Showing posts with label साहित्यिक ( literary ). Show all posts
Showing posts with label साहित्यिक ( literary ). Show all posts

Tuesday, January 17, 2023

लाटणे

पोळपाटावर फिरते ऐटीत

रोजचा त्याचा सराव,

कणकेला त्या आकार देई

लाटणे त्याचे नाव 


अन्नासाठी धडपडतो तो

मनुष्य रात्रंदिनी,

बनविती जेवण त्यांच्यासाठी

रोज साऱ्या गृहिणी 


भाजीसंगे पोळी शोभते

शोभत नाही पाव,

कणकेला त्या आकार देई

लाटणे त्याचे नाव 


धार नसे कसलीही याला

तरीही शस्त्र हे मोलाचे,

धाक दावण्या हे आवडते

हत्यार साऱ्या स्त्रियांचे 


परवान्याची गरज नसे

नसे खोल हो याचा घाव,

कणकेला त्या आकार देई

लाटणे त्याचे नाव 


किस्से याचे खूप मजेशीर

विविधतेने नटलेले,

दारूड्याचे डोके पाहिले

याच्यामुळेच फुटलेले 


काळजी घ्यावी जेव्हा हे असती

पत्नीच्या हातातं राव,

कणकेला त्या आकार देई

लाटणे त्याचे नाव 


महती याची मोठी आणिक

कार्यही याचे मोठेच हो,

शान असे स्वयंपाकघराची

जागा व्यापते छोटीच हो 


अस्तित्व याचे घराघरामध्ये

स्वयंपाकघर याचे गाव,

कणकेला त्या आकार देई

लाटणे त्याचे नाव

✒ K. Satish




Wednesday, August 4, 2021

स्वयंपाकघर

पोटासाठी धडपड नुसती

कष्ट करी मानव त्यासाठी,

भूक भागण्या अन्न हवे अन्

हवे ते सुदृढ शरीरासाठी 


स्वयंपाकघर म्हणजे असते

राजमहल हो अन्नासाठी,

असते येथे हक्काची जागा

धान्य, मसाले ठेवण्यासाठी 


अन्नपूर्णेचे अस्तित्व येथे

विद्यापीठ हे पाककलेचे,

स्त्री जगते येथे हर्षाने

क्षण निम्मे तिच्या आयुष्याचे 


घरात असते हीच ती जागा

जल, अग्नि अन् वायुसाठी,

येथेच सजते पूजाघरही

छोट्या गरीब कुटुंबासाठी 


अन्नपूर्णा इथे बनवी हो

पाककृती किती निरनिराळ्या,

मग खाऊ घाली सर्वांना

अन् मिळवी कौतुकाच्या टाळ्या 


गरीब असो वा असो धनवान तो

प्रत्येकाची भूक भागवती,

घरातील एक पवित्र ठिकाण हे

स्वयंपाकघर त्याला हो म्हणती

✒ K. Satish



Monday, June 21, 2021

संगीत

जीवनाचा ध्यास संगीत

या देहातील श्वास संगीत

पृथ्वीतलावर जाणवणार्‍या

स्वर्गसुखाचा आभास संगीत


भुकेल्याचा घास संगीत

तहानलेल्याची प्यास संगीत

भगवंताच्या भक्तांसाठी 

ईश्वराचा सहवास संगीत


मराठमोळ्या मावळ्यांकरिता

छत्रपती शिवराय संगीत

मायेसाठी आसुसलेल्यांची

प्रेमळ अशी माय संगीत


सीमेवरील जवानांसाठी

देशाचा अभिमान संगीत

मातृभूमीच्या रक्षणाकरिता

शहीद होण्याचा सन्मान संगीत


लावण्यवतीला लाजवेल अशी

सौंदर्याची खाण संगीत

पृथ्वीतलावर आनंदाने

जगण्यासाठी वरदान संगीत


पृथ्वीला जर देह मानले

तर तिच्यातील प्राण संगीत

उच्च नीचचा भेद मिटवी

जगी श्रेष्ठ असे महान संगीत


जाता जाता एकच म्हणणे

आमुचा प्रत्येक श्वास संगीत

उरलेल्या ह्या आयुष्याला

उरला एकच ध्यास संगीत

✒ K. Satish



Sunday, March 21, 2021

जागतिक काव्यदिनाच्या शुभेच्छा

कळले नाही मला 

हे शब्द कसे आले,


लिहीत गेलो हळूहळू

आणि काव्य पूर्ण झाले.


शांतपणे बसता 

डोळे मिटून गेले,


स्मृतीमधील काही

जुने क्षण जागे झाले.


आठवूनी त्यांना 

मग शब्दधागा विणला,


अशाप्रकारे माझा 

कवितासंग्रह बनला.


जागतिक काव्यदिनाच्या

सर्व कवी, साहित्यिक व काव्यरसिकांना मनःपूर्वक शुभेच्छा...!!!

✒ K. Satish



Saturday, February 27, 2021

अभिमान मराठीचा ?

व्हाॅटस्ॲपवरती आज

असंख्य मेसेज साचले,

कित्येक मेसेजमधून मी

मराठीचे गुणगान वाचले


मराठीचे गुणगान गाताना

थोडातरी विचार प्रत्येकाने करावा,

स्वतःबरोबरच भावी पिढीलाही

मराठीची गोडी लावण्याचा ध्यास धरावा


इंग्रजी माध्यमांमध्ये

पुढची पिढी शिकतेय,

मराठी बोलताना सहजतेने

त्यांची जीभ कुठं वळतेय ?


आंतरराष्ट्रीय स्तरावर आता

इंग्रजीला नाही उरला पर्याय,

म्हणूनच म्हणतो फक्त एकाच दिवशी

मराठीचा अभिमान बाळगणे पुरेसे होईल काय ?


काळाची गरज म्हणून मुलांना

इंग्रजीमध्ये जरूर शिकवावे,

पण नित्यनेमाने दररोज त्यांना

मराठी साहित्य जरूर पुरवावे


सुंदरतेने नटली आहे

आपली मराठी भाषा,

भावी पिढीच्या मनी रूजेल

हीच बाळगू आशा...!!!

✒ K.Satish



Saturday, August 22, 2020

काव्यनक्षत्रे

नक्षत्रांचा मळा तो फुलतो
काव्यमंचाच्या स्थानावर,
काव्यांच्या किती सरी बरसती
रसिकांच्या त्या कानावर

सामाजिक, वैचारिक काही
हास्याचे कुणी उडवी तुषार,
प्रेमकाव्य, विद्रोही कोणी
क्रांतीचे ते मांडी विचार

निरनिराळ्या प्रतिभा दिसती
दिसे इथे हरहुन्नरी मन,
भेदभाव ना इथे हो कसला
सर्वांकडे शब्दांचे धन

काव्यांची ही नक्षत्रे हो
समाजात किती मोलाची,
थोड्या शब्दांमधूनी मांडती
भूमिका किती ती खोलाची

मळा असा हा सदासर्वदा
नक्षत्रांचा फुलतच रहावा,
शब्दफुलांची होऊनी उधळण
आसमंत हा बहरत जावा

✒ K. Satish

 

Sunday, July 5, 2020

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला 
हे शब्द कसे आले,

लिहीत गेलो हळूहळू
अन् काव्य पूर्ण झाले.

शांतपणे बसता 
डोळे मिटून गेले,

स्मृतीमधील काही जुने 
क्षण जागे झाले.

आठवूनी त्यांना 
मग शब्दधागा विणला,

अशाप्रकारे माझा 
कवितासंग्रह बनला.
                     
K. Satish


Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts