Showing posts with label सकारात्मक ( positive ). Show all posts
Showing posts with label सकारात्मक ( positive ). Show all posts

Sunday, July 14, 2024

झुंज संकटांशी

दुःखाचा तो डोंगर मोठा
माझ्या नशिबी आला होता,
घावावरती घाव घालूनी
मला चिरडूनी गेला होता

जिद्द, चिकाटी, जबाबदारी
या सार्‍यांच्या मदतीने,
नवी उभारी घेण्या उठलो
मीही नव्या उमेदीने

मान देऊनी परिस्थितीला
पुढे पुढे मी चालत गेलो,
जेव्हा मिळाली अवचित संधी
सोने तिचे मी करू लागलो

अडचणी हे तर सत्य जगीचे
नाही कुणाला चुकलेले,
पाहिले हतबल किती जीव मी
प्राणाला हो मुकलेले

आयुष्याचा रस्ता कठीण
सुकर त्याला हो करायचे,
अंतिम रेषा गाठण्याआधी
संकटांना पुरून उरायचे

हार मानूनी जगणे हे तर
मृत्यूसमान असते हो,
पृथ्वीतलावर त्या व्यक्तीला
मुळीच किंमत नसते हो
✒ K. Satish



Tuesday, July 9, 2024

उर्मी न संपणारी

वाट पाहे कोणी
माझ्या संपण्याची,
तळपूनी मी पुन्हा
उभा समोरी आहे

व्यस्त होतो थोडा
व्यापात दुसर्‍या मी,
वाटले कुणाला
मी संपलोच आहे

आहे अजून बाकी
ते ॠण जीवनाचे,
असा कसा बरे मी
हार मानणार आहे

झगडणार आहे
मी दुष्ट प्रवृत्तींशी,
आत्मविश्वास मनी
माझ्या अजूनी आहे

थोडा मागे सरलो
दोन पावले मी,
कारण झेप मोठी
मजला घ्यायची आहे

डाव दोन घडीचा
खेळायचा असा की,
वाटावे नियतीला
बंदा सच्चा आहे

असेच संपण्यापरी
इतिहास घडवण्याची,
अदम्य जिद्द मोठी
माझ्या मनात आहे
✒ K. Satish




Thursday, February 2, 2023

हसत जगावे जीवनात या

चमचम तारे जीवनातले

क्षण हे गेले विरून,

हसत जगावे जीवनात या

जगू नये हो झुरून 


जीवन ऐसी नाव की ज्याचा

प्रवास ऐसा होवे,

आनंद-दुःख, प्रेम-मत्सर अन्

यामध्ये हेवेदावे 


क्षण हे पुढे पुढे जगताना

मन ठेवावे तरूण,

हसत जगावे जीवनात या

जगू नये हो झुरून 


वार्धक्य हे कुणा न चुकले

सर्वांना ते येई,

काळानुसार जीवनातले

अनुभव देऊनी जाई 


कवटाळूनी आनंदी क्षणांना

दुःख टाकावे पुरून,

हसत जगावे जीवनात या

जगू नये हो झुरून 


बालपणीचे, तारूण्याचे

आणिक वार्धक्याचे,

जीवनातले टप्पे तीन हे

भिन्न भिन्न वळणाचे 


वार्धक्यानंतरही जगावे

मन प्रफुल्लित करून,

हसत जगावे जीवनात या

जगू नये हो झुरून

✒ K.Satish




Wednesday, April 20, 2022

एक जाहलो आम्ही

एक जाहलो आम्ही आता

नाही कुणाची भीती,

चालतो मार्गाने सत्याच्या

निर्मळ आमची नीती


विचार ठेवूनी उच्च प्रतीचे

प्रगतीची धरतो वाटं,

उगाच छेडूनी आम्हाला

तुम्ही लावू नका हो नाटं


कळते आम्हा प्रेमाची भाषा

दावू नका तुम्ही उगाच धाशा,

पडेल पाऊल उलटे तुमचे

