Friday, October 29, 2021

सूर्य

किती झाकला तो सूर्य

तरी तेज ना लपावे,

तेजातूनी मग त्याच्या

काळोख दूर व्हावे 


भीती किती ती वाटे

अंधारमय जगाची,

भय दूर सारण्याला

हवी साथ त्या रवीची 


सौंदर्य या धरेचे

आहे विलोभनीय,

पण ते दिसावयाला

हवाय आम्हा सूर्य 


किरणे त्या भास्कराची

जगवी असंख्य जीवं,

करी अवनीचे तो रक्षण

दिनकर त्याचे नावं

✒ K. Satish




Wednesday, October 20, 2021

विश्वासघात

आर्थिक लाभाच्या मोहापायी

विश्वास कधी गमावू नका,

विश्वास टाकणार्‍याला तुम्ही

अगदीच फाडून खाऊ नका


विश्वासाने दिलेला असतो

त्याने तुम्हास मदतीचा हात,

ठेवा जाणीव उपकाराची

करू नका तुम्ही त्याचा घात


स्वार्थ तुमचा दोन घडीचा

नीच बनण्या भाग पाडतो,

उरल्या सुरल्या माणुसकीला

पुरता जमिनीमध्ये गाडतो


कर्तृत्व स्वतःच्या अंगी बाळगा

दुसर्‍याच्या जीवावर खाऊ नका,

फसवणूक तुम्ही कराल एकदा

मिळणार नाही दुसरा मोका

✒ K. Satish



Friday, October 8, 2021

मुर्दाड त्या मनांना

मुर्दाड त्या मनांना

चैतन्य येत नाही,

ते मृत आहे आता

त्यांच्यातं प्राण नाही 


गुलामीचे विषाणू

अंगी भिनले इतके,

की हक्क मागण्याची

तळमळ कुणातं नाही 


स्वार्थी झाले सगळे

स्वतःपुरतेच जगणे,

शोषितांचे अश्रू

पुसण्या उसंत नाही 


अन्याय होतो जेव्हा

स्वतःवरी मग तेव्हा,

शोधीतं क्रांतिकारक

फिरती दिशा ते दाही 


लढणार नाही आम्ही

पण लाभ हवा आम्हा,

असेच आहो आम्ही

आम्हास लाज नाही 


क्रांतिकारी जन्मो

पण घरी दुसर्‍याच्या,

घाव सोसण्याची

ताकद आम्हातं नाही

✒ K. Satish





Wednesday, September 22, 2021

खरी संपत्ती

पैसा असूनी अगणित तरीही

दुःख ना त्याला चुकले आहे,

सुख शोधी जो पैशामध्ये

भ्रमात जीवन जगतो आहे


बुद्धी ज्याची तल्लख अन् जो

वेळेचा सदुपयोग करी,

जोडीला आरोग्य ते उत्तम

तो दुःखावर मात करी


गुंतवणूक ती खूपच सुंदर

जेथे ज्ञानार्जन होई,

क्षणाक्षणाचे मोल जाणूनी

निरोगी तनाला महत्त्व येई


बुद्धी, वेळ अन् उत्तम स्वास्थ्य

हीच खरी संपत्ती आहे,

दुय्यम आहे पैसा त्याचे

सुख हे तर क्षणभंगुर आहे

✒ K. Satish



Sunday, August 29, 2021

एकच प्याला

एकच प्याला म्हणून म्हणून

लागला बाटली रिजवू तो,

मस्तीमध्ये पीता पीता

व्यसनी होऊ लागला तो


मौजमजा अन् मस्तीचे

तरूणाईचे वय ते होते,

सळसळ होती रक्तामध्ये

भय कशाचेही वाटत नव्हते


हळूहळू दारूने त्याला

इतका विळखा घातला की,

तिच्याविना करमेना त्याला

प्रेयसी झाली त्याची ती


धुंद होऊनी तिच्यामध्ये तो

अखंड डुंबून गेला होता,

तिच्याविना जगण्याचा जणूकाही

विसरच त्याला पडला होता


सरकू लागले आयुष्य पुढे अन्

त्याला आता ती पिऊ लागली,

रक्तामध्ये भिनूनी त्याला

मरणाच्या दारी नेऊ लागली


मजेत घेतलेल्या प्याल्याची

किंमत मोठी मोजली त्याने,

सुंदर असे आयुष्य संपविले

दारुच्या त्या व्यसनाने...

✒ K. Satish



Tuesday, August 10, 2021

प्रगतीचे सूत्र

मुर्खांच्या त्या गराड्यात तो

हर्षित झाला स्तुती ऐकूनी,

कटू सत्य जो दाविल त्याला

दुर्लक्षिले मग शत्रू समजूनी 


अधोगतीचे कारण त्याच्या

ठरली त्याची हीच ती कृती,

स्तुतीपायी मुर्खांच्या झाला

राजाचा कंगालपती 


बुद्धिमान बोले कटू शब्द

असे ते आपल्या कामाचे,

मुर्खांची वाहवा मिळवणे

लक्षण असे दुर्भाग्याचे 


बालिश चमचे स्तुती करूनी

स्वार्थ साधती स्वतःचा,

विद्वानांच्या द्वेषापोटी

कान भरवती ते तुमचा 


म्हणूनच माझे एकच सांगणे

क्षणिक सुखाची आस नसावी,

विद्वानांच्या कटू शब्दांची

प्रगतीसाठी साथ असावी

✒ K. Satish



संसाराचे पहिले पान

विस्कटलेले केस मी

विंचरूनी घेतले,

जेव्हा माझ्या सजनाला मी

येताना बघितले 


दारी येता बेल वाजली

आनंदाने न्हाले मी,

सुखद क्षणाच्या जाणिवेने

हर्षित होऊन गेले मी 


धडधड होतंय काळीज माझं

समोर त्यांच्या जाताना,

नव्या नव्या या संसाराचे

पहिले पान उलटताना 


दार उघडता समोर ते अन्

त्यांच्यासमोर होते मी,

आलिंगन देऊनी तयांना

त्यांच्या कवेत गेले मी 


नव्या नव्या या संसाराची

सुखद अशी ही पहिली पाने,

सतत रहावी स्मरणी माझ्या

रिक्त न व्हावे प्रेम रकाने

✒ K. Satish



Saturday, August 7, 2021

वस्ती माझ्या बालपणीची

माझे जन्मठिकाण होती

एक छोटीशी वस्ती,

तिथल्या एकजुटीसमोर

झुकती मोठ्या मोठ्या हस्ती


दोनशे अठ्ठ्याऐंशी कुटुंबांचा

संसार तेथे चाले,

गुण्यागोविंदाने नांदत होते

सगळ्याच धर्मावाले


आजच्याइतके पैशाला

महत्त्व तेव्हा नव्हते,

दुसर्‍याचे दुःख प्रत्येकजण

स्वतःचेच समजत होते


मोबाईलचे जाळे नव्हते

पैशाचा तो अहंकार नव्हता,

तरबेज असा कबड्डीपटू

प्रत्येक घराघरामध्ये होता


आट्यापाट्या, लपंडाव अन्

शिरापुरीचा खेळही चाले,

बोरीबनातून फळे तोडण्या

पार करी मुले नदी अन् नाले


भांडण होई सार्वजनिक अन्

सगळेच त्याचे साक्षीदार असे,

चित्रपटालाही लाजवील

अशी दृश्ये नेहमीचं दिसे


कामावर जर गेला तरीही

नसे काळजी घरच्यांची,

दुखले खुपले कोणाचे तर

होतसे गर्दी इतरांची


भय नव्हते कधी चोरांचे अन्

दुःख नसे कमी पैशांचे,

राजमहाल तो आमच्यासाठी

घर आमचे दोन खोल्यांचे


तिथेच झालो शिकूनी मोठे

धडे घेतले माणुसकीचे,

अजूनही आठवती क्षण तिथले

आनंदाचे, एकजुटीचे


धकाधकीच्या जीवनात या

आठवण येई जुन्या क्षणांची,

म्हणूनच आठवी क्षणाक्षणाला

वस्ती माझ्या बालपणीची

✒ K. Satish





Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts