तळहाताच्या रेषा अन् चेहरे पाहून
बरेचजण भविष्य सांगतात,
ते सांगण्यासाठी लोकांकडून
पैसे देखील मागतात
चांगले सांगता सांगता
थोडी अडचणींची झालर दिली जाते,
मग धास्तावलेल्या मनामध्ये
उपायांची आसही जागवली जाते
चांगले व्हावे या आशेने लोक
अंधश्रध्देच्या मागे धावतात,
अन् हतबल झालेले हे लोक
आपसूक त्यांच्या जाळ्यात घावतात
सर्व चांगले व्हावे म्हणून
अनेक उपाय सुचवले जातात,
अन् भांबावलेल्या लोकांकडून
बक्कळ पैसे उकळले जातात
अडीअडचणी, दुःख - वेदना
मानवी जीवनाचा भागच आहे,
तळहाताच्या रेषा निराळ्या
तरी कोण यातून सुटला आहे ?
मनगटामध्ये जोर असावा
अन् इच्छाशक्तीही प्रबळ असावी,
या दोन्हींच्या जोरावर
भविष्य घडविण्याची ताकद असावी...!!!
✒ K. Satish