माझे जन्मठिकाण होती
एक छोटीशी वस्ती,
तिथल्या एकजुटीसमोर
झुकती मोठ्या मोठ्या हस्ती
दोनशे अठ्ठ्याऐंशी कुटुंबांचा
संसार तेथे चाले,
गुण्यागोविंदाने नांदत होते
सगळ्याच धर्मावाले
आजच्याइतके पैशाला
महत्त्व तेव्हा नव्हते,
दुसर्याचे दुःख प्रत्येकजण
स्वतःचेच समजत होते
मोबाईलचे जाळे नव्हते
पैशाचा तो अहंकार नव्हता,
तरबेज असा कबड्डीपटू
प्रत्येक घराघरामध्ये होता
आट्यापाट्या, लपंडाव अन्
शिरापुरीचा खेळही चाले,
बोरीबनातून फळे तोडण्या
पार करी मुले नदी अन् नाले
भांडण होई सार्वजनिक अन्
सगळेच त्याचे साक्षीदार असे,
चित्रपटालाही लाजवील
अशी दृश्ये नेहमीचं दिसे
कामावर जर गेला तरीही
नसे काळजी घरच्यांची,
दुखले खुपले कोणाचे तर
होतसे गर्दी इतरांची
भय नव्हते कधी चोरांचे अन्
दुःख नसे कमी पैशांचे,
राजमहाल तो आमच्यासाठी
घर आमचे दोन खोल्यांचे
तिथेच झालो शिकूनी मोठे
धडे घेतले माणुसकीचे,
अजूनही आठवती क्षण तिथले
आनंदाचे, एकजुटीचे
धकाधकीच्या जीवनात या
आठवण येई जुन्या क्षणांची,
म्हणूनच आठवी क्षणाक्षणाला
वस्ती माझ्या बालपणीची
✒ K. Satish