पोळपाटावर फिरते ऐटीत
रोजचा त्याचा सराव,
कणकेला त्या आकार देई
लाटणे त्याचे नाव
अन्नासाठी धडपडतो तो
मनुष्य रात्रंदिनी,
बनविती जेवण त्यांच्यासाठी
रोज साऱ्या गृहिणी
भाजीसंगे पोळी शोभते
शोभत नाही पाव,
कणकेला त्या आकार देई
लाटणे त्याचे नाव
धार नसे कसलीही याला
तरीही शस्त्र हे मोलाचे,
धाक दावण्या हे आवडते
हत्यार साऱ्या स्त्रियांचे
परवान्याची गरज नसे
नसे खोल हो याचा घाव,
कणकेला त्या आकार देई
लाटणे त्याचे नाव
किस्से याचे खूप मजेशीर
विविधतेने नटलेले,
दारूड्याचे डोके पाहिले
याच्यामुळेच फुटलेले
काळजी घ्यावी जेव्हा हे असती
पत्नीच्या हातातं राव,
कणकेला त्या आकार देई
लाटणे त्याचे नाव
महती याची मोठी आणिक
कार्यही याचे मोठेच हो,
शान असे स्वयंपाकघराची
जागा व्यापते छोटीच हो
अस्तित्व याचे घराघरामध्ये
स्वयंपाकघर याचे गाव,
कणकेला त्या आकार देई
लाटणे त्याचे नाव
✒ K. Satish