ठरेल कारणी तुमच्या नाशा


होतो गेलो विखुरले आम्ही

घेतला होता तुम्ही फायदा,

आता एकीच्या जोरावर

उखडू हुकूमशाहीचा कायदा


पाडू नका आता फूट हो तुम्ही

कावा तुमचा आहे समजला,

सदैव राहू एकच आता

मार्ग एकीचा आम्हा उमजला

✒ K. Satish



Tuesday, November 9, 2021

नाव जीवनाची

नाव जीवनाची
घेई ती हेलकावे,
पाय रोवूनी मी
अजूनी उभाच आहे 

आल्या असंख्य लाटा
कठीण प्रसंगांच्या,
थोपवूनी त्यांना
पुढे मी जात आहे 

भावभावनांच्या
वार्‍याचे ते तडाखे,
अविरत सोसूनीही
हर्षाने गात आहे 

आस किनार्‍याची
कधीच नव्हती मजला,
इतरांच्या होड्यांना
आधार देत आहे 

नाव अशी ही माझी
झाली जरी हो जीर्ण,
ज्ञानाने सजवण्याची
उर्मी मनात आहे
✒ K.Satish


Saturday, June 19, 2021

जीवनगाणे

गाणे जीवनाचे

ऐटीत गात आहे,

सूर बिघडले तरीही

आनंद घेत आहे 


बेसूर झाले गाणे

म्हणून का रडावे,

सूर पुन्हा जुळवूनी

हर्षाने गुणगुणावे 


चुकलेल्या त्या सूरांना

नीट ओळखूनी घ्यावे,

पुन्हा ना चुकावे

हे सूत्र मग जपावे 


मैफिल रंगवूनी

हे गीत गुणगुणावे,

असे व्हावे गाणे

जग मंत्रमुग्ध व्हावे 


सूर चुकले म्हणून का

मधेच संपवावे ?,

हे गीत खूप अमूल्य

संपूर्ण गुणगुणावे

✒ K. Satish



Sunday, March 28, 2021

गणित चुकांचे

चूक झाली जर कागदावरती

खोडून फाडून टाकता येते,

आयुष्यातील चुकांनी मात्र

अवघे जीवन बदलूनी जाते


ना चुकेल तो माणूस कसला

कोणी नाही जो कधी ना फसला,

मूर्ख म्हणावे त्याला जो की

चुकांनाच कवटाळूनी बसला


आयुष्याचे गणितच हे की

चूक छोटी पण अनुभव मोठा,

ज्याने घेतला बोध चुकांतूनी

त्याला यशाचा पडे ना तोटा


अडखळला जो चुकांच्यामधे

बदल त्याने ना काही घडविला,

चुकांमधूनी जो सुधारला

प्रगतीपथावर धावत गेला


आयुष्यातील चुकाच देती

अनुभवाचे अनेक मोके,

अनुभवातूनी माणूस घडतो

गणित चुकांचे असे अनोखे

✒ K. Satish











Wednesday, March 17, 2021

माझे जगणे

साथ देऊनी आयुष्याला

आनंदाने जगतो आहे,

आली संकटे कितीही तरी मी

त्यांना पुरून उरतो आहे


घडलेल्या वाईट घटनांचा

शोक करीत बसण्यापरी मी,

अनुभव संपन्न झाल्याचा

पुरता आनंद लुटतो आहे


चिंतेने चितेवर जाण्यापेक्षा

चिंतेलाच अग्नी देतो आहे,

आयुष्य आहे सुंदर त्याला

अतिसुंदर मी बनवतो आहे


जे आहे मजपाशी ते तर

सोडूनी इथेच जायचे आहे,

झरा बनूनी ज्ञानाचा मज

ओसंडूनी वाहायचे आहे

✒ K. Satish



Tuesday, February 16, 2021

एकजुटीची नवी दिशा

मनात माझ्या संघर्षाची

लाट उसळली आता,

एकजुटीची नवी दिशा मी

देईल जाता जाता


दुर्बल सोसती अन्यायाचे

येथे निरंतर घावं,

पैसा, ताकद, सत्तेवाल्यांचा

हो वाढला भावं


अक्कलशून्यांनाही सलाम

लागे करावा आता,

एकजुटीची नवी दिशा मी

देईल जाता जाता


घावावरती घाव सोसूनी

मन झाले हो कठोरं,

पित्त खवळते पाहूनी

लोकांचे मन ते निष्ठुरं


लढा देऊनी अन्यायाला

संपवायचे आता

एकजुटीची नवी दिशा मी

देईल जाता जाता


निमूटपणाने हुकूमशाहीला

शरण कधी ना जावे,

स्वार्थ साधूनी स्वतःचा

इतरांना कधी ना छळावे


अन्यायाला ना घाबरता

समोर जावे आता,

एकजुटीची नवी दिशा मी

देईल जाता जाता


प्रामाणिक राहूनी

समाजात नीट वागावे,

शब्द दिला इतरांना तर

त्याला हो नीट जागावे


ओळखूनी फितुरांना

करावे शहाणे जाता जाता

एकजुटीची नवी दिशा मी

देईल जाता जाता


मनात माझ्या............

✒ K. Satish





Friday, February 5, 2021

धार लेखणीची

अन्यायाशी लढण्यासाठी

शस्त्र घेतले हाती,

प्रयत्न ठरले फोल

फक्त जिंकली शस्त्रांची भीती


हतबल होऊनी अखेर मग मी

मार्ग निवडला लेखणीचा,

रक्त न सांडता घाव घातला

थरकाप उडाला अन्यायाचा


धार असे खूप लेखणीला

कुमार्ग तिला कधी दावू नये,

हवी लेखणी सत्यासाठी

असत्य कधीही लिहू नये


जोड बुद्धीला लेखणीची

देऊनी कार्य करावे,

न्यायासाठी लढूनी

अन्यायावर तुटूनी पडावे

✒ K.Satish



Saturday, October 31, 2020

गाठ माझ्याशी आहे

संकटांनी सावध व्हावे

गाठ ही आहे माझ्याशी,

खात्मा त्यांचा करण्याची ती

हिम्मत आहे मजपाशी


माझ्यावर कुरघोडी करण्या

केविलवाणी धडपड ती,

परतविल्यावर हल्ला त्यांचा

धूम ठोकूनी ती पळती


निरनिराळी रूपे बदलूनी

वेळोवेळी केला हल्ला,

परंतु मीही लढा देऊनी

गाठला माझा पुढचा पल्ला


कधी कधी तर घाव हो त्यांनी

केले मजवर खोलवरी,

तरीही लढलो हिमतीने अन्

धडकी भरली त्यांच्या उरी


आता झाला पाठ तो पाढा

निरनिराळ्या संकटांचा,

प्रश्नच उरला नाही आता

शरण हो त्यांना जाण्याचा

                                                           ✒ K. Satish



Wednesday, August 12, 2020

वाईटातले चांगले

जे स्वप्नातही आले नव्हते ते आता घडत आहे
जीवाचे महत्त्व सार्‍या जगाला कळत आहे,
पैशालाच सर्वस्व मानणार्‍यांना आता
आयुष्याचा खरा अर्थ हळूहळू उमजत आहे

राग, लोभ, द्वेष, मत्सर याकडे लक्ष जाईना
पैशाची हावही आता मनाचा ठाव घेईना,
मोठ्या हौशेनं बांधलेल्या स्वतःच्याच घरात
माणसांचा वेळ आता काही जाईना

पैशासाठी जीव घेणार्‍यांना स्वतःचे मरण दिसले
कपटाने आपल्याच लोकांना लुटणार्‍यांचे गणित फसले,
असत्याच्या मार्गाने जमा केलेली धनदौलत रुसली
अन् चांगल्या चांगल्यांच्या चेहर्‍यावर मृत्यूचे भय दिसले

एवढ्या मोठ्या आपत्तीने सार्‍यांनाच शिकवण दिली
भोगविलास त्यागून जगण्याची हिम्मत दिली,
पैशाने श्रीमंत नसलेलाही वेळेला उपयोगी ठरतो
गोष्ट किती ही मोलाची सार्‍यांनाच पटवून दिली

वाईटामधूनही चांगले घडलेल्याकडे लक्ष द्यावे
मोठेपणाला सोडून सौजन्याने वागत रहावे,
चांगला बदल जो घडला आहे तो असाच अखंड रहावा
अन् पृथ्वीतलावर माणुसकीने सदैव बहरत जावे...

✒ K. Satish

 

Sunday, August 9, 2020

अनुभवांचे धन

खेळता खेळता झालो मोठे
घेऊ लागलो जीवनाचे धडे,
या धड्यांतून शिकता शिकता
उलगडले जीवनाचे कोडे

कोडे अवघड होते हे तर
पूर्वी कधीच माहित नव्हते,
वरवर दिसतसे सरळ परंतु
हे तर वेडेवाकडे होते

एक प्रश्न सोडवल्यानंतर
दुसरा त्वरीत समोर दिसे,
त्याला सोडवले नाही तर
तिसरा समोरच येऊन बसे

प्रश्नामागून प्रश्ने सुटली
पुढची प्रश्ने सोपी होती,
कारण उत्तरे पुढच्यांची
मागच्यांमध्येच दडली होती

कोडे जीवनाचे उलगडताना
झालो आम्ही अनुभवसंपन्न,
पुढच्या पिढीला देण्यासाठी
हेच खरे आमच्याकडील धन

                                            ✒ K. Satish
 

Thursday, July 16, 2020

संकटाने शिकवला अर्थ जीवनाचा

पृथ्वीतलावर धुमाकूळ घातला
या कोरोना व्हायरसने,
क्षणात झाले कमी प्रदूषण
या विचित्र संकटाने


वाईट गोष्टींमधूनही काही
चांगले घडतच असते हो,
परंतु चांगल्या घटनांकडे
लक्षच आपले नसते हो


पैसा पैसा करणार्‍यांना
महत्त्व आता कळले जीवाचे ,
नव्हता वेळ कुटुंबासाठी
सर्वस्व झाले कुटुंब त्यांचे


पैशाचाही माज उतरला
अर्थ खरा जीवनाचा कळला,
ऐशआराम त्यागूनी जो तो
साधेपणाने जगू लागला


बंदिस्त झाला मानव सारा
किलबिल पक्ष्यांची कानी पडली,
संहारक मानवजातीला
विषाणूंची ताकद भारी पडली


संकट आले निघूनही जाईल
कालचक्र हे फिरवूनी जाईल,
भ्रमात जगणार्‍या मानवाला
अर्थ जीवनाचा शिकवूनी जाईल


✒ K. Satish



Monday, July 6, 2020

एका व्हायरसनं दिली जगा नवी दृष्टी

बाधित केले जग सारे
बाधित केली सृष्टी,
एका व्हायरसनं दिली
जगा नवी दृष्टी

चीनमध्ये जन्मला तो
जगातं पसरला,
धर्म पाहून डसायला
पुरता तो विसरला

त्याच्या हाहाकारानं
मानवं झाला कष्टी,
एका व्हायरसनं दिली
जगा नवी दृष्टी

गरीब आणि श्रीमंतही
त्यानं नाही सोडला,
मानवाचा अहंकारं
क्षणांत हो मोडला

सगळ्या चाकरमान्यांनं
गाठली आपली घरटी,
एका व्हायरसनं दिली
जगा नवी दृष्टी

संकटाला तोंड देण्या
डाॅक्टरं तो आला,
पोलिस, सैनिक आला
सलाम त्यांच्या कर्तव्याला

त्यांच्यामुळेच जगतोय आपण
झाली याची पुष्टी,
एका व्हायरसनं दिली
जगा नवी दृष्टी

                      ✒ K. Satish


Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts