवं,

करी अवनीचे तो रक्षण

दिनकर त्याचे नावं

✒ K. Satish




Wednesday, October 20, 2021

विश्वासघात

आर्थिक लाभाच्या मोहापायी

विश्वास कधी गमावू नका,

विश्वास टाकणार्‍याला तुम्ही

अगदीच फाडून खाऊ नका


विश्वासाने दिलेला असतो

त्याने तुम्हास मदतीचा हात,

ठेवा जाणीव उपकाराची

करू नका तुम्ही त्याचा घात


स्वार्थ तुमचा दोन घडीचा

नीच बनण्या भाग पाडतो,

उरल्या सुरल्या माणुसकीला

पुरता जमिनीमध्ये गाडतो


कर्तृत्व स्वतःच्या अंगी बाळगा

दुसर्‍याच्या जीवावर खाऊ नका,

फसवणूक तुम्ही कराल एकदा

मिळणार नाही दुसरा मोका

✒ K. Satish



Friday, October 8, 2021

मुर्दाड त्या मनांना

मुर्दाड त्या मनांना

चैतन्य येत नाही,

ते मृत आहे आता

त्यांच्यातं प्राण नाही 


गुलामीचे विषाणू

अंगी भिनले इतके,

की हक्क मागण्याची

तळमळ कुणातं नाही 


स्वार्थी झाले सगळे

स्वतःपुरतेच जगणे,

शोषितांचे अश्रू

पुसण्या उसंत नाही 


अन्याय होतो जेव्हा

स्वतःवरी मग तेव्हा,

शोधीतं क्रांतिकारक

फिरती दिशा ते दाही 


लढणार नाही आम्ही

पण लाभ हवा आम्हा,

असेच आहो आम्ही

आम्हास लाज नाही 


क्रांतिकारी जन्मो

पण घरी दुसर्‍याच्या,

घाव सोसण्याची

ताकद आम्हातं नाही

✒ K. Satish





Wednesday, September 22, 2021

खरी संपत्ती

पैसा असूनी अगणित तरीही

दुःख ना त्याला चुकले आहे,

सुख शोधी जो पैशामध्ये

भ्रमात जीवन जगतो आहे


बुद्धी ज्याची तल्लख अन् जो

वेळेचा सदुपयोग करी,

जोडीला आरोग्य ते उत्तम

तो दुःखावर मात करी


गुंतवणूक ती खूपच सुंदर

जेथे ज्ञानार्जन होई,

क्षणाक्षणाचे मोल जाणूनी

निरोगी तनाला महत्त्व येई


बुद्धी, वेळ अन् उत्तम स्वास्थ्य

हीच खरी संपत्ती आहे,

दुय्यम आहे पैसा त्याचे

सुख हे तर क्षणभंगुर आहे

✒ K. Satish



Sunday, August 29, 2021

एकच प्याला

एकच प्याला म्हणून म्हणून

लागला बाटली रिजवू तो,

मस्तीमध्ये पीता पीता

व्यसनी होऊ लागला तो


मौजमजा अन् मस्तीचे

तरूणाईचे वय ते होते,

सळसळ होती रक्तामध्ये

भय कशाचेही वाटत नव्हते


हळूहळू दारूने त्याला

इतका विळखा घातला की,

तिच्याविना करमेना त्याला

प्रेयसी झाली त्याची ती


धुंद होऊनी तिच्यामध्ये तो

अखंड डुंबून गेला होता,

तिच्याविना जगण्याचा जणूकाही

विसरच त्याला पडला होता


सरकू लागले आयुष्य पुढे अन्

त्याला आता ती पिऊ लागली,

रक्तामध्ये भिनूनी त्याला

मरणाच्या दारी नेऊ लागली


मजेत घेतलेल्या प्याल्याची

किंमत मोठी मोजली त्याने,

सुंदर असे आयुष्य संपविले

दारुच्या त्या व्यसनाने...

✒ K. Satish



Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts