Wednesday, July 29, 2020

पहाट

पहाट झाली चैतन्याचे
क्षण हे झाले सुरू,
ध्यानधारणा योगा करूनी
मन प्रफुल्लित करू

मंद मंद तो वारा वाहे
चोहीकडे पक्ष्यांची किलबिल,
पहाट असते सुखदायी किती
नसते मनात कसली चिलबिल

कोणी करती मंत्रोच्चारण
कोणी सुंदर फुले वाहती,
पूजाअर्चा करूनी कोणी
परमात्म्याला समीप पाहती

निसर्ग सुंदर भासतो जेव्हा
पहाट होते पृथ्वीतलावर,
नवउर्जेची उधळण होते
दमलेल्या मानव देहावर

पृथ्वीचे सौंदर्य ते लाघवी
निसर्गात सामावले आहे,
परंतु, त्याची खरी अनुभूती
पहाटेच्या त्या क्षणात आहे

                   ✒ K. Satish

Tuesday, July 21, 2020

श्रेष्ठत्व निसर्गाचे

निसर्ग पाहतो आहे परीक्षा
क्षणाक्षणाला मनुष्याची,
श्वासागणिक सुरू ती आहे
धडपड आता जगण्याची

जीवनचक्र बदलून गेले
सारे अगदी हतबल झाले,
ऐटीत फिरणारे मानव ते
नियम अटींमध्ये जखडून गेले

सवयच नव्हती मानवास ती
अशा अकल्पित जगण्याची,
परंतु आता वेळ ही आली
जीवन रीत  बदलण्याची

संकट पहिले संपत नाही
तोवर दुसरे समोर येती,
सर्वश्रेष्ठ निसर्गच आहे
हे सर्वांना सांगूनी जाती

या सर्वातून धडा तो घ्यावा
मनुष्यप्राणी शहाणा व्हावा,
बदलूनी जीवनशैली जपावा
निसर्गाचा हा अमूल्य ठेवा
✒ K. Satish



Saturday, July 18, 2020

डोक्यावरचा चंद्र


चाळीशी सरली
केसं पिकू लागली,
काळीभोर केसं आता
पांढरी होऊ लागली

घनदाट जंगल होते
एके काळी केसांचे,
केस विंचरता विंचरता
कंगव्याचे दातही तुटायचे

मिथुन-अमिताभची स्टाईल मारून
मधून भांग पाडायचो,
आमच्या केसांवरती आम्ही
भलतेच प्रेम करायचो

घनदाट होते केस आता
विरळ होऊ लागले,
सौंदर्याला आमच्या आता
ग्रहण लागू लागले

सर्वांनाच वाटते आपण
नेहमी तरूण दिसावे,
तरूणांसारखेच घनदाट केस
आपल्यालाही असावे

आम्हा बापड्यांची कीव आता
विज्ञानालाही आली,
केशरोपणाची नवी श्रृंखला
आता सुरू जाहली

मन तर होते तरूणच आता
केसंही झाले घनदाट,
चंद्र झाकला डोक्यावरचा
वाढला आमचाही थाट

                          ✒ K. Satish





Thursday, July 16, 2020

संकटाने शिकवला अर्थ जीवनाचा

पृथ्वीतलावर धुमाकूळ घातला
या कोरोना व्हायरसने,
क्षणात झाले कमी प्रदूषण
या विचित्र संकटाने


वाईट गोष्टींमधूनही काही
चांगले घडतच असते हो,
परंतु चांगल्या घटनांकडे
लक्षच आपले नसते हो


पैसा पैसा करणार्‍यांना
महत्त्व आता कळले जीवाचे ,
नव्हता वेळ कुटुंबासाठी
सर्वस्व झाले कुटुंब त्यांचे


पैशाचाही माज उतरला
अर्थ खरा जीवनाचा कळला,
ऐशआराम त्यागूनी जो तो
साधेपणाने जगू लागला


बंदिस्त झाला मानव सारा
किलबिल पक्ष्यांची कानी पडली,
संहारक मानवजातीला
विषाणूंची ताकद भारी पडली


संकट आले निघूनही जाईल
कालचक्र हे फिरवूनी जाईल,
भ्रमात जगणार्‍या मानवाला
अर्थ जीवनाचा शिकवूनी जाईल


✒ K. Satish



Sunday, July 12, 2020

सावध होऊ - घरात राहू

मानवांच्या भल्यासाठी
घरीच राहणे करा पसंत,
धकाधकीच्या जीवनातूनी
घ्या थोडी तुम्ही उसंत

निरनिराळे साहित्य वाचण्या
वेळ आहे तुम्हा मिळाला,
मुलेही असती सोबत तुमच्या
भरवा त्यांची घरीच शाळा

नव्या नव्या या संकटाने
सर्वांनाच शहाणे केले,
एककल्ली कुटुंब सारे
क्षणार्धात एकत्र आले

बिकट परिस्थिती आहे बाहेर
घरीच तुमचे विश्व उभारा,
वेळ घालवा आनंदाने
स्वच्छतेचेही पालन करा

हिंडणे, फिरणे, पर्यटनाला
थोडी आवर घालूया,
घरात राहूनी आनंदाने
      युद्ध हे आपण जिंकूया...!!!

                              ✒ K. Satish




Friday, July 10, 2020

व्हायरस

विज्ञानाच्या युगात या
असंख्य व्हायरस जन्मास येतील,
काही सौम्य तर काही तीव्र
काही जीवघेणेही ठरतील

भीती पसरवणे चुकीचे आहे
भीती बाळगणेही चुकीचे आहे,
स्वच्छता आणि सावधगिरी बाळगणे
हाच खरा उपाय आहे

चुकीचा प्रसार करूनी झाला
कित्येकांचा संसार उद्ध्वस्त,
लाखमोलाचा पोल्ट्री व्यवसाय
क्षणार्धातच झाला स्वस्त

परिस्थितीचा फायदा घेऊन
अनेकांनी जनतेला लुटले,
सॅनिटायझर्सचा झाला तुटवडा
सगळे मास्क घेतच सुटले

तंत्रज्ञान चांगलेच आहे
त्याचा चांगलाच वापर करूया,
सृष्टीला वाचवण्यासाठी
सत्याचाच प्रसार करूया

सार्स, स्वाईन फ्ल्यू, कोरोना हे तर
नावाला व्हायरस आहे,
मानवासाठी मानवाची वृत्तीच
अतिजीवघेणी ठरत आहे

स्वच्छता आणि निगा राखूनी
बळकटी आणू शरीराला,
धैर्याने सामोरे जाऊ
नव्या नव्या या रोगाला

                       ✒ K. Satish






Tuesday, July 7, 2020

कोरोना

आपत्ती ही आली जगावरी
आपल्यावरही आली ना,
छळछळ छळतेय सार्‍यांना ही
नाव तिचे हो कोरोना

छोटे रूप पण अतिभयंकर
जग हैराण हे झाले ना,
महासत्तेच्या देशालाही
तिने हैराण हो केले ना

सुखसुविधा असलेले देश ते
पुरते हतबल झाले ना,
गांभीर्याने बघा तिच्याकडे
जीवन अवघड झाले ना

देश आपुला वाचवण्याला
साथ हवी सर्वांची ना,
कोरोनाची साखळी तोडण्या
कडक नियमही पाळू ना

थोडा त्रास हो घ्या सर्वांनी
मानवजात ही वाचवू ना,
देशभावना मनी बाळगूनी
देशासाठी लढूया ना

लढा असा हा बिनशस्त्रांचा
सावधगिरीने वागूया ना,
स्वच्छतेच्या त्या अस्त्राला हो
घाबरते ती कोरोना

शिस्त पाळूनी नियमही पाळू
शासनास बळ देऊया ना,
कर्तव्याला जागूनी आपण
संपवू शत्रू ही कोरोना 

                      ✒ K. Satish



Monday, July 6, 2020

एका व्हायरसनं दिली जगा नवी दृष्टी

बाधित केले जग सारे
बाधित केली सृष्टी,
एका व्हायरसनं दिली
जगा नवी दृष्टी

चीनमध्ये जन्मला तो
जगातं पसरला,
धर्म पाहून डसायला
पुरता तो विसरला

त्याच्या हाहाकारानं
मानवं झाला कष्टी,
एका व्हायरसनं दिली
जगा नवी दृष्टी

गरीब आणि श्रीमंतही
त्यानं नाही सोडला,
मानवाचा अहंकारं
क्षणांत हो मोडला

सगळ्या चाकरमान्यांनं
गाठली आपली घरटी,
एका व्हायरसनं दिली
जगा नवी दृष्टी

संकटाला तोंड देण्या
डाॅक्टरं तो आला,
पोलिस, सैनिक आला
सलाम त्यांच्या कर्तव्याला

त्यांच्यामुळेच जगतोय आपण
झाली याची पुष्टी,
एका व्हायरसनं दिली
जगा नवी दृष्टी

                      ✒ K. Satish


Sunday, July 5, 2020

अमूल्य ठेवा मैत्रीचा

आयुष्यामध्ये प्रत्येकाला 

मित्रांचा सहवास हवा,

कारण त्यांच्या सोबत असता

अंगात भरतो जोश नवा


असेच होते मित्र सहा ते

एकमेकांचे जीव की प्राण,

सुखदुःखांचे वाटेकरी ते

मैत्री त्यांची होती महान


काळामागून काळ उलटला

सर्वांनी संसार थाटला,

कित्येक वर्षे होऊन गेली

कोणी एकमेका न भेटला


अशीच अचानक एकेदिवशी

भेट जाहली सर्वांची,

जाणीव सार्‍यांना होऊ लागली 

पुन्हा आपल्या तारूण्याची


अचानक एकमेकांना भेटून

सगळे हर्षोल्हासित झाले,

बर्‍याच दिवसानंतर सगळे

आनंदाने न्हावून गेले


संसाराचा गाडा हाकताना

सगळेच हैराण होऊन जातात,

मित्रांसोबतचे काही क्षण

अगणित आनंद देऊन जातात


एकांतामध्ये सर्वांना दिसतो

जीवनातला त्रासच त्रास,

पण मित्रांच्या सोबत असता

होतो सर्व दुःखांचा नाश


क्षणभर झालेल्या भेटीमधूनही

सर्वांना मिळाला आनंद नवा,

जीवनात सर्वांनीच जपावा

   अमूल्य असा मैत्रीचा ठेवा...

✒ K. Satish







माझा कवितासंग्रह

कळले नाही मला 
हे शब्द कसे आले,

लिहीत गेलो हळूहळू
अन् काव्य पूर्ण झाले.

शांतपणे बसता 
डोळे मिटून गेले,

स्मृतीमधील काही जुने 
क्षण जागे झाले.

आठवूनी त्यांना 
मग शब्दधागा विणला,

अशाप्रकारे माझा 
कवितासंग्रह बनला.
                     
K. Satish


Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts