वाढदिवस श्रीमंताच्या मुलाचा
धुमधडाक्यात झाला साजरा,
लाखो रुपयांच्या सजावटीकडे
उपस्थितांच्या लागल्या नजरा
आमदार आले, खासदार आले
सगेसोयरे झाडून आले,
नेत्रदीपक रोषणाईने
डोळे त्यांचे दिपून गेले
मनोरंजनाचा खजिनादेखील
सर्वांसाठी तयार होता,
संगीत, नृत्य, ऑर्केस्ट्रासोबत
फटाक्यांचा धुमधडाका होता
ठिकठिकाणी अवतरली होती
जत्रा खाद्यपदार्थांची,
काय खावे अन् काय न खावे
पंचाईत झाली लोकांची
ज्याच्यासाठी सोहळा होता
तो हिरा कुठे दिसतच नव्हता,
एक वर्षाचा राजकुमार तो
केव्हाच झोपी गेला होता
खरे म्हणजे अशा सोहळ्यांचे
महत्त्व अनेकांना माहीत नसते,
निमित्त यांचे साधून त्यांना
स्वतःची प्रतिष्ठा मिरवायची असते
खोट्या अशा प्रतिष्ठेपायी
नाहक पैशांचा अपव्यय होतो,
याच पैशाची चणचण भासून
गरीब शेतकरी यमसदनाला जातो
समाजासाठी या पैशाचा
सुयोग्य वापर करून पहावे,
दीनदुबळ्यांचे अश्रू पुसूनी
आनंदामध्ये न्हावून जावे
खोट्या प्रतिष्ठेला महत्व द्यावे
की, महत्व द्यावे सत्कार्याला,
एकदा तरी विचारून पहावे
स्वतःच स्वतःच्या मनाला
✒ K. Satish