Thursday, January 14, 2021

खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ


निवडणुकीची आता लगबग झाली सुरू

कार्यकर्ते दारोदार लागले बघा फिरू,

घरोघरी जाऊनी, नतमस्तक होऊनी

भेटवस्तू देण्याची घाई लागले करू


खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ


जे कधीही बघत नव्हते ज्यांच्या तोंडाकडे

ते आता नमस्कार त्यांना करू लागले,

पत्रकांचा खच पडला सगळ्यांच्या दारात

पदयात्रांचा सपाटा सुरू झाला जोरात


खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ


आयोजन हळदी कुंकू आणि होम मिनिस्टरचे

इथेतिथे जागोजागी आता दिसू लागले,

दर रोज जेवणाचे आमंत्रण देऊनी

जनतेच्या पोटात अन्न ठासू लागले


खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ


मद्याच्या पार्ट्या अन् नृत्याचे फेरे

सुरू झाले कुमार्गाचे प्रकार सारे,

वादा वादीचे प्रकार घडू लागले

कार्यकर्ते आपा पसात भिडू लागले


खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ


मतदानाची तारीख जवळ येऊ लागली

पैशाच्या पावसात जनता न्हावू लागली,

घरोघरी जाऊन पैसे हाती देऊन

लोकशाहीची विटंबना होऊ लागली


खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ


साम दाम दंड भेदाचे सहाय्य घेऊनी

भ्रष्ट राजकारणी ते येतील मग निवडूनी,

म्हणून स्वाभिमान मनी सगळ्यांनी जागवा

सुंदर ह्या लोकशाहीस अतिसुंदर बनवा


खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

खुर्चीचा खेळ सारा खुर्चीचा खेळ

✒ K. Satish







Wednesday, January 13, 2021

व्यभिचाराने केला घात

चेकाळलेले म्हातारपण

बिघडलेली तरूणाई,

सुंदरी पाहून तो ही भुलला

तिलाही भान उरले नाही


चाळीशी उलटून गेल्यानंतर

दिसली त्याला ती सुंदरी,

हसून बोलली त्याला तर ती

धडधड झाले त्याच्या उरी


ओळखूनी त्याच्या भावना तिनेही

जाळे फेकले प्रेमाचे,

अडकूनी त्या जाळ्यामध्ये त्याने

उचलले पाऊल टोकाचे


ताबा सुटला मनावरीचा

व्यभिचाराने नको ते घडले,

क्षणिक सुखाच्या मोहापायी

नसते लफडे गळ्यात पडले


पैसा गेला, प्रतिष्ठा गेली

सोडूनी त्याला पत्नीही गेली,

सुखमय आयुष्याची त्याच्या

पुरती राखरांगोळी झाली


सुंदरीनेही सोडले त्याला

तिने नवा संसार थाटला,

खंगून गेला पुरता त्याला

मार्ग मरणाचा बरा वाटला


भाव भावनांवरती आहे

जीवन सार्‍यांचे वसलेले,

पण वाहवत गेलेले अनेकजण

पाहिले मी ही फसलेले

✒ K. Satish



Saturday, January 2, 2021

मोहमाया

असंख्य प्राणी अवतरले

विश्वामध्ये स्थिरावले,

मोहमायेच्या दुष्टचक्राने

नकळत त्यांना खुणावले


कुणी धनाचा, कुणी तनाचा

कुणी खाण्याचा, मोह बाळगला,

मनुष्य प्राणी असा निराळा

स्वार्थ ज्यामध्ये अति बळावला


मौजमजा अन् थाटापायी

पैसा अन् व्यभिचारापायी,

चोरी करूनी, जीव घेऊनी

वाममार्गाला नकळत जाई


नाते गोते क्षुल्लक झाले

पैशाला खूप महत्त्व आले,

प्राॅपर्टीच्या वादापायी

कित्येक नाती संपून गेले


समाधानी ठेवून मनाला

ध्यास नसावा स्वार्थाचा,

जन्म मिळाला पृथ्वीतलावर

आनंद घ्यावा जगण्याचा.....

✒ K. Satish



Thursday, December 31, 2020

शूरवीरांना मानाची वंदना

शूरवीर ते होते कणखर

संख्या त्यांची होती छोटी

जिंकली होती त्यांनी जिद्दीने

मानाची ती लढाई मोठी


आत्मसन्मानाची लढाई

लढली होती त्या वीरांनी

नव्या पर्वाची सुरूवात जाहली

होती त्यांच्या बलिदानानी


प्राणपणाने लढले होते

झुगारूनी सार्‍या बंधांना

त्यामुळेच बाबांनी हो दिली

       त्यांना मानाची ती वंदना...!!!

✒ K. Satish







Friday, December 18, 2020

स्वप्नपूर्ती प्रेमाची

बालपण सरले अन् तरूणपण आले

बहर आली जीवनात जग बदलून गेले


जोश वाहे अंगी मज भीती नाही कसली

नकळत एक सुंदरी माझ्या मनामधे घुसली


रूप तिचे पाहण्याला व्याकुळ होतो असा

पावसाची वाट पाहत चातक बसतो जसा


कोमल ती काया तिची तेजस्वी कांती

पेटवती ह्रदयातील प्रेमाच्या वाती


भिजलेल्या मातीचा सुगंध दरवळतो

वार्‍यामध्ये श्वास तिचा जेव्हा विरघळतो


नशीली अदा तिची झिंग येते पाहून

वाजवते ठोके माझ्या ह्रदयात जाऊन


ओढ तिची लागली माझ्या ह्रदयाला

आसुसती नयन माझे तिला पाहण्याला


रोज वाटे मजला तिला सांगू एकदाचे

तिच्यासाठी असलेले भाव अंतरीचे


वाटे मजला भीती ती रूसणार तर नाही

क्षणामधे प्रेम माझे फसणार तर नाही


हिमतीने एकेदिवशी केला तिचा सामना

लिहून दिल्या तिला माझ्या मनातील भावना


वाट पहात होतो मी तिच्या होकाराची

सत्वपरीक्षाच होती माझ्या प्रेमाची


काही क्षण शांतपणे विचार तिने केला

अन् तिरप्या नजरेचा कटाक्ष मला दिला


नजरेतून भाव तिने सांगितले सारे

हर्षाने आले अंगावर शहारे


घालमेल मनातील संपली एकदाची

कदर तिने केली होती माझ्या प्रेमाची


स्वप्न झाले पूर्ण अन् तृप्त झाले मन

चोहीकडे दाटून आले प्रितीचे घन


अशी सुरू जाहली माझी प्रेमकहाणी

भेटली मजला माझ्या प्रितीची राणी...

✒ K. Satish



Tuesday, December 15, 2020

बंध लग्नाचे

भांडण तंटा करूनीदेखील

दोन शब्द ते प्रेमाचे,

जन्मभराची गाठ अशी हे

अद्भुत नाते लग्नाचे 


तू तू मी मी करूनीदेखील

शेवट याचा गोडच हो,

आयुष्याची मजाच यामध्ये

खरा आनंद यातच हो 


विश्वासाचे नाते हे तर

सुखदुःखाने भरलेले,

साथ देऊनी हसत जगावे

क्षण संसारिक उरलेले 


हळूहळू क्षण पुढे सरकती

तसे हे नाते दृढच होते,

वीण ही होते घट्ट हो त्याची

अर्थ जीवनास देऊन जाते

✒ K. Satish




Tuesday, December 1, 2020

लढा हा जीवनाचा

आलेख जीवनाचा, भरीस होता आला

पण दृष्ट लागली अन्, हा कोरोना हो आला


हळूहळू जगाची, दाबीत गेला नस हा

श्वास मानवाचा, कंठामध्येच आला


आले होते सुख हे, आता कुठे नशीबी

अनेकांची स्वप्ने, हा चिरडूनी हो गेला


खूप गाजावाजा झाला, लाॅकडाऊनही केला

तरी ना संपला हा, अन् वाढतंच गेला


पुरते झाले हतबल, हातावरीचे पोटं

कित्येकांचे जीवन, हा संपवूनी गेला


आता आस आहे, साऱ्यांना त्या लशीची

येऊ घातलेल्या, लशीचा बोलबाला


श्वासाची गरिबाच्या, किंमत ही शून्य आहे

धडा हा खूप मोठा, या कोरोनाने दिला


माणूस बदलत आहे, सृष्टी बिघडत आहे

सुंदर या निसर्गाचा, किती र्‍हास की हो झाला


थोडक्यात आता, तुम्हास सांगतो मी

माणूसं झाला खोटा, अन् पैसा मोठा झाला


द्वार विनाशाचे, आता खुलले आहे

लढा हा जीवनाचा, लढण्याचा काळ आला


आहे जिवंत आशा, लढा हा जिंकण्याची

मिळूनी सारे आपण, हरवू या संकटाला

✒ K. Satish



Monday, November 30, 2020

घेऊ कशी मी भरारी

स्त्री जातीमध्ये जन्म जाहला

बनले अबला नारी

बंध खुलेना माझे सांगा

घेऊ कशी मी भरारी


जन्म घेतल्यावर मी स्त्रीचा

फसवा तो आनंद पाहिला,

बालपणापासूनच मजला

दुय्यम दर्जा मिळत राहिला


होते घरच्यांसाठी मी तर

चुकून जन्मलेले मूल, 

पाहिजे होते त्यांना खरेतर

मुलगा ह्या रूपातील फूल


कपडा-लत्ता, जेवण-शिक्षण

विसंगती खूप त्यामध्ये होती,

मुलगा मुलगी भेदाभेदी

या देहाने अनुभवली होती


अद्वितीय असे काहीतरी मी

करण्यासाठी धडपड करते,

पण मुलगी असल्याचे ते बंधन

वेळोवेळी मला जखडते


माणूस म्हणून जगणार कधी मी

मिळणार कधी उभारी,

बंध खुलेना माझे सांगा

घेऊ कशी मी भरारी...!!!

✒ K. Satish



Sunday, November 29, 2020

फसवा आनंद

ओठांवरती एक बोल अन्

पोटामध्ये असे निराळे,

अगणित असती जागोजागी

या वृत्तीचे डोमकावळे


स्पष्ट बोलण्या धजवत नाही

जीभ यांची ही बनावटी,

स्वार्थासाठी गोड बोलती

परंतु वृत्ती असे कपटी


इतरांसाठी खणूनी खड्डा

मार्ग प्रगतीचा हे शोधती,

श्रेय हडपती इतरांचे अन्

उदो उदो स्वतःचा करती


अनेक लोकांचे वाटोळे

यांच्या हातून घडते हो,

तरी ना मिळे शांती मनाला

मनी सदा बेचैनी हो


फलश्रुती वाईट कर्मांची या

कधी ना कधी समोर येते,

सुख समजती ज्याला त्यातून

दुःखाचीच अनुभूती होते

✒ K. Satish



Friday, November 27, 2020

असे हे चमचे

चमचे सगळे होऊनी गोळा
वाजवू लागले ढोल,
खोटेपणाने वागणाऱ्यांचा
सुरू जाहला झोल 

लावालाव्या, कारस्थाने
हा तर यांचा खेळ जुना,
हुजरेगिरी करूनी यांनी हो
कामाला लाविला चुना 

कष्टच यांना नको कराया
आळशी साले जन्माचे,
याचे...त्याचे चमचे बनूनी
केले वाटोळे सर्वांचे 

बसून खाण्यासाठी हे तर
पाय चाटती वरिष्ठांचे,
नेत्यांची चापलूसी करती
जगणे यांचे लाचारीचे 

स्वार्थापोटी, ईर्षेपोटी
इतरांचे केले नुकसान,
सहकाऱ्यांची वाट लावण्या
भरती वरिष्ठांचे हो कान 

ज्याची चलती त्याचे चमचे
हे नाही कोणा एकाचे,
नवा गडी मग नवे राज्य हे
सूत्रच यांचे नेहमीचे...
✒ K. Satish



Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts