Wednesday, November 16, 2022

मिळे धनाचा मेवा, खड्डयात गेली जनसेवा

गरिबांचा तो हक्क मारूनी

खिसे तुम्ही किती भरता रे

तुडुंब भरले खिसे तरीही

कोंबून कोंबून भरता रे 


विसर तुम्हाला पडला तुम्हीही

गरीबच कधीतरी होता रे

आली सत्ता माज वाढला

विसर तुम्हाला पडला रे 


गरिबांच्या सेवेसाठी तुम्ही

निवडणूक ती लढला रे

निवडून आल्यानंतर का बरे

मेंदू तुमचा सडला रे 


समोर पाहून झरा धनाचा

सुटला लोभ तुम्हाला रे

मते तुम्हाला दिल्याचा होतो

पश्चात्ताप आम्हाला रे 


आयुष्य काही वर्षांचेच हे

मेंदूत तुमच्या न घुसले रे

धुंद होऊनी सत्तेमध्ये

मेंदू तुमचे नासले रे 


उघडा डोळे सुप्त मनाचे

फळ कर्माचे मिळेल रे

कर्मानुसारच फळही मिळते

कधी हे तुम्हास कळेल रे ?

✒ K. Satish




Saturday, November 5, 2022

मतलबी नेते

मूर्खांच्या हाती सत्ता

वाढवी स्वतःची ते मालमत्ता


करती पिळवणूक कष्टकऱ्यांची

झोळी भरती काॅन्ट्रॅक्टदारांची


लायकीशून्य पण मान मोठा

ज्ञानाचा असे यांच्याकडे तोटा


बुजगावणे हे बिनकामाचे

लोणी खाती प्रेतावरचे


हात जोडती निवडून येण्या

नंतर वेळ नसे भेटण्या


आत्मा जळतो कष्टकऱ्यांचा

बोजा वाढतो तळतळाटाचा


पैशाला हे हपापलेले

कष्टावाचून सुखावलेले


पैशासाठी लाज सोडती

निर्लज्जपणाचे दर्शन घडवती


जेव्हा फिरेल चक्र काळाचे

वाटोळे होईल या साऱ्यांचे

✒ K. Satish




Wednesday, October 19, 2022

दीपोत्सव

आनंदाचा क्षण हा आला

हर्षित सारा जन हा झाला

चोहीकडे हे दीप उजळले

अंधारावर घातला घाला 


वैफल्याच्या अन् दुःखाच्या

आठवणींना विसरूनी जाऊ

आनंदाच्या उत्सवात या

प्रफुल्लित होऊनी न्हाऊ 


दीप असे हा ज्ञानाचा अन्

दीप असे हा समृद्धीचा

अज्ञानाला, नैराश्याला

संपवण्याचा मार्ग सुखाचा 


माझ्यासंगे इतरांचेही

भले व्हावे ही बाळगू इच्छा

नांदो सौख्य सर्वांच्या दारी

दीपोत्सवाच्या याच शुभेच्छा...!!!

✒ K. Satish





Sunday, August 14, 2022

भारत देश

भारत आमचा देश आहे

आमचा जीव की प्राण आहे,

या देशाने दिले आम्हा

सुंदर असे संविधान आहे


भाषा निराळ्या, प्रांत निराळे

धर्म निराळे, पेहराव निराळे,

परंतु, आम्ही एकजुटीने

विणले देशभक्तीचे जाळे


शान वाढली या देशाची

सोन्याच्या त्या खाणीने,

शूरांच्या तलवारीने अन्

विद्वानांच्या ज्ञानाने


आमचा प्रत्येक श्वास हा देश

आयुष्याचा ध्यास हा देश,

सुंदर लोकशाहीने नटलेला

जगात एकच भारत देश

जगात एकच भारत देश

जगात एकच भारत देश...!!!

✒ K.Satish




Sunday, August 7, 2022

गोष्ट चमच्यांच्या राजाची

चमच्यांच्या राजाची गोष्ट

मती त्याची की हो झाली भ्रष्ट,

चमच्यांचे ऐकूनी त्याने

राज्य स्वतःचे केले नष्ट


स्तुती ऐकण्या पाळले चमचे

गुलाम म्हणूनी पाळले चमचे,

पण ते सगळे होते स्वार्थी

होते लफंगे आणि लुच्चे


चमचे होते निव्वळ कपटी

जळके, कुचके, अप्पलपोटी,

वैर त्यांचे ज्यांच्याशी त्यांची

चहाडी करती खोटी नाटी


मूर्ख तो राजा ऐकूनी त्यांचे

निर्णय चुकीचे घेऊ लागला,

जे होते खरेच कामाचे

दोषी त्यांना ठरवू लागला


शोलेमधला जेलर आठवा

चमचा त्याचे कान भरवतो,

मूर्ख असा जेलर स्वतःचे

मूर्खपणाने हसे करवतो


असेच झाले या राजाचे

चमच्यांच्या बाजारी हरवला,

हलक्या कानाच्या हो कृपेने

राज्य मिळाले त्याचे धुळीला

✒ K. Satish






Thursday, July 28, 2022

फूल प्रेमाचे

पाठवले जे फूल तुला मी
फूल नव्हे ते हृदय असे,
कोमल अशा त्या हृदयामध्ये
सखये माझे प्रेम वसे

