Showing posts with label मार्मिक ( Touching ). Show all posts
Showing posts with label मार्मिक ( Touching ). Show all posts

Saturday, November 16, 2024

सरमिसळ

एक एक पदार्थ चावून खावा
आनंद त्याचा अविरत घ्यावा
प्रत्येकाचीच लज्जत भारी
स्वतंत्र चवीचा आस्वाद घ्यावा

गोड, तिखट, आंबट, कडू
महत्त्व प्रत्येक चवीचे
प्रत्येकाचा आस्वाद घेऊनी
हट्ट पुरवायचे जिभेचे

परंतु हट्ट पुरवतानाही
नियम घालून द्यायलाच हवे
जिभेला आनंदी करता करता
पोटाला पचेल तसेच खावे

कधीतरी होते गफलत आणिक
सरमिसळ होते साऱ्यांची
नको ते होते एकत्र अन्
पंचाईत साऱ्याला पचवायची

अन् मग शरीर-स्वास्थ्य बिघडते
जिभेचे चोचले तिलाच नडते
अन्न जे पोटात पचले नाही
हळूहळू ते तिथेच सडते

असेच झालेय राजकारणाचे
कोणी कुठेही पळतो आहे
तत्त्व, निष्ठा अन् लाज सोडूनी
इतर पक्षात विरघळतो आहे

या साऱ्यांची सरमिसळ अन्
वाट लागली देशाची,
यांनी भरली घरे स्वतःची
दयनीय अवस्था जनतेची

जनतेच्या पैशाने जगती
हे तर सेवक जनतेचे
अफाट कर वाढवूनीदेखील
धिंडवडे अर्थव्यवस्थेचे

यांची सरमिसळ अन् भेसळ
लोकशाहीला पचली नाही
सत्तेची अधाशी भूक ही
जनतेलापण रूचली नाही

जनतेनेही शहाणे व्हावे
आपले सेवक यांना मानावे
नेत्यांना वठणीवर आणूनी
लोकशाहीला प्रबळ करावे
✒ K. Satish



Wednesday, October 23, 2024

चार दिवस असत्याचे

दीप उजळले, प्रकाश झाला
अंधारावर केली मात,
तसेच व्हावे सत्यही उज्ज्वल
असत्याचा व्हावा घात

असत्य पळते भरभर भरभर
करी बोभाटा चोहीकडे,
जगास सांगे मीच खरा
सत्याचे काढी वाभाडे

खोटे नाटे मिथ्य पसरवूनी
भोळेपणाचा आव आणती,
सत्याला त्या जेरीस आणूनी
बदनामी ते त्याची करती

शांत समंजस सत्याला
नाही सवय बोभाट्याची,
निमूटपणाने सहन करी तो
खोटी अवहेलना स्वतःची

अनेक चेहरे समोर येती
छुप्या अशा दुश्मनांचे,
असत्याला साथ ते देती
ऐकत नाही सत्याचे

या काळामध्ये त्रास सोसूनी
सत्यही होई कठोर फार,
काळ बदलता बोथट होई
कपटी असत्याची हो धार

कितीही धावले असत्य भरभर
अखेर होई सत्याचा विजय,
मरणयातना सोसूनी करते
सत्य असत्याचा पराजय
सत्य असत्याचा पराजय
✒ K.Satish



Thursday, July 25, 2024

फसवा अर्थसंकल्प

खिसेकापूने खिसा कापला
तरीही नाही कळले मला
देतो म्हणूनी काढून घेणे
असे ही मोठी अजब कला

समस्यांच्या जाळ्यामध्ये
अडकवूनी ठेवली जनता
गांगरला हो करदाता
हसला तो कण्हता कण्हता

आस लावूनी बसला होता
पडेल पदरी काही
पदरी पडले की गमावले
कुणास कळले नाही

ज्यांनी आखले गणित सारे
बेरीज वजाबाकीचे
फसवूनी टाकले गणित त्यांनी
देशाच्या प्रगतीचे

खेळ मांडला गरिबीचा
आघात महागाईचा
हळूहळू हे करती बंद
मार्गही तो बचतीचा

कमवा तुम्ही अन् द्या आम्हाला
भूक यांची मोठी
नेहमी देती जनतेला हो
आश्वासने हे खोटी

