Wednesday, June 29, 2022

आई नसावी अशी

आई या शब्दाचा महिमा

जगातं असतो मोठा हो,

प्रेम, करुणा, वात्सल्याचा

नसे तिच्याकडे तोटा हो


ज्याच्या नशिबी कपटी आई

तो मोठा कमनशिबी हो,

व्यभिचारी आईने बुडवली

आई नावाची महती हो


स्वार्थासाठी मुलांस छळती

मृत्यूच्या दाढेत ढकलती,

आई अशी असते का कधी

विपरित घटना घडली हो


जन्म देऊनी नुसते जगी कुणी

आई होऊ शकत नाही,

आई तिच हो जिच्यात माया,

प्रेम,  त्याग ओसंडूनी वाही


काही कमनशिबींना मिळते

दुर्दैवाने अशी आई,

व्याकूळ त्यांचे मन तडफडती

का मिळाली मज अशी आई


मनात हुंदके दाटून येती

आई पाहूनी इतरांची,

प्रेम, त्याग अन् निस्वार्थी ती

मूर्ती जणू वात्सल्याची


कपटी, क्रूर अन् व्यभिचारी

षडयंत्री अन् निष्ठुर हो,

अशी बाई कधी आई नसावी

कुणा मुलांच्या नशिबी हो

✒ K. Satish



Monday, June 20, 2022

वारी

संतांच्या या भूमीमध्ये

वारकऱ्यांना स्थान मानाचे,

वाहू लागले वारे आता

संतांच्या जयघोषाचे


स्नान करूनी भक्तीचे

भोजन आत्मशक्तीचे,

वारकरी दर्शन हे घडवती

पृथ्वीवरी मानवतेचे


वारी निघाली दिमाखात ही

तहानभूक आता हरली हो,

सुवचने ती संतांची

आकाशी दुमदुमली हो


महाराष्ट्राची पावन भूमी

महापुरूषांची, संतांची,

वर्षानुवर्षे इथे परंपरा

जपतो आम्ही वारीची...

✒ K. Satish



Wednesday, April 20, 2022

एक जाहलो आम्ही

एक जाहलो आम्ही आता

नाही कुणाची भीती,

चालतो मार्गाने सत्याच्या

निर्मळ आमची नीती


विचार ठेवूनी उच्च प्रतीचे

प्रगतीची धरतो वाटं,

उगाच छेडूनी आम्हाला

तुम्ही लावू नका हो नाटं


कळते आम्हा प्रेमाची भाषा

दावू नका तुम्ही उगाच धाशा,

पडेल पाऊल उलटे तुमचे

ठरेल कारणी तुमच्या नाशा


होतो गेलो विखुरले आम्ही

घेतला होता तुम्ही फायदा,

आता एकीच्या जोरावर

उखडू हुकूमशाहीचा कायदा


पाडू नका आता फूट हो तुम्ही

कावा तुमचा आहे समजला,

सदैव राहू एकच आता

मार्ग एकीचा आम्हा उमजला

✒ K. Satish



Saturday, April 2, 2022

मार्ग गवसला आनंदाचा

अंधारलेल्या काळोखामध्ये
शोधत होतो वाट
विचारांनी थैमान घातले
होते मनात दाट

भरकटलेल्या आयुष्याला
दिशाच सापडत नव्हती
नैराश्याचे ढग हे
दाटले होते अवती भवती

किरण आशेचा दिसतंच नव्हता
दूर दूरवर मजला
काय करावे नि काय करू नये
समजत नव्हते मजला

क्षणभर मनात वाटून गेले
संपले आता सगळे
बुझूच शकणार नाहीत आता
माझ्या आयुष्याची ठिगळे

विचार करता करता अचानक
समोर दिसली प्रेतं
त्यांचं उरलं नव्हतं आता या
पृथ्वीतलाशी नातं

लगेच माझ्या मनामध्ये
एक विचार येऊन गेला
अरे कधीतरी मातीमध्ये
जायचे आहे या देहाला

का व्हावे बरे दुःखी कष्टी
का बाळगावा मोह
मिळाले आयुष्य एकदाच अन्
मिळाला एकदाच देह

सुंदर आहे जीवन त्याला
सुंदर रितीने जगायचे
इथून पुढे प्रत्येक दुःखाला
सुखाच्या चष्म्यातून बघायचे...!!!
✒ K. Satish


Thursday, March 31, 2022

लेखणी असावी अशी

देशाला हवी आहे
सत्याची कास धरणारी लेखणी,
जिच्या सडेतोड लिखाणाने
ती दिसेल खूपच देखणी

लेखणीला कधीच नसतो
जात, धर्म, पंथ
अन् क्रांतिकारी विचार मांडणे
कधीही होवू नये संथ

लेखणी असावी निर्भीड
असत्याचा बुरखा फाडणारी,
पीडितांचे प्रश्न मांडणारी अन्
अन्यायाविरूद्ध लढणारी

प्रस्थापितांची, बाहुबलींची
लेखणी नसावी गुलाम,
कार्य करावे तिने असे की,
सर्वांनी करावा तिला सलाम...!!!
✒ K. Satish





Wednesday, March 30, 2022

अन्यायाशी लढण्यासाठी

गुलामगिरी मज नाही मंजूर
स्वाभिमानाला जपायचे,
अन्यायाशी लढण्यासाठी
सदा सज्ज मज रहायचे

सोशिक बनूनी जर का मी ही
सोसत राहिलो क्षणोक्षणी,
घोडदौड मग अन्यायाची
 रोखू शकेल कसे कुणी ?

न्याय, हक्क अन् समतेसाठी
क्षणाक्षणाला घडायचे,
अन्यायाशी लढण्यासाठी
सदा सज्ज मज रहायचे

स्वातंत्र्य मी देतो मिळवूनी
तुुम्ही रक्त द्या तुमचे मला,
नेताजींनी उभारली सेना
शत्रूचा मोडिला कणा

अन्यायाला गाडण्यासाठी
असंख्य नेताजी घडवायचे,
अन्यायाशी लढण्यासाठी
सदा सज्ज मज रहायचे

त्याग आणि बलिदानाविना
क्रांती घडणे अशक्य आहे,
आणि क्रांती घडली नाही
तर मग गुलामी अटळच आहे

त्याग आणि बलिदानाचे
बीज मनामध्ये रूजवायचे,
अन्यायाशी लढण्यासाठी
सदा सज्ज मज रहायचे
✒ K. Satish


Tuesday, March 15, 2022

नवे क्रांतीपर्व

क्रांतीची ती मशाल पुन्हा

पेटवण्याची आलीया वेळ,

दुष्टजनांचा सुरूच आहे

गरीबांना छळण्याचा खेळ


अन्यायाची परिसीमा ही

ब्रिटिशांहूनही वाईट हाल,

पारतंत्र्य संपले कसे बरे

आजही आहे जे होते काल


तेव्हा होते परकीय आता

स्वकीयच छळती जनतेला,

म्हणूनच आता लढा हा अवघड

होऊनी बसला क्रांतीला


निस्वार्थी, लढवय्ये आणिक

स्वाभिमान आहे ज्यांच्या उरी,

नव्या दमाचे क्रांतीकारक

या शत्रूंवर मात करी


निमूटपणाने अन्यायाला

सोसणे आता सोडूनी द्या,

नव्या क्रांतीच्या पर्वामध्ये

    नव्या दमाने सामिल व्हा...!!!

✒ K. Satish




Wednesday, February 9, 2022

सहलीसाठी आनंदमयी शुभेच्छा

आनंदाचा घडो प्रवास हा

मनापासूनी तुम्हा शुभेच्छा,

धकाधकीच्या जीवनातूनी

उसंत मिळावी हीच ती इच्छा 


भ्रमण करूनी विविध ठिकाणी

आनंद घ्यावा क्षणाक्षणाचा,

मरगळ संपो जीवनातली

उत्साह वाढो तनामनाचा 


सवंगड्यांनो करा साजरा

आनंद सोबत फिरण्याचा,

नसलो तनाने जरी मी संगे

भास व्हावा मी असण्याचा 


आनंद तुमचा तोच हो माझा

नाही वेगळा आणखी काही,

व्यस्त जरा सध्या मी आहे

आणखी दुसरे काही नाही

✒ K. Satish



Tuesday, January 11, 2022

अंतिम घटका विरहाची

चांदण्यांनो चमका असे की,

रातीचाही दिवस होवो

आज न मजला झोप येवो

साजन माझा उद्या येत आहे 


आठवणी त्याच्या अतिसुंदर

अंग हे शहारूनी टाकी,

आता न काही उरले बाकी

मन हे उत्कंठित होत आहे 


दिवस सरले, वर्षे सरली

विरहकाळ तो वाढत गेला,

प्रेममळा परि बहरत गेला

अतीव आनंद आता होत आहे 


परमोच्च आनंद उद्या घ्यायचा मज

सामोरी दिसताच त्याला बिलगायचे,

नयनात त्याच्या मजला हरवायचे

स्वप्न सुंदर हे मी पहात आहे 


सुंदर हे स्वप्न जागे ठेवा तुम्ही

सारी रात या स्वप्नी जगायचे आहे,

उघडताच चक्षु त्याला पहायचे आहे

अंतिम घटका विरहाची मी मोजत आहे

✒ K. Satish



Friday, December 31, 2021

सरत्या वर्षाला निरोप

सरत्या वर्षास न दुषणे द्यावी

वाईटासोबत चांगलेही घडते,

वाईटातूनी अनुभव हाती येतो

चांगल्यातूनी मन आनंदित होते 


नव्या धडाडीने, नव्या उत्साहाने

नव्या वर्षास या आलिंगन द्यावे,

अवाजवी अपेक्षा उरी न बाळगता

आनंदित कर क्षण प्रत्येक त्याला म्हणावे 


छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद हो दडला

शोधूनी त्याला आपलेसे करावे,

दुःखी क्षणांचे मळभ दूर करूनी

स्वतःसोबत इतरांना हर्षित करावे 


जगलेला क्षण मागील वर्षातं होता

जगायचा क्षण नववर्षातं आहे,

मनापासूनी आभार सरत्या वर्षाचे

कारण अजूनी प्राण देहातं आहे

✒ K. Satish



Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts