Friday, March 3, 2023

२५ वर्षे ५० लाख, टाटांचा प्रतिस्पर्ध्यांना धाक

दूरदृष्टी टाटा समूहाची

कष्टालाही नव्हते तोटे,

विश्वास ठेवूनी कर्मचाऱ्यांवरी

स्वप्न पाहिले होते मोठे


लावले २५ वर्षांपूर्वी

रोपटे त्यांनी असे अनोखे,

कार प्लान्टची केली निर्मिती

प्रतिस्पर्ध्यांचे वाढले ठोके


इंडिकाने सुरूवात जाहली

हळूहळू मग पाय रोवले,

यशापयशाचा स्वाद चाखूनी

स्थान आपुले भक्कम केले


२५ वर्षांनंतर आता

निरनिराळी वाहने टाटांची,

आधुनिक, सुंदर आणि भक्कम

पसंती त्यांना साऱ्या ग्राहकांची


५० लाख वाहनांचा टप्पा

एकजुटीने पूर्ण जाहला,

भाग्यवान आम्ही, आम्हाला

सहवास टाटा साहेबांचा लाभला

✒ K. Satish




Monday, February 27, 2023

कट्टरपंथी

कट्टरपंथी म्हणजे काय ?

गोगलगाय आणि पोटात पाय


स्वतःच्या समाजाला म्हणवती सर्वश्रेष्ठ

बाकी सगळे यांच्या नजरेत कनिष्ठ...

अहो कनिष्ठच नाही, तर

ताटात राहिलेलं खरकटं उष्टं


स्वतःच्या स्वार्थापोटी घेती

सामान्य जनतेचा आधार

स्वतः राहती शाबूत आणि

त्यांना करती जीवावर उदार


धर्मग्रंथातील सुवचनांचा

कधीच नसतो यांना लळा,

विध्वंसाला प्राधान्य देऊन

चिरून टाकतात निष्पापांचा गळा


भडकाऊ विधानांचे यांनी

प्रस्थ माजवले चोहीकडे,

तरूणाईचे रक्त तापले

तिला पडले धर्मवेडाचे कडे


या कड्याला दूर सारूनी

कास धरा मानवतेची,

आज जगाला गरज असे

शांतता, बंधुभाव आणि समतेची...

✒K. Satish




Monday, February 20, 2023

अविरत लढा

महान देश माझा

कुणी पोखरित आहे,

उघड्या नयनांनी हे

सारे पहात आहे


होते दुःख भयंकर

रागाने होतो लालं,

षंढासम तरीही

मी पहातच आहे


वाटे करावे बंड

या भ्रष्ट व्यवस्थेशी,

पण वाट पहा थोडी

मना सांगत आहे


किती काळं लोटला हा

तरी ना हे बदलले,

स्वातंत्र्य मिळूनही

सगळे गुलाम आहे


टप्पा जीवनाचा

अंतिम आला आहे,

लढा न्यायासाठी

अविरत द्यायचा आहे


हा लढा खूप मोठा

नाही दोन घडीचा,

भावी पिढीस मजला

प्रेरित करायचे आहे

✒ K. Satish





Wednesday, February 8, 2023

लग्नाची मागणी

मन हे जडले तुझ्यावरी

हातात हात तू देशील का ?

जन्मभराची साथ तू देण्या

सांग ना माझी होशील का ?

✒ K. Satish




Thursday, February 2, 2023

हसत जगावे जीवनात या

चमचम तारे जीवनातले

क्षण हे गेले विरून,

हसत जगावे जीवनात या

जगू नये हो झुरून 


जीवन ऐसी नाव की ज्याचा

प्रवास ऐसा होवे,

आनंद-दुःख, प्रेम-मत्सर अन्

यामध्ये हेवेदावे 


क्षण हे पुढे पुढे जगताना

मन ठेवावे तरूण,

हसत जगावे जीवनात या

जगू नये हो झुरून 


वार्धक्य हे कुणा न चुकले

सर्वांना ते येई,

काळानुसार जीवनातले

अनुभव देऊनी जाई 


कवटाळूनी आनंदी क्षणांना

दुःख टाकावे पुरून,

हसत जगावे जीवनात या

जगू नये हो झुरून 


बालपणीचे, तारूण्याचे

आणिक वार्धक्याचे,

जीवनातले टप्पे तीन हे

भिन्न भिन्न वळणाचे 


वार्धक्यानंतरही जगावे

मन प्रफुल्लित करून,

हसत जगावे जीवनात या

जगू नये हो झुरून

✒ K.Satish




Tuesday, January 17, 2023

स्वाभिमानी जगणे

अन्यायाला शरण न जावे

अन्यायाप्रती पेटून उठावे,

न्याय मिळो अथवा न मिळो

हक्कासाठी लढत रहावे 


हुजरेगिरी करूनी मिळाली

भीक जरी अनमोल किती,

त्याहून अगणित आनंद देते

स्वाभिमानाची महती 


त्रास नको पण सुख तर हवे

असे कसे होईल बरे,

आगीत तापल्यानंतरच

सोने घडते हेच खरे 


स्वार्थपूर्ण लाचारीचे जीवन

जगणे आता सोडून द्या,

मरण्याआधी स्वाभिमानाने

जगण्याचा तुम्ही आनंद घ्या

✒ K. Satish




लाटणे

पोळपाटावर फिरते ऐटीत

रोजचा त्याचा सराव,

कणकेला त्या आकार देई

लाटणे त्याचे नाव 


अन्नासाठी धडपडतो तो

मनुष्य रात्रंदिनी,

बनविती जेवण त्यांच्यासाठी

रोज साऱ्या गृहिणी 


भाजीसंगे पोळी शोभते

शोभत नाही पाव,

कणकेला त्या आकार देई

लाटणे त्याचे नाव 


धार नसे कसलीही याला

तरीही शस्त्र हे मोलाचे,

धाक दावण्या हे आवडते

हत्यार साऱ्या स्त्रियांचे 


परवान्याची गरज नसे

नसे खोल हो याचा घाव,

कणकेला त्या आकार देई

लाटणे त्याचे नाव 


किस्से याचे खूप मजेशीर

विविधतेने नटलेले,

दारूड्याचे डोके पाहिले

याच्यामुळेच फुटलेले 


काळजी घ्यावी जेव्हा हे असती

पत्नीच्या हातातं राव,

कणकेला त्या आकार देई

लाटणे त्याचे नाव 


महती याची मोठी आणिक

कार्यही याचे मोठेच हो,

शान असे स्वयंपाकघराची

जागा व्यापते छोटीच हो 


अस्तित्व याचे घराघरामध्ये

स्वयंपाकघर याचे गाव,

कणकेला त्या आकार देई

लाटणे त्याचे नाव

✒ K. Satish




Tuesday, January 3, 2023

साथ योग्य मार्गदर्शनाची

शिक्षणाचा बाजार चोहीकडे

नाही चिंता विद्यार्थ्यांची,

भविष्य त्यांचे घडो ना घडो

आस साऱ्यांना फक्त पैशांची 


त्रासून गेलो या साऱ्याला

देश हा माझा कुठे चालला,

भावी पिढीला कसे घडवावे

प्रश्न हा आमच्या मनास पडला 


अशात आशेचा किरण तो

दृष्टीस आमुच्या पडला हो,

भविष्य मुलांचे घडविण्याचा

ध्यास तो त्यांच्या मनास हो 


भाग्य आमुचे आम्हा मिळाली

साथ अशा या संस्थेची,

आचार्य ॲकॅडमी बारामती

जाणीव त्यांना कर्तव्याची 


विद्यार्थ्यांचे भवितव्य घडावे

जीवनास त्यांच्या महत्व यावे,

आचार्य ॲकॅडमीचे कार्य पाहूनी

इतरांनीही शहाणे व्हावे

✒ K. Satish




Tuesday, December 27, 2022

भयाण वास्तव

खर्‍या खोट्याचा मांडून बाजार

धर्मांधतेचा पसरविला आजार,

सारे नेते झाले बघा मालदार

बेरोजगारीनं पोरं झाली बेजार 


कष्टकरी घाम इथं गाळतो

त्याला लुटून नेता उजळतो,

क्षणाक्षणाला त्यांना तो छळतो

कष्टकऱ्याचा आत्मा इथं जळतो 


खोटं बोल पण रेटूनं बोल

सगळीकडे चाललाय मोठा झोल,

स्वातंत्र्य झालेय मातीमोल

क्रांतिकारकांचा संपलाय रोल 


सगळीकडे पैशाचा बोलबाला

सत्तेच्या धुंदीत नेता बघा न्हाला,

गुलाम समजतो हा जनतेला

हाच जनसेवक हे विसरून गेला 


अज्ञानी, गावगुंड नेते झाले

विद्वानांना गुलाम त्यांनी केले,

भ्रष्टाचाराचे साम्राज्य पुढे नेले

स्वतंत्र देशाचे वाटोळे केले 


यावर अंकुश कुणी ठेवायचा

तुम्हा-आम्हालाच निर्णय हा घ्यायचा,

शिक्षण, आरोग्य, रोजगारीच्या

विषयावरतीच सदैव भर द्यायचा 


भूलथापांना उडवूनी लावायचे

माणुसकीला प्राधान्य द्यायचे,

भ्रष्टाचारी, गावगुंड नेत्यांना

एकजुटीने अस्मान दावायचे

✒ K. Satish




Sunday, December 18, 2022

जगावे असे की...

दिस किती सरले
अन् दिस किती उरले
खरेच तुम्ही जगले
की मनातच झुरले
 
वाटते जपावा
आवडीचा तो छंद
पैसे कमावताना
आत्मभान झाले मंद
 
वाटे बागडावे
निसर्गाच्या कुशीतं
कधीच जुळले नाही
पण वेळेचे गणितं


ज्यांच्यासाठी इतकी
धडपड करीत होता
त्या कुटुंबासाठी
कधी वेळ देत नव्हता


पैसा अमाप आहे
आता रे तुजपाशी
पण मुले झाली मोठी
झुंज तुझी जगण्याशी


पैशापेक्षा श्रेष्ठ
शरीर, बुद्धी, वेळं
उमगले तर बसेलं
या जीवनाचा मेळं


एकच मानव जन्म
अन् नश्वरं शरीरं
जगावे मनमुरादं
अवघाची हा संसारं

✒ K. Satish






Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts