Showing posts with label निसर्ग ( Nature ). Show all posts
Showing posts with label निसर्ग ( Nature ). Show all posts

Friday, October 29, 2021

सूर्य

किती झाकला तो सूर्य

तरी तेज ना लपावे,

तेजातूनी मग त्याच्या

काळोख दूर व्हावे 


भीती किती ती वाटे

अंधारमय जगाची,

भय दूर सारण्याला

हवी साथ त्या रवीची 


सौंदर्य या धरेचे

आहे विलोभनीय,

पण ते दिसावयाला

हवाय आम्हा सूर्य 


किरणे त्या भास्कराची

जगवी असंख्य जीवं,

करी अवनीचे तो रक्षण

दिनकर त्याचे नावं

✒ K. Satish




Saturday, July 24, 2021

प्रलयंकारी पाऊस

पाऊस आला बरसत गेला

मृत्यू घेऊनी आला,

पाहूनी त्याचे तांडव मानव

पुरता हतबल झाला


काय करावे काही कळेना

पैसा असूनी अन्न मिळेना,

आयुष्याची गाडी अडली

काही केल्या पुढे पळेना


वाट पाहूनी होते सगळे

आतुरतेने ज्याची,

झाली अचानक सगळ्यांवरती

अवकृपा हो त्याची


वयोवृद्ध अन् छोटी बालके

पशु पक्षी अन् नर नारी,

दया न केली कुणावरीही

नेले मृत्यूच्या दारी


जीव मुठीत घेऊनी जो तो

करू लागला त्याची विनवणी,

पाहिजे होता आम्हांस तू पण

आता क्षणात जा तू परतूनी


पाणी म्हणजे जीवन किंतु

जीवन संपवूनी गेला,

नयनांमध्ये न संपणारे

अश्रू देऊनी गेला


प्रलयंकारी पाऊस आला

मानवास खूप शिकवूनी गेला,

जात धर्म अन् पैसा अडका

मानव क्षणात विसरूनी गेला...

✒ K. Satish



Sunday, January 17, 2021

इंद्रायणी

तुम्ही करू नका घाण

आपली इंद्रायणी छान

हिच्या चोहीकडे

संतांचे स्थान


एके काळी होती निर्मळ किती

इंद्रायणी आपली

स्वार्थापोटी माणसाच्या तिची

काय दशा झाली


दुर्गंधी रसायन,

सांडपाणी केरकचरा

यांचा का हो केला इतका

इंद्रायणीवरती मारा


संतांच्या भूमीत

वारकर्‍यांचा हो मान

त्यांना मिळत नाही आता

इंद्रायणीमध्ये स्नान


आता अखेरची घटका

मोजत आहे इंद्रायणी

तिला वाचवण्याचा ध्यास

तुम्ही घ्या हो तुमच्या मनी


सगळे मिळूनच आपण आता

निर्धार करूया

श्रमदानाने हो आपण तिला

निर्मळ करूया...!!!

✒ K. Satish





Tuesday, December 1, 2020

लढा हा जीवनाचा

आलेख जीवनाचा, भरीस होता आला

पण दृष्ट लागली अन्, हा कोरोना हो आला


हळूहळू जगाची, दाबीत गेला नस हा

श्वास मानवाचा, कंठामध्येच आला


आले होते सुख हे, आता कुठे नशीबी

अनेकांची स्वप्ने, हा चिरडूनी हो गेला


खूप गाजावाजा झाला, लाॅकडाऊनही केला

तरी ना संपला हा, अन् वाढतंच गेला


पुरते झाले हतबल, हातावरीचे पोटं

कित्येकांचे जीवन, हा संपवूनी गेला


आता आस आहे, साऱ्यांना त्या लशीची

येऊ घातलेल्या, लशीचा बोलबाला


श्वासाची गरिबाच्या, किंमत ही शून्य आहे

धडा हा खूप मोठा, या कोरोनाने दिला


माणूस बदलत आहे, सृष्टी बिघडत आहे

सुंदर या निसर्गाचा, किती र्‍हास की हो झाला


थोडक्यात आता, तुम्हास सांगतो मी

माणूसं झाला खोटा, अन् पैसा मोठा झाला


द्वार विनाशाचे, आता खुलले आहे

लढा हा जीवनाचा, लढण्याचा काळ आला


आहे जिवंत आशा, लढा हा जिंकण्याची

मिळूनी सारे आपण, हरवू या संकटाला

✒ K. Satish



Tuesday, August 18, 2020

संगोपन निसर्गाचे

खळखळ वाहे पाणी झर्‍याचे
पाहूनी मन प्रफुल्लित होई,
शांत ठिकाणी काठावरती
हर्षाने मन बहरूनी जाई

तगमग तगमग होते जीवाची
जेव्हा होते मन हे अस्थिर,
अद्भुत हाच निसर्ग मनाला
क्षणार्धात करूनी टाके स्थिर

जिकडे तिकडे गजबज गजबज
गडगड गडगड खडखड खडखड,
जीव होतसे व्याकूळ इतका
शोधी शांतता करूनी धडपड

आधुनिक या जगात आता
आहे थोडा निसर्ग शिल्लक,
ऊठ माणसा सांभाळ तयाला
तूच आता हो त्याचा पालक

मुलापरी जीव लाव तू त्याला
तोही करेल सांभाळ तुझाही,
पालनपोषण कर त्याचे तू
   फुलव तू चोहीकडे वनराई...

✒ K. Satish

 

Wednesday, July 29, 2020

पहाट

पहाट झाली चैतन्याचे
क्षण हे झाले सुरू,
ध्यानधारणा योगा करूनी
मन प्रफुल्लित करू

मंद मंद तो वारा वाहे
चोहीकडे पक्ष्यांची किलबिल,
पहाट असते सुखदायी किती
नसते मनात कसली चिलबिल

कोणी करती मंत्रोच्चारण
कोणी सुंदर फुले वाहती,
पूजाअर्चा करूनी कोणी
परमात्म्याला समीप पाहती

निसर्ग सुंदर भासतो जेव्हा
पहाट होते पृथ्वीतलावर,
नवउर्जेची उधळण होते
दमलेल्या मानव देहावर

पृथ्वीचे सौंदर्य ते लाघवी
निसर्गात सामावले आहे,
परंतु, त्याची खरी अनुभूती
पहाटेच्या त्या क्षणात आहे

                   ✒ K. Satish

Tuesday, July 21, 2020

श्रेष्ठत्व निसर्गाचे

निसर्ग पाहतो आहे परीक्षा
क्षणाक्षणाला मनुष्याची,
श्वासागणिक सुरू ती आहे
धडपड आता जगण्याची

जीवनचक्र बदलून गेले
सारे अगदी हतबल झाले,
ऐटीत फिरणारे मानव ते
नियम अटींमध्ये जखडून गेले

सवयच नव्हती मानवास ती
अशा अकल्पित जगण्याची,
परंतु आता वेळ ही आली
जीवन रीत  बदलण्याची

संकट पहिले संपत नाही
तोवर दुसरे समोर येती,
सर्वश्रेष्ठ निसर्गच आहे
हे सर्वांना सांगूनी जाती

या सर्वातून धडा तो घ्यावा
मनुष्यप्राणी शहाणा व्हावा,
बदलूनी जीवनशैली जपावा
निसर्गाचा हा अमूल्य ठेवा
✒ K. Satish



Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts