स्वार्थ अन् लबाडी त्याच्या
रक्तात भिनली होती,
त्याच्या नजरेत क्षुल्लक होती
सगळी नातीगोती
जवळ करतसे एखाद्याला
स्वतःच्या स्वार्थासाठी,
कामापुरती जोडतसे
मैत्रीची खोटी नाती
करून लबाडी हळूहळू त्याचे
धनही वाढू लागले,
अवगुणांचे आणखी तेज
त्याच्यावर चढू लागले
अति धनाचा माज त्याला
अहंकारी बनवू लागला,
वाढूनी त्याचा अहंकार
तो इतरांना हिणवू लागला
मग अचानक एके दिवशी
नियतीचे काटे फिरले,
धनही बुडाले सगळे अन्
संकटांनी त्याला घेरले
त्याच्या अहंकारी वृत्तीने
सगळेच दुरावले होते,
आपले म्हणावे असे कोणीच
हितचिंतक त्याकडे नव्हते
एकांतामध्ये बसला अन् तो
धाय मोकळून रडला,
अहंकार अन् स्वार्थापायी
तो होता एकटा पडला
पैसा म्हणजे सर्वस्व नसे
मीच मोठा हे सत्य नसे,
अहंकार अन् स्वार्थ हे तर
मनुष्याचे मोठे शत्रू असे...!!!
✒ K. Satish