Monday, February 22, 2021

लाडक्या लेकीस वाढदिवसाच्या शुभेच्छा...

लाडक्या लेकीस, सिद्धीस

जन्मदिवसाच्या खूप खूप

शुभेच्छा...


आनंदाचा क्षण हा आला

जन्मदिन हा तुझा गं आला,

धकाधकीच्या जीवनात या

आनंदाचा वर्षाव झाला 


प्रगतीपथावर जावे तू गं

स्वतःस घडवत न्यावे तू गं,

येथील अडथळे अगणित तरीही

अद्वितीय कार्य करावे तू गं 


क्षमता आहे तुझ्यात मोठी

जिद्द, चिकाटीदेखील मोठी,

आकार देऊन जीवनास तू

कार्य करावे देशासाठी

✒ K. Satish





Tuesday, February 16, 2021

एकजुटीची नवी दिशा

मनात माझ्या संघर्षाची

लाट उसळली आता,

एकजुटीची नवी दिशा मी

देईल जाता जाता


दुर्बल सोसती अन्यायाचे

येथे निरंतर घावं,

पैसा, ताकद, सत्तेवाल्यांचा

हो वाढला भावं


अक्कलशून्यांनाही सलाम

लागे करावा आता,

एकजुटीची नवी दिशा मी

देईल जाता जाता


घावावरती घाव सोसूनी

मन झाले हो कठोरं,

पित्त खवळते पाहूनी

लोकांचे मन ते निष्ठुरं


लढा देऊनी अन्यायाला

संपवायचे आता

एकजुटीची नवी दिशा मी

देईल जाता जाता


निमूटपणाने हुकूमशाहीला

शरण कधी ना जावे,

स्वार्थ साधूनी स्वतःचा

इतरांना कधी ना छळावे


अन्यायाला ना घाबरता

समोर जावे आता,

एकजुटीची नवी दिशा मी

देईल जाता जाता


प्रामाणिक राहूनी

समाजात नीट वागावे,

शब्द दिला इतरांना तर

त्याला हो नीट जागावे


ओळखूनी फितुरांना

करावे शहाणे जाता जाता

एकजुटीची नवी दिशा मी

देईल जाता जाता


मनात माझ्या............

✒ K. Satish





Sunday, February 14, 2021

उपकार सैनिकांचे

मरताना पण हसतो

तो देशाचा सैनिक असतो,

देशासाठी आपुल्या

तो अविरतपणे लढत असतो


तारूण्याचे क्षण तो

स्वतःसाठी जगत नाही,

तरूणाईची उमेद सगळी

सदैव देशासाठी वाही


जीव अडकला त्याचा

आपुल्या कुटुंबामध्ये जरी,

डोळ्यांत तेल घालून तो

असंख्य कुटुंबांचे रक्षण करी


ऊन, वारा, पाऊस, शत्रू

यांचे त्याला भय नसते,

देशासाठी लढण्याची

अदम्य जिद्द त्याच्यामध्ये असते


अतिरेक्यांचा हल्ला होतो

हाच मृत्यूला सामोरा जातो,

शत्रूंचा त्या खात्मा करूनी

आपल्या देशाची लाज राखतो


छोट्यांचा आधारस्तंभ अन्

आई वडिलांची आशा तो,

वाट पाहणार्‍या पत्नीच्या

ओल्या नयनांची भाषा तो


प्राण पणाला लावून ज्याने

आपणाला जीवदान दिले,

थोर असे उपकारच त्याने

आपणा सर्वांवर केले


कृतघ्न होऊन जर का आपण

विसरून गेलो उपकारांना,

किती यातना होतील सांगा

त्या असंख्य हुतात्म्यांना


स्वार्थ सोडूनी आपण सगळे

कृतज्ञतेची कास धरू,

एक होऊनी आपण त्यांच्या

भवितव्यासाठी कार्य करू


छोट्या छोट्या मदतीने मग

कुटुंब त्यांचे सुखी करू,

उदात्त अशा कार्याने करूया

मानवतेचे पर्व सुरू...