एक एक पाकळीमध्ये वसले
भाव अंतरीचे माझ्या,
गोड गुलाबी भावनांना त्या
ओठांचा दे स्पर्श तुझ्या

जर कधी काटे टोचू लागले
काट्यांना दुर्लक्ष तू कर,
समजून घे प्रेमाची भाषा
मऊ पाकळ्यांना स्पर्श तू कर

मनमोहक सुगंध असा गं
दरवळेल त्या फुलातूनी,
एकेक श्वास प्रिये माझा गं
अनुभव तू त्या गंधातूनी

त्या फुलातूनी प्रेम हे माझे
समजून घे तू प्रेमाने,
जीवन माझे कर तू सुगंधित
या प्रितीच्या सुगंधाने
✒ K. Satish





Thursday, June 30, 2022

यातना मनातल्या

यातना मनातल्या

सांगू कशा कुणाला,

सगळेच कोणत्यातरी

दुःखामधेच आहे


नाती गोती शून्य

आहेत या हो जगती,

रक्ताचे जे म्हणवती

ते अति यातना देती


महत्त्व ज्या नात्याला

देई सारे जग हे,

ते कपटी निघाले तर

करेल काय मन हे


लादलेली नाती

काय ती कामाची,

त्यांच्यामुळेच होते

अवहेलना मनाची


नाते असे असावे

जे आपण निवडावे,

मन निर्मळ हो ज्याचे

त्यास नातलग म्हणावे


रक्ताची कसली नाती

खोट्याने सजवलेली,

वर मुखवटा मायेचा

आत कपटानं भरलेली


भांडार या दुःखाचे

मोहामध्येच आहे,

मोहमायेच्या जाळ्यातूनी

आता सुटायचे आहे


स्वार्थी या जगाला

निरोप द्यावयाचा,

मनी विचार आहे

शून्याकडे जाण्याचा

✒ K. Satish



Wednesday, June 29, 2022

आई नसावी अशी

आई या शब्दाचा महिमा

जगातं असतो मोठा हो,

प्रेम, करुणा, वात्सल्याचा

नसे तिच्याकडे तोटा हो


ज्याच्या नशिबी कपटी आई

तो मोठा कमनशिबी हो,

व्यभिचारी आईने बुडवली

आई नावाची महती हो


स्वार्थासाठी मुलांस छळती

मृत्यूच्या दाढेत ढकलती,

आई अशी असते का कधी

विपरित घटना घडली हो


जन्म देऊनी नुसते जगी कुणी

आई होऊ शकत नाही,

आई तिच हो जिच्यात माया,

प्रेम,  त्याग ओसंडूनी वाही


काही कमनशिबींना मिळते

दुर्दैवाने अशी आई,

व्याकूळ त्यांचे मन तडफडती

का मिळाली मज अशी आई


मनात हुंदके दाटून येती

आई पाहूनी इतरांची,

प्रेम, त्याग अन् निस्वार्थी ती

मूर्ती जणू वात्सल्याची


कपटी, क्रूर अन् व्यभिचारी

षडयंत्री अन् निष्ठुर हो,

अशी बाई कधी आई नसावी

कुणा मुलांच्या नशिबी हो

✒ K. Satish



Monday, June 20, 2022

वारी

संतांच्या या भूमीमध्ये

वारकऱ्यांना स्थान मानाचे,

वाहू लागले वारे आता

संतांच्या जयघोषाचे


स्नान करूनी भक्तीचे

भोजन आत्मशक्तीचे,

वारकरी दर्शन हे घडवती

पृथ्वीवरी मानवतेचे


वारी निघाली दिमाखात ही

तहानभूक आता हरली हो,

सुवचने ती संतांची

आकाशी दुमदुमली हो


महाराष्ट्राची पावन भूमी

महापुरूषांची, संतांची,

वर्षानुवर्षे इथे परंपरा

जपतो आम्ही वारीची...

✒ K. Satish



Wednesday, April 20, 2022

एक जाहलो आम्ही

एक जाहलो आम्ही आता

नाही कुणाची भीती,

चालतो मार्गाने सत्याच्या

निर्मळ आमची नीती


विचार ठेवूनी उच्च प्रतीचे

प्रगतीची धरतो वाटं,

उगाच छेडूनी आम्हाला

तुम्ही लावू नका हो नाटं


कळते आम्हा प्रेमाची भाषा

दावू नका तुम्ही उगाच धाशा,

पडेल पाऊल उलटे तुमचे

ठरेल कारणी तुमच्या नाशा


होतो गेलो विखुरले आम्ही

घेतला होता तुम्ही फायदा,

आता एकीच्या जोरावर

उखडू हुकूमशाहीचा कायदा


पाडू नका आता फूट हो तुम्ही

कावा तुमचा आहे समजला,

सदैव राहू एकच आता

मार्ग एकीचा आम्हा उमजला

✒ K. Satish



Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts