मन हे जडले तुझ्यावरी
हातात हात तू देशील का ?
जन्मभराची साथ तू देण्या
सांग ना माझी होशील का ?
✒ K. Satish
मन हे जडले तुझ्यावरी
हातात हात तू देशील का ?
जन्मभराची साथ तू देण्या
सांग ना माझी होशील का ?
✒ K. Satish
चांदण्यांनो चमका असे की,
रातीचाही दिवस होवो
आज न मजला झोप येवो
साजन माझा उद्या येत आहे
आठवणी त्याच्या अतिसुंदर
अंग हे शहारूनी टाकी,
आता न काही उरले बाकी
मन हे उत्कंठित होत आहे
दिवस सरले, वर्षे सरली
विरहकाळ तो वाढत गेला,
प्रेममळा परि बहरत गेला
अतीव आनंद आता होत आहे
परमोच्च आनंद उद्या घ्यायचा मज
सामोरी दिसताच त्याला बिलगायचे,
नयनात त्याच्या मजला हरवायचे
स्वप्न सुंदर हे मी पहात आहे
सुंदर हे स्वप्न जागे ठेवा तुम्ही
सारी रात या स्वप्नी जगायचे आहे,
उघडताच चक्षु त्याला पहायचे आहे
अंतिम घटका विरहाची मी मोजत आहे
✒ K. Satish
स्वप्नातं येऊनी तू
का स्वप्नं दाविले मला,
देऊन हात हाती
का सांग भुलवले मला
रेशीमगाठ ऐसी
प्रेमाची बांधूनी तू ,
का ओलेचिंब केले
या कोरड्या जीवाला
स्वप्नातले हे स्वप्नं
वाटे हवेहवेसे,
फुटली ती पालवी बघ
कोमेजल्या मनाला
आता हवीस मजला
प्रत्यक्ष तू समोरी,
तुजविन अर्थ नाही
आता या जीवनाला
✒ K. Satish
विस्कटलेले केस मी
विंचरूनी घेतले,
जेव्हा माझ्या सजनाला मी
येताना बघितले
दारी येता बेल वाजली
आनंदाने न्हाले मी,
सुखद क्षणाच्या जाणिवेने
हर्षित होऊन गेले मी
धडधड होतंय काळीज माझं
समोर त्यांच्या जाताना,
नव्या नव्या या संसाराचे
पहिले पान उलटताना
दार उघडता समोर ते अन्
त्यांच्यासमोर होते मी,
आलिंगन देऊनी तयांना
त्यांच्या कवेत गेले मी
नव्या नव्या या संसाराची
सुखद अशी ही पहिली पाने,
सतत रहावी स्मरणी माझ्या
रिक्त न व्हावे प्रेम रकाने
✒ K. Satish
लाघवी सौंदर्य पाहूनी
मनात उठती मधुर तरंग,
काया तुझी कोमल इतकी की
पाहूनी होतो मी तर दंग
भुरळ पाडूनी हृदयी माझ्या
बसली तू गं घट्ट अशी की,
देहभान मी विसरूनी गेलो
तुझाच होऊन बसलो गं मी
तुझ्यात गुंतून गेलो तर मी
सारे काही विसरून जाईल,
तुझ्या प्रितीने ओथंबलेल्या
प्रेमसागरी डुंबून जाईल
त्या सागरी डुंबायाचे
स्वप्न पाहतो क्षणाक्षणाला,
स्वप्नसुंदरी तू माझी गं
तुझी आस माझ्या हृदयाला
दे होकार तू मजला आता
तू माझ्या मनमंदिरात गं,
डुंबून जाऊ दोघेही मग
प्रितीच्या सागरात गं
✒ K. Satish
बाप नावाचे विशाल वृक्ष
आयुष्यात असावे,
त्याच्या छायेत जीवन आपुले
आनंदाने वसावे
रागीट, तापट, हुकूमशहा
तो वाटे कधी सर्वांना,
परंतु त्यामागील प्रेमभाव
ना दिसे इतरांना
ढाल होऊनी रक्षण करतो
कुटुंबासाठी अविरत लढतो,
अश्रू कुणाला न दाखवता
एकटाच गपचूप तो रडतो
मोठ्या मोठ्या वादळामध्ये
ना डगमगता लढतो,
योग्य दिशा दावूनी आपुल्या
मुलांचे भविष्य घडवतो
मुलीसाठी तर काळीज त्याचे
तुटते क्षणाक्षणाला,
बाप या शब्दाविना किंचितही
अर्थ नसे जीवनाला
✒ K. Satish
का जाने कुणास ठाऊक
तुझे नि माझे नाते कसले,
भेटीसाठी तुझिया माझे
मन हे आतुर होऊन बसले
तुझ्याविना मी काहीच नाही
जीव गुंतला तुझ्यात माझा,
आस मनाला तुझी सदैव
ध्यास जीवाला लागला तुझा
हरवून गेलो तुझ्यात मी गं
भान मला ना आता कसले,
मीच न उरलो माझा आता
प्राण हे माझे तुझ्यात वसले
जाऊ नकोस दूर तू आता
मन हे माझे मोडू नको,
आयुष्याच्या वाटेवरती
एकटे मला तू सोडू नको
तुझ्याविना जग शून्य हे भासे
जिथे पहावे तूच तू दिसे,
तुझ्याविना जगणे हे आता
माझ्यासाठी व्यर्थच असे...
✒ K. Satish
माया आणि ममता आई
प्रेम आणि करूणा आई,
स्नेहभाव तो तिच्यासारखा
कोणाच्याच हृदयामध्ये नाही
चिमटा काढून पोटाला ती
घास भरवते पिल्लांना,
दुःख मागते स्वतःसाठी अन्
सुखी बनवते इतरांना
भलेभले ते होते अगदी
नतमस्तक तिच्या चरणी,
काळीज तुटते मनातूनी पण
ओरडे मुलांना वरकरणी
महिमा तिचा या जगी हो मोठा
किती गावे तिचे गुणगान,
त्यागाची अतिसुंदर मूर्ती
आई या सृष्टीची हो शान
✒ K. Satish
नभ बरसला अन्
भिजवून गेला मातीला,
सुगंधित झाली माती जणूकाही
स्वर्गच आला भेटीला
मन हे माझे सुखावले अन्
तुझी आठवण मनी जागली,
याच क्षणी तुला भेटायाची
तीव्र आस या जीवा लागली
जरी भेटली नाहीस तू तरी
स्वप्नात माझ्या येशील का ?
कोमल तुझ्या त्या हाताला तू
हातात माझ्या देशील का ?
प्रीत माझिया मनातली सखे
तुझिया मनाला कळेल का ?
तुझ्या प्रितीची साथ ही मजला
या जन्मामध्ये मिळेल का ?
✒ K. Satish
नाजूक या ओठांची लाली
नयन नशीले गाल गुलाबी,
पहात रहावे रूप तुझे अन्
मद्य न पिता व्हावे शराबी
थरथरल्या ओठांवर तुझिया
फूल गुलाबाचे ठेवावे,
अन् उचलावे अलगद आणिक
हळूच त्याला मग चुंबावे
कशी करू मी स्तुती तुझी
मी कधी अप्सरा पाहिली नाही,
पाहतो जेव्हा स्वप्नी अप्सरा
तुजविन दुसरी दिसतच नाही
सौंदर्याची खाण तू प्रिये
तुझी आस लागे ह्या जीवाला,
आशिक झालो तुझा आता मी
दे तू दुजोरा माझ्या प्रेमाला
✒ K.Satish
बालपण सरले अन् तरूणपण आले
बहर आली जीवनात जग बदलून गेले
जोश वाहे अंगी मज भीती नाही कसली
नकळत एक सुंदरी माझ्या मनामधे घुसली
रूप तिचे पाहण्याला व्याकुळ होतो असा
पावसाची वाट पाहत चातक बसतो जसा
कोमल ती काया तिची तेजस्वी कांती
पेटवती ह्रदयातील प्रेमाच्या वाती
भिजलेल्या मातीचा सुगंध दरवळतो
वार्यामध्ये श्वास तिचा जेव्हा विरघळतो
नशीली अदा तिची झिंग येते पाहून
वाजवते ठोके माझ्या ह्रदयात जाऊन
ओढ तिची लागली माझ्या ह्रदयाला
आसुसती नयन माझे तिला पाहण्याला
रोज वाटे मजला तिला सांगू एकदाचे
तिच्यासाठी असलेले भाव अंतरीचे
वाटे मजला भीती ती रूसणार तर नाही
क्षणामधे प्रेम माझे फसणार तर नाही
हिमतीने एकेदिवशी केला तिचा सामना
लिहून दिल्या तिला माझ्या मनातील भावना
वाट पहात होतो मी तिच्या होकाराची
सत्वपरीक्षाच होती माझ्या प्रेमाची
काही क्षण शांतपणे विचार तिने केला
अन् तिरप्या नजरेचा कटाक्ष मला दिला
नजरेतून भाव तिने सांगितले सारे
हर्षाने आले अंगावर शहारे
घालमेल मनातील संपली एकदाची
कदर तिने केली होती माझ्या प्रेमाची
स्वप्न झाले पूर्ण अन् तृप्त झाले मन
चोहीकडे दाटून आले प्रितीचे घन
अशी सुरू जाहली माझी प्रेमकहाणी
भेटली मजला माझ्या प्रितीची राणी...
✒ K. Satish
कळले नाही मला हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने क्षण जागे झाले....