तुटपुंजे ते ज्ञान हो यांचे
दुबळी जिद्द सचोटी
झोळी यांची नेहमी फाटकी
नियत यांची खोटी

आयत्या बिळावर नागोबासम
बसले जनतेच्या पैशावर
वाटचाल यांनी चालवली
अधोगतीच्या रस्त्यावर

आतातरी व्हा शहाणे अन् पहा
याकडे गांभीर्याने
अन्यथा अविरत गावे लागेल
असेच हे रडगाणे
असेच हे रडगाणे
K. Satish



Monday, April 22, 2024

चमच्यांच्या राजाची वाताहत

खोट्या स्तुतीतं रमला राजा
चमच्यांच्या गराड्यातं,
लाळ घोटीत, तुकडे वेचीत
चमचे रमले गुणगानातं

याची चुगली, त्याची चुगली
चमचे करती दिनरातं,
कर्तव्य विसरूनी राजा गुंतला
मूर्खपणाच्या खेळातं

कपटनीतीचा खेळ मांडिला
युद्धनीती तो विसरूनी गेला,
प्रजेचा तो पालक परंतु
त्यांनाच आता छळू लागला

सहनशक्तीचा अंत होऊनी
प्रजेमध्ये मग पेटले बंड,
कपटी चमचे अन् राजाविरूद्ध
साऱ्यांनी थोपटले दंड

एकजुटीने साऱ्यांनी मग
सत्ता उलथवली राजाची,
चमच्यांनीही साथ सोडली
झाली फजिती राजाची
झाली फजिती राजाची
✒ K. Satish



Thursday, October 19, 2023

कामगार नेता - एक अभिशाप

कामगार नेता आयटीआय पास

पण रूबाब मोठ्या थाटाचा,

चोरून खातो हिस्सा तो बघा

कामगारांच्या वाट्याचा 


कर्तव्याची जाण विसरूनी

दगा देतसे कंपनीला,

काम नेतसे कंपनीबाहेर

नफा यांच्या एजन्सीला 


मालक असती देवमाणूस

त्यांना भेटाया हे जाती,

कामगार जो घाम गाळतो

त्यांची भेट घडू न देती 


कामगारांच्या जीवावरी हो

रान मोकळे फिरण्या यांना,

काम करा म्हटले यांना तर

कमीपणा वाटे का यांना ? 


विसरूनी गेले कष्टाची भाषा

सदा यांना मलईची आशा,

नेतेगिरी करूनी केली हो

कामगारांची घोर निराशा 


अर्धी कंपनी लुटली यांनी

पळवला कामगारांचा हिस्सा,

चाळीस चोरांहूनही मोठा

आहे या नेत्यांचा किस्सा

✒ K. Satish






Friday, September 15, 2023

खोटे हितचिंतक

जळणाऱ्यांना काय म्हणावे

जळून जळून ते झाले खाक,

काल जे होते बोलत गोड ते

मुरडू लागले आज हो नाक


अधोगतीच्या समयी दाविती

खोटी खोटी ते सहानुभूती,

प्रगतीपथावर जाता आपण

लगेच फिरते त्यांची मती


खरेतर त्यांना वाटत असते

प्रगती याची कधीच न व्हावी,

दुःख, वेदना, गुलामगिरीशी

सोबत याची सतत रहावी


भासवत असती आम्हीच आहोत

तुझे मोठे रे हितचिंतक,

परंतु तुमच्या प्रगतीसाठी

हेच रे असती खरे घातक


खोटी सहानुभूती दावणाऱ्यांना

असे तुमच्या प्रगतीचा धाक,

काल जे होते बोलत गोड ते

मुरडू लागले आज हो नाक


✒ K. SATISH





Monday, August 14, 2023

कळलाच नाही देशा स्वातंत्र्याचा अर्थ

बलिदान त्यांचे सांगा

का जावू लागे व्यर्थ,

कळलाच नाही देशा

स्वातंत्र्याचा अर्थ


ते योद्धे स्वातंत्र्याचे

लढले देशासाठी,

त्यांनी प्राण वाहिले आपुले

या मातीसाठी


दिनरात केली त्यांनी

प्रयत्नांची शर्थ,

कळलाच नाही देशा

स्वातंत्र्याचा अर्थ


स्वतंत्र झालो आम्ही

ब्रिटिशांच्या गुलामीतून,

लोकशाही नांदू लागली

मग राज्यघटनेतून


राजनेते झाले भ्रष्ट

त्यांनी केला हो अनर्थ,

कळलाच नाही देशा

स्वातंत्र्याचा अर्थ


राजकीय भक्त झाले

काही अंधभक्त झाले,

नेत्यांच्या स्वार्थासाठी

भेदभाव वाढविले


लोभी राजकारण्यांनी

ते बलिदान केले व्यर्थ,

कळलाच नाही देशा

स्वातंत्र्याचा अर्थ

✒ K. SATISH





Monday, February 27, 2023

कट्टरपंथी

कट्टरपंथी म्हणजे काय ?

गोगलगाय आणि पोटात पाय


स्वतःच्या समाजाला म्हणवती सर्वश्रेष्ठ

बाकी सगळे यांच्या नजरेत कनिष्ठ...

अहो कनिष्ठच नाही, तर

ताटात राहिलेलं खरकटं उष्टं


स्वतःच्या स्वार्थापोटी घेती

सामान्य जनतेचा आधार

स्वतः राहती शाबूत आणि

त्यांना करती जीवावर उदार


धर्मग्रंथातील सुवचनांचा

कधीच नसतो यांना लळा,

विध्वंसाला प्राधान्य देऊन

चिरून टाकतात निष्पापांचा गळा


भडकाऊ विधानांचे यांनी

प्रस्थ माजवले चोहीकडे,

तरूणाईचे रक्त तापले

तिला पडले धर्मवेडाचे कडे


या कड्याला दूर सारूनी

कास धरा मानवतेची,

आज जगाला गरज असे

शांतता, बंधुभाव आणि समतेची...

✒K. Satish




Sunday, December 18, 2022

जगावे असे की...

दिस किती सरले
अन् दिस किती उरले
खरेच तुम्ही जगले
की मनातच झुरले
 
वाटते जपावा
आवडीचा तो छंद
पैसे कमावताना
आत्मभान झाले मंद
 
वाटे बागडावे
निसर्गाच्या कुशीतं
कधीच जुळले नाही
पण वेळेचे गणितं


ज्यांच्यासाठी इतकी
धडपड करीत होता
त्या कुटुंबासाठी
कधी वेळ देत नव्हता


पैसा अमाप आहे
आता रे तुजपाशी
पण मुले झाली मोठी
झुंज तुझी जगण्याशी


पैशापेक्षा श्रेष्ठ
शरीर, बुद्धी, वेळं
उमगले तर बसेलं
या जीवनाचा मेळं


एकच मानव जन्म
अन् नश्वरं शरीरं
जगावे मनमुरादं
अवघाची हा संसारं

✒ K. Satish






Sunday, November 20, 2022

असे आम्ही गुलाम

हात आमचे दगडाखाली

बोलायची झाली चोरी

आम्ही दिली दुसर्‍याच्या हाती

आमच्या अस्तित्वाची दोरी 


नको ते उपकार घेतले

झोळी आम्ही भरून घेतली

आज तीच लाचारी आमच्या

सार्‍या हक्कांवरती बेतली 


गुलामीचे जीवन जगतो

अब्रू घालवली सारी

आम्ही दिली दुसर्‍याच्या हाती

आमच्या अस्तित्वाची दोरी 


पश्चात्ताप होतोय आम्हाला

पण सांगू कसे कुणाला

या सार्‍याची खंत माहित

आहे आमच्या मनाला 


स्वार्थ साधला असला तरी

मनाला येईना उभारी

आम्ही दिली दुसर्‍याच्या हाती

आमच्या अस्तित्वाची दोरी 


वाटते आम्हालाही बोलावे

मत आमचे व्यक्त करावे

झाल्या चुकांची मागून माफी

सहकाऱ्यांचे पाय धरावे 


पण चुगल्या करून बरबटलो

विश्वास न कोणी करी

आम्ही दिली दुसर्‍याच्या हाती

आमच्या अस्तित्वाची दोरी 


स्वार्थ साधला दोन घडीचा

भोग मात्र आयुष्यभराचे

माणूस असलो आम्ही तरीही

जगतो जीवन जनावराचे 


सत्यासाठी लढणाऱ्यांचे

लढे उध्वस्त करी

आम्ही दिली दुसर्‍याच्या हाती

आमच्या अस्तित्वाची दोरी 


आमच्यासारखे असंख्य लाचार

आहेत अवतीभवती

म्हणूनच तर सामान्यजनांच्या

जीवनाची झाली माती 


आदेशाचे गुलाम आम्ही

पाप्यांची करी चाकरी

आम्ही दिली दुसर्‍याच्या हाती

आमच्या अस्तित्वाची दोरी

✒ K. Satish




Friday, November 18, 2022

कपाट

तुमच्या सेवेसाठी अविरत

ओझे घेऊनी उभा मी ताठ

गरज तुमची भागवतो मी

नाव माझे आहे कपाट


रंग निराळे रूप निराळे

वापर माझा निरनिराळा

कधी असे मी स्वच्छ नि सुंदर

कधी असे मजवरी धुराळा


कपडे लत्ते, दागदागिने

प्राॅपर्टीचे पेपर, पैसा

सामावले मजमध्ये सारे

हस्ती नसे मी ऐसा तैसा


कधी मोडकळीला येतो

तरीही अविरत सेवा देतो

गरज माझी संपल्यावरती

अलगद भंगारामध्ये जातो


मनुष्य म्हणजे कपाटच हो

सारे काही सामावूनी घेतो

कार्यभाग तो संपल्यावरती

साऱ्यांनाच नकोसा होतो


अविरत ओझे वाहत जातो

अखेर कधीतरी हतबल होतो

झीज होऊनी या देहाची

या सृष्टीला सोडूनी जातो

✒ K. Satish




Wednesday, November 16, 2022

मिळे धनाचा मेवा, खड्डयात गेली जनसेवा

गरिबांचा तो हक्क मारूनी

खिसे तुम्ही किती भरता रे

तुडुंब भरले खिसे तरीही

कोंबून कोंबून भरता रे 


विसर तुम्हाला पडला तुम्हीही

गरीबच कधीतरी होता रे

आली सत्ता माज वाढला

विसर तुम्हाला पडला रे 


गरिबांच्या सेवेसाठी तुम्ही

निवडणूक ती लढला रे

निवडून आल्यानंतर का बरे

मेंदू तुमचा सडला रे 


समोर पाहून झरा धनाचा

सुटला लोभ तुम्हाला रे

मते तुम्हाला दिल्याचा होतो

पश्चात्ताप आम्हाला रे 


आयुष्य काही वर्षांचेच हे

मेंदूत तुमच्या न घुसले रे

धुंद होऊनी सत्तेमध्ये

मेंदू तुमचे नासले रे 


उघडा डोळे सुप्त मनाचे

फळ कर्माचे मिळेल रे

कर्मानुसारच फळही मिळते

कधी हे तुम्हास कळेल रे ?

✒ K. Satish




Sunday, August 7, 2022

गोष्ट चमच्यांच्या राजाची

चमच्यांच्या राजाची गोष्ट

मती त्याची की हो झाली भ्रष्ट,

चमच्यांचे ऐकूनी त्याने

राज्य स्वतःचे केले नष्ट


स्तुती ऐकण्या पाळले चमचे

गुलाम म्हणूनी पाळले चमचे,

पण ते सगळे होते स्वार्थी

होते लफंगे आणि लुच्चे


चमचे होते निव्वळ कपटी

जळके, कुचके, अप्पलपोटी,

वैर त्यांचे ज्यांच्याशी त्यांची

चहाडी करती खोटी नाटी


मूर्ख तो राजा ऐकूनी त्यांचे

निर्णय चुकीचे घेऊ लागला,

जे होते खरेच कामाचे

दोषी त्यांना ठरवू लागला


शोलेमधला जेलर आठवा

चमचा त्याचे कान भरवतो,

मूर्ख असा जेलर स्वतःचे

मूर्खपणाने हसे करवतो


असेच झाले या राजाचे

चमच्यांच्या बाजारी हरवला,

हलक्या कानाच्या हो कृपेने

राज्य मिळाले त्याचे धुळीला

✒ K. Satish






Thursday, June 30, 2022

यातना मनातल्या

यातना मनातल्या

सांगू कशा कुणाला,

सगळेच कोणत्यातरी

दुःखामधेच आहे


नाती गोती शून्य

आहेत या हो जगती,

रक्ताचे जे म्हणवती

ते अति यातना देती


महत्त्व ज्या नात्याला

देई सारे जग हे,

ते कपटी निघाले तर

करेल काय मन हे


लादलेली नाती

काय ती कामाची,

त्यांच्यामुळेच होते

अवहेलना मनाची


नाते असे असावे

जे आपण निवडावे,

मन निर्मळ हो ज्याचे

त्यास नातलग म्हणावे


रक्ताची कसली नाती

खोट्याने सजवलेली,

वर मुखवटा मायेचा

आत कपटानं भरलेली


भांडार या दुःखाचे

मोहामध्येच आहे,

मोहमायेच्या जाळ्यातूनी

आता सुटायचे आहे


स्वार्थी या जगाला

निरोप द्यावयाचा,

मनी विचार आहे

शून्याकडे जाण्याचा

✒ K. Satish



Wednesday, June 29, 2022

आई नसावी अशी

आई या शब्दाचा महिमा

जगातं असतो मोठा हो,

प्रेम, करुणा, वात्सल्याचा

नसे तिच्याकडे तोटा हो


ज्याच्या नशिबी कपटी आई

तो मोठा कमनशिबी हो,

व्यभिचारी आईने बुडवली

आई नावाची महती हो


स्वार्थासाठी मुलांस छळती

मृत्यूच्या दाढेत ढकलती,

आई अशी असते का कधी

विपरित घटना घडली हो


जन्म देऊनी नुसते जगी कुणी

आई होऊ शकत नाही,

आई तिच हो जिच्यात माया,

प्रेम,  त्याग ओसंडूनी वाही


काही कमनशिबींना मिळते

दुर्दैवाने अशी आई,

व्याकूळ त्यांचे मन तडफडती

का मिळाली मज अशी आई


मनात हुंदके दाटून येती

आई पाहूनी इतरांची,

प्रेम, त्याग अन् निस्वार्थी ती

मूर्ती जणू वात्सल्याची


कपटी, क्रूर अन् व्यभिचारी

षडयंत्री अन् निष्ठुर हो,

अशी बाई कधी आई नसावी

कुणा मुलांच्या नशिबी हो

✒ K. Satish



Saturday, April 2, 2022

मार्ग गवसला आनंदाचा

अंधारलेल्या काळोखामध्ये
शोधत होतो वाट
विचारांनी थैमान घातले
होते मनात दाट

भरकटलेल्या आयुष्याला
दिशाच सापडत नव्हती
नैराश्याचे ढग हे
दाटले होते अवती भवती

किरण आशेचा दिसतंच नव्हता
दूर दूरवर मजला
काय करावे नि काय करू नये
समजत नव्हते मजला

क्षणभर मनात वाटून गेले
संपले आता सगळे
बुझूच शकणार नाहीत आता
माझ्या आयुष्याची ठिगळे

विचार करता करता अचानक
समोर दिसली प्रेतं
त्यांचं उरलं नव्हतं आता या
पृथ्वीतलाशी नातं

लगेच माझ्या मनामध्ये
एक विचार येऊन गेला
अरे कधीतरी मातीमध्ये
जायचे आहे या देहाला

का व्हावे बरे दुःखी कष्टी
का बाळगावा मोह
मिळाले आयुष्य एकदाच अन्
मिळाला एकदाच देह

सुंदर आहे जीवन त्याला
सुंदर रितीने जगायचे
इथून पुढे प्रत्येक दुःखाला
सुखाच्या चष्म्यातून बघायचे...!!!
✒ K. Satish


Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts