खर्या खोट्याचा मांडून बाजार
धर्मांधतेचा पसरविला आजार,
सारे नेते झाले बघा मालदार
बेरोजगारीनं पोरं झाली बेजार
कष्टकरी घाम इथं गाळतो
त्याला लुटून नेता उजळतो,
क्षणाक्षणाला त्यांना तो छळतो
कष्टकऱ्याचा आत्मा इथं जळतो
खोटं बोल पण रेटूनं बोल
सगळीकडे चाललाय मोठा झोल,
स्वातंत्र्य झालेय मातीमोल
क्रांतिकारकांचा संपलाय रोल
सगळीकडे पैशाचा बोलबाला
सत्तेच्या धुंदीत नेता बघा न्हाला,
गुलाम समजतो हा जनतेला
हाच जनसेवक हे विसरून गेला
अज्ञानी, गावगुंड नेते झाले
विद्वानांना गुलाम त्यांनी केले,
भ्रष्टाचाराचे साम्राज्य पुढे नेले
स्वतंत्र देशाचे वाटोळे केले
यावर अंकुश कुणी ठेवायचा
तुम्हा-आम्हालाच निर्णय हा घ्यायचा,
शिक्षण, आरोग्य, रोजगारीच्या
विषयावरतीच सदैव भर द्यायचा
भूलथापांना उडवूनी लावायचे
माणुसकीला प्राधान्य द्यायचे,
भ्रष्टाचारी, गावगुंड नेत्यांना
एकजुटीने अस्मान दावायचे
✒ K. Satish