एक भन्नाट लोकगीत...
एकच प्याला म्हणून म्हणून
लागला बाटली रिजवू तो,
मस्तीमध्ये पीता पीता
व्यसनी होऊ लागला तो
मौजमजा अन् मस्तीचे
तरूणाईचे वय ते होते,
सळसळ होती रक्तामध्ये
भय कशाचेही वाटत नव्हते
हळूहळू दारूने त्याला
इतका विळखा घातला की,
तिच्याविना करमेना त्याला
प्रेयसी झाली त्याची ती
धुंद होऊनी तिच्यामध्ये तो
अखंड डुंबून गेला होता,
तिच्याविना जगण्याचा जणूकाही
विसरच त्याला पडला होता
सरकू लागले आयुष्य पुढे अन्
त्याला आता ती पिऊ लागली,
रक्तामध्ये भिनूनी त्याला
मरणाच्या दारी नेऊ लागली
मजेत घेतलेल्या प्याल्याची
किंमत मोठी मोजली त्याने,
सुंदर असे आयुष्य संपविले
दारुच्या त्या व्यसनाने...
✒ K. Satish
मुर्खांच्या त्या गराड्यात तो
हर्षित झाला स्तुती ऐकूनी,
कटू सत्य जो दाविल त्याला
दुर्लक्षिले मग शत्रू समजूनी
अधोगतीचे कारण त्याच्या
ठरली त्याची हीच ती कृती,
स्तुतीपायी मुर्खांच्या झाला
राजाचा कंगालपती
बुद्धिमान बोले कटू शब्द
असे ते आपल्या कामाचे,
मुर्खांची वाहवा मिळवणे
लक्षण असे दुर्भाग्याचे
बालिश चमचे स्तुती करूनी
स्वार्थ साधती स्वतःचा,
विद्वानांच्या द्वेषापोटी
कान भरवती ते तुमचा
म्हणूनच माझे एकच सांगणे
क्षणिक सुखाची आस नसावी,
विद्वानांच्या कटू शब्दांची
प्रगतीसाठी साथ असावी
✒ K. Satish
विस्कटलेले केस मी
विंचरूनी घेतले,
जेव्हा माझ्या सजनाला मी
येताना बघितले
दारी येता बेल वाजली
आनंदाने न्हाले मी,
सुखद क्षणाच्या जाणिवेने
हर्षित होऊन गेले मी
धडधड होतंय काळीज माझं
समोर त्यांच्या जाताना,
नव्या नव्या या संसाराचे
पहिले पान उलटताना
दार उघडता समोर ते अन्
त्यांच्यासमोर होते मी,
आलिंगन देऊनी तयांना
त्यांच्या कवेत गेले मी
नव्या नव्या या संसाराची
सुखद अशी ही पहिली पाने,
सतत रहावी स्मरणी माझ्या
रिक्त न व्हावे प्रेम रकाने
✒ K. Satish
माझे जन्मठिकाण होती
एक छोटीशी वस्ती,
तिथल्या एकजुटीसमोर
झुकती मोठ्या मोठ्या हस्ती
दोनशे अठ्ठ्याऐंशी कुटुंबांचा
संसार तेथे चाले,
गुण्यागोविंदाने नांदत होते
सगळ्याच धर्मावाले
आजच्याइतके पैशाला
महत्त्व तेव्हा नव्हते,
दुसर्याचे दुःख प्रत्येकजण
स्वतःचेच समजत होते
मोबाईलचे जाळे नव्हते
पैशाचा तो अहंकार नव्हता,
तरबेज असा कबड्डीपटू
प्रत्येक घराघरामध्ये होता
आट्यापाट्या, लपंडाव अन्
शिरापुरीचा खेळही चाले,
बोरीबनातून फळे तोडण्या
पार करी मुले नदी अन् नाले
भांडण होई सार्वजनिक अन्
सगळेच त्याचे साक्षीदार असे,
चित्रपटालाही लाजवील
अशी दृश्ये नेहमीचं दिसे
कामावर जर गेला तरीही
नसे काळजी घरच्यांची,
दुखले खुपले कोणाचे तर
होतसे गर्दी इतरांची
भय नव्हते कधी चोरांचे अन्
दुःख नसे कमी पैशांचे,
राजमहाल तो आमच्यासाठी
घर आमचे दोन खोल्यांचे
तिथेच झालो शिकूनी मोठे
धडे घेतले माणुसकीचे,
अजूनही आठवती क्षण तिथले
आनंदाचे, एकजुटीचे
धकाधकीच्या जीवनात या
आठवण येई जुन्या क्षणांची,
म्हणूनच आठवी क्षणाक्षणाला
वस्ती माझ्या बालपणीची
✒ K. Satish
पोटासाठी धडपड नुसती
कष्ट करी मानव त्यासाठी,
भूक भागण्या अन्न हवे अन्
हवे ते सुदृढ शरीरासाठी
स्वयंपाकघर म्हणजे असते
राजमहल हो अन्नासाठी,
असते येथे हक्काची जागा
धान्य, मसाले ठेवण्यासाठी
अन्नपूर्णेचे अस्तित्व येथे
विद्यापीठ हे पाककलेचे,
स्त्री जगते येथे हर्षाने
क्षण निम्मे तिच्या आयुष्याचे
घरात असते हीच ती जागा
जल, अग्नि अन् वायुसाठी,
येथेच सजते पूजाघरही
छोट्या गरीब कुटुंबासाठी
अन्नपूर्णा इथे बनवी हो
पाककृती किती निरनिराळ्या,
मग खाऊ घाली सर्वांना
अन् मिळवी कौतुकाच्या टाळ्या
गरीब असो वा असो धनवान तो
प्रत्येकाची भूक भागवती,
घरातील एक पवित्र ठिकाण हे
स्वयंपाकघर त्याला हो म्हणती
✒ K. Satish
या शिक्षणाची महती
रंकाला बनवी रावं,
गुलाम देशालाही
जगातं येई भावं
असे डरूनी जगणे
तो नर असो वा नारी,
शिक्षण घेऊनी तेही
घेती गगनभरारी
जगात खूपं होता
गुरूला त्या मानं,
धनास गौण मानून
करती ते ज्ञानदानं
किती घडवले ते शिष्य
दूर केले ते अज्ञानं,
कर्तव्यनिष्ठ शाळेसी
होता पूर्वी मानं
मग काळं तो बदलला
पैशाचे लोभी आले,
शाळेच्या प्रतिष्ठेला
रसातळाला नेले
शिक्षणातं झाला
सुरू काळाबाजारं,
विद्यार्थी, पालकांची
नुसती लूटमारं
मग शिक्षकही झाले
सामीलं या लूटीतं,
पैशासाठी अडवती
ते शिक्षणाची वाटं
आता धर्म म्हणजे पैसा
कर्तव्य म्हणजे पैसा,
गुरूच्या प्रतिमेला
हा डाग लागे कैसा
अंधारमय भविष्य
आता समोर आहे,
रसातळाला गेली
शिक्षणपद्धती आहे
मान गुरू या पदाचा
मनातूनी मिळावा,
माझ्या या कवितेचा
अर्थ साऱ्यांना कळावा...!!!
✒ K. Satish
पाऊस आला बरसत गेला
मृत्यू घेऊनी आला,
पाहूनी त्याचे तांडव मानव
पुरता हतबल झाला
काय करावे काही कळेना
पैसा असूनी अन्न मिळेना,
आयुष्याची गाडी अडली
काही केल्या पुढे पळेना
वाट पाहूनी होते सगळे
आतुरतेने ज्याची,
झाली अचानक सगळ्यांवरती
अवकृपा हो त्याची
वयोवृद्ध अन् छोटी बालके
पशु पक्षी अन् नर नारी,
दया न केली कुणावरीही
नेले मृत्यूच्या दारी
जीव मुठीत घेऊनी जो तो
करू लागला त्याची विनवणी,
पाहिजे होता आम्हांस तू पण
आता क्षणात जा तू परतूनी
पाणी म्हणजे जीवन किंतु
जीवन संपवूनी गेला,
नयनांमध्ये न संपणारे
अश्रू देऊनी गेला
प्रलयंकारी पाऊस आला
मानवास खूप शिकवूनी गेला,
जात धर्म अन् पैसा अडका
मानव क्षणात विसरूनी गेला...
✒ K. Satish
स्वार्थ अन् लबाडी त्याच्या
रक्तात भिनली होती,
त्याच्या नजरेत क्षुल्लक होती
सगळी नातीगोती
जवळ करतसे एखाद्याला
स्वतःच्या स्वार्थासाठी,
कामापुरती जोडतसे
मैत्रीची खोटी नाती
करून लबाडी हळूहळू त्याचे
धनही वाढू लागले,
अवगुणांचे आणखी तेज
त्याच्यावर चढू लागले
अति धनाचा माज त्याला
अहंकारी बनवू लागला,
वाढूनी त्याचा अहंकार
तो इतरांना हिणवू लागला
मग अचानक एके दिवशी
नियतीचे काटे फिरले,
धनही बुडाले सगळे अन्
संकटांनी त्याला घेरले
त्याच्या अहंकारी वृत्तीने
सगळेच दुरावले होते,
आपले म्हणावे असे कोणीच
हितचिंतक त्याकडे नव्हते
एकांतामध्ये बसला अन् तो
धाय मोकळून रडला,
अहंकार अन् स्वार्थापायी
तो होता एकटा पडला
पैसा म्हणजे सर्वस्व नसे
मीच मोठा हे सत्य नसे,
अहंकार अन् स्वार्थ हे तर
मनुष्याचे मोठे शत्रू असे...!!!
✒ K. Satish
लाघवी सौंदर्य पाहूनी
मनात उठती मधुर तरंग,
काया तुझी कोमल इतकी की
पाहूनी होतो मी तर दंग
भुरळ पाडूनी हृदयी माझ्या
बसली तू गं घट्ट अशी की,
देहभान मी विसरूनी गेलो
तुझाच होऊन बसलो गं मी
तुझ्यात गुंतून गेलो तर मी
सारे काही विसरून जाईल,
तुझ्या प्रितीने ओथंबलेल्या
प्रेमसागरी डुंबून जाईल
त्या सागरी डुंबायाचे
स्वप्न पाहतो क्षणाक्षणाला,
स्वप्नसुंदरी तू माझी गं
तुझी आस माझ्या हृदयाला
दे होकार तू मजला आता
तू माझ्या मनमंदिरात गं,
डुंबून जाऊ दोघेही मग
प्रितीच्या सागरात गं
✒ K. Satish
कळले नाही मला हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने क्षण जागे झाले....