तुमच्या सेवेसाठी अविरत
ओझे घेऊनी उभा मी ताठ
गरज तुमची भागवतो मी
नाव माझे आहे कपाट
रंग निराळे रूप निराळे
वापर माझा निरनिराळा
कधी असे मी स्वच्छ नि सुंदर
कधी असे मजवरी धुराळा
कपडे लत्ते, दागदागिने
प्राॅपर्टीचे पेपर, पैसा
सामावले मजमध्ये सारे
हस्ती नसे मी ऐसा तैसा
कधी मोडकळीला येतो
तरीही अविरत सेवा देतो
गरज माझी संपल्यावरती
अलगद भंगारामध्ये जातो
मनुष्य म्हणजे कपाटच हो
सारे काही सामावूनी घेतो
कार्यभाग तो संपल्यावरती
साऱ्यांनाच नकोसा होतो
अविरत ओझे वाहत जातो
अखेर कधीतरी हतबल होतो
झीज होऊनी या देहाची
या सृष्टीला सोडूनी जातो
✒ K. Satish