✒ K. Satish



Friday, February 5, 2021

धार लेखणीची

अन्यायाशी लढण्यासाठी

शस्त्र घेतले हाती,

प्रयत्न ठरले फोल

फक्त जिंकली शस्त्रांची भीती


हतबल होऊनी अखेर मग मी

मार्ग निवडला लेखणीचा,

रक्त न सांडता घाव घातला

थरकाप उडाला अन्यायाचा


धार असे खूप लेखणीला

कुमार्ग तिला कधी दावू नये,

हवी लेखणी सत्यासाठी

असत्य कधीही लिहू नये


जोड बुद्धीला लेखणीची

देऊनी कार्य करावे,

न्यायासाठी लढूनी

अन्यायावर तुटूनी पडावे

✒ K.Satish



Friday, January 29, 2021

आजच्या युगातील एक सत्य

एकेकाळी दहाड मारूनी

गर्जत असे जो,

उगीच छेडत असणार्‍याला

पंजा मारी तो


त्रास त्याला देण्यासाठी

कोणी धजावत नव्हता,

धजावला जर कोणी तर तो

त्याला सोडत नव्हता


हळूहळू मग विजय मिळविला

त्याने रागावरती,

वाद ना घाले कोणाशी

ना ओरडे कोणावरती


एकेदिवशी एकाने

केली मग मोठी हुशारी,

वाद घातला त्याच्याशी अन्

केली आरे कारी


शांतपणाने याला त्याने

केले पहिले दुर्लक्ष,

तरीही छेडत राहिला अन् हा

झाला त्याचेच भक्ष्य


रूद्राचा अवतार तो

झाला होता लोण्याचा गोळा,

आता मात्र त्यातूनी ऊठू

लागल्या अग्नीच्या ज्वाळा


याला त्याच्या या अवताराची

जाणीव मुळीच नव्हती,

मागू लागला माफी

धडधड करू लागली छाती


आता मात्र त्यास उमजली

दुनियेची रीत ही न्यारी,

शांत माणसा जगू न देती

घाबरती रूद्राला सारी


नाईलाजाने त्याने मग

जुने रूपच अवलंबिले,

रीत अशी ही दुनियेची

तिने चांगले होऊ न दिले...

✒ K. Satish



Monday, January 25, 2021

संविधान

आमच्या देशाची शान

आमचे संविधान महान,

सार्‍या ग्रंथाहूनी श्रेष्ठ आम्हा

हा ग्रंथ महान


वेशभूषा, प्रांत, भाषा

विविधता इथे किती,

तरीही एकसंघ होऊनी

इथे सर्व नांदती


सर्वांना एकरूप

बनवले या ग्रंथाने,

जरीही असले भिन्न सगळे

जाती आणि पंथाने


स्वातंत्र्य लिहिण्याचे

स्वातंत्र्य बोलण्याचे,

स्वातंत्र्य हसण्याचे

मुक्तपणे जगण्याचे


भिन्न भिन्न ग्रंथ इथे

तरीही देश एक हा,

कारण हा ग्रंथ जपतो

सार्‍यांच्या भावना


स्त्रियांना हक्क देई

पीडितांना न्याय देई,

रंजल्या गांजलेल्यांच्या

हाताला काम देई


दुष्टांना शासन इथे

हक्कांसाठी भाषण इथे,

गरीबांना राशन इथे

कारण संविधान इथे


भाग्यवान आहोत आम्ही

या पृथ्वीतलावरी,

या महान ग्रंथाचे

राज्य या देशावरी


हित यात जनतेचे

राज्य इथे जनतेचे,

शिवरायांच्या मनातील

स्वराज्य इथे समतेचे


यामुळेच इथे आता

नाही कोणीही गुलाम,

करूनी वंदन तयाला

करूया सगळे सलाम...!!!

✒ K. Satish




Wednesday, January 20, 2021

सौंदर्याची खाण

नाजूक या ओठांची लाली

नयन नशीले गाल गुलाबी,

पहात रहावे रूप तुझे अन्

मद्य न पिता व्हावे शराबी


थरथरल्या ओठांवर तुझिया

फूल गुलाबाचे ठेवावे,

अन् उचलावे अलगद आणिक

हळूच त्याला मग चुंबावे


कशी करू मी स्तुती तुझी

मी कधी अप्सरा पाहिली नाही,

पाहतो जेव्हा स्वप्नी अप्सरा

तुजविन दुसरी दिसतच नाही


सौंदर्याची खाण तू प्रिये

तुझी आस लागे ह्या जीवाला,

आशिक झालो तुझा आता मी

दे तू दुजोरा माझ्या प्रेमाला

✒ K.Satish









Sunday, January 17, 2021

इंद्रायणी

तुम्ही करू नका घाण

आपली इंद्रायणी छान

हिच्या चोहीकडे

संतांचे स्थान


एके काळी होती निर्मळ किती

इंद्रायणी आपली

स्वार्थापोटी माणसाच्या तिची

काय दशा झाली


दुर्गंधी रसायन,

सांडपाणी केरकचरा

यांचा का हो केला इतका

इंद्रायणीवरती मारा


संतांच्या भूमीत

वारकर्‍यांचा हो मान

त्यांना मिळत नाही आता

इंद्रायणीमध्ये स्नान


आता अखेरची घटका

मोजत आहे इंद्रायणी

तिला वाचवण्याचा ध्यास

तुम्ही घ्या हो तुमच्या मनी


सगळे मिळूनच आपण आता

निर्धार करूया

श्रमदानाने हो आपण तिला

निर्मळ करूया...!!!

✒ K. Satish





Thursday, January 14, 2021

खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ


निवडणुकीची आता लगबग झाली सुरू

कार्यकर्ते दारोदार लागले बघा फिरू,

घरोघरी जाऊनी, नतमस्तक होऊनी

भेटवस्तू देण्याची घाई लागले करू


खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ


जे कधीही बघत नव्हते ज्यांच्या तोंडाकडे

ते आता नमस्कार त्यांना करू लागले,

पत्रकांचा खच पडला सगळ्यांच्या दारात

पदयात्रांचा सपाटा सुरू झाला जोरात


खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ


आयोजन हळदी कुंकू आणि होम मिनिस्टरचे

इथेतिथे जागोजागी आता दिसू लागले,

दर रोज जेवणाचे आमंत्रण देऊनी

जनतेच्या पोटात अन्न ठासू लागले


खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ


मद्याच्या पार्ट्या अन् नृत्याचे फेरे

सुरू झाले कुमार्गाचे प्रकार सारे,

वादा वादीचे प्रकार घडू लागले

कार्यकर्ते आपा पसात भिडू लागले


खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ


मतदानाची तारीख जवळ येऊ लागली

पैशाच्या पावसात जनता न्हावू लागली,

घरोघरी जाऊन पैसे हाती देऊन

लोकशाहीची विटंबना होऊ लागली


खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ


साम दाम दंड भेदाचे सहाय्य घेऊनी

भ्रष्ट राजकारणी ते येतील मग निवडूनी,

म्हणून स्वाभिमान मनी सगळ्यांनी जागवा

सुंदर ह्या लोकशाहीस अतिसुंदर बनवा


खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

✒ K. Satish







Wednesday, January 13, 2021

व्यभिचाराने केला घात

चेकाळलेले म्हातारपण

बिघडलेली तरूणाई,

सुंदरी पाहून तो ही भुलला

तिलाही भान उरले नाही


चाळीशी उलटून गेल्यानंतर

दिसली त्याला ती सुंदरी,

हसून बोलली त्याला तर ती

धडधड झाले त्याच्या उरी


ओळखूनी त्याच्या भावना तिनेही

जाळे फेकले प्रेमाचे,

अडकूनी त्या जाळ्यामध्ये त्याने

उचलले पाऊल टोकाचे


ताबा सुटला मनावरीचा

व्यभिचाराने नको ते घडले,

क्षणिक सुखाच्या मोहापायी

नसते लफडे गळ्यात पडले


पैसा गेला, प्रतिष्ठा गेली

सोडूनी त्याला पत्नीही गेली,

सुखमय आयुष्याची त्याच्या

पुरती राखरांगोळी झाली


सुंदरीनेही सोडले त्याला

तिने नवा संसार थाटला,

खंगून गेला पुरता त्याला

मार्ग मरणाचा बरा वाटला


भाव भावनांवरती आहे

जीवन सार्‍यांचे वसलेले,

पण वाहवत गेलेले अनेकजण

पाहिले मी ही फसलेले

✒ K. Satish



Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts