Showing posts with label देशभक्तीपर ( Patriotic ). Show all posts
Showing posts with label देशभक्तीपर ( Patriotic ). Show all posts

Monday, August 14, 2023

कळलाच नाही देशा स्वातंत्र्याचा अर्थ

बलिदान त्यांचे सांगा

का जावू लागे व्यर्थ,

कळलाच नाही देशा

स्वातंत्र्याचा अर्थ


ते योद्धे स्वातंत्र्याचे

लढले देशासाठी,

त्यांनी प्राण वाहिले आपुले

या मातीसाठी


दिनरात केली त्यांनी

प्रयत्नांची शर्थ,

कळलाच नाही देशा

स्वातंत्र्याचा अर्थ


स्वतंत्र झालो आम्ही

ब्रिटिशांच्या गुलामीतून,

लोकशाही नांदू लागली

मग राज्यघटनेतून


राजनेते झाले भ्रष्ट

त्यांनी केला हो अनर्थ,

कळलाच नाही देशा

स्वातंत्र्याचा अर्थ


राजकीय भक्त झाले

काही अंधभक्त झाले,

नेत्यांच्या स्वार्थासाठी

भेदभाव वाढविले


लोभी राजकारण्यांनी

ते बलिदान केले व्यर्थ,

कळलाच नाही देशा

स्वातंत्र्याचा अर्थ

✒ K. SATISH





Monday, February 20, 2023

अविरत लढा

महान देश माझा

कुणी पोखरित आहे,

उघड्या नयनांनी हे

सारे पहात आहे


होते दुःख भयंकर

रागाने होतो लालं,

षंढासम तरीही

मी पहातच आहे


वाटे करावे बंड

या भ्रष्ट व्यवस्थेशी,

पण वाट पहा थोडी

मना सांगत आहे


किती काळं लोटला हा

तरी ना हे बदलले,

स्वातंत्र्य मिळूनही

सगळे गुलाम आहे


टप्पा जीवनाचा

अंतिम आला आहे,

लढा न्यायासाठी

अविरत द्यायचा आहे


हा लढा खूप मोठा

नाही दोन घडीचा,

भावी पिढीस मजला

प्रेरित करायचे आहे

✒ K. Satish





Sunday, August 14, 2022

भारत देश

भारत आमचा देश आहे

आमचा जीव की प्राण आहे,

या देशाने दिले आम्हा

सुंदर असे संविधान आहे


भाषा निराळ्या, प्रांत निराळे

धर्म निराळे, पेहराव निराळे,

परंतु, आम्ही एकजुटीने

विणले देशभक्तीचे जाळे


शान वाढली या देशाची

सोन्याच्या त्या खाणीने,

शूरांच्या तलवारीने अन्

विद्वानांच्या ज्ञानाने


आमचा प्रत्येक श्वास हा देश

आयुष्याचा ध्यास हा देश,

सुंदर लोकशाहीने नटलेला

जगात एकच भारत देश

जगात एकच भारत देश

जगात एकच भारत देश...!!!

✒ K.Satish




Wednesday, March 30, 2022

अन्यायाशी लढण्यासाठी

गुलामगिरी मज नाही मंजूर
स्वाभिमानाला जपायचे,
अन्यायाशी लढण्यासाठी
सदा सज्ज मज रहायचे

सोशिक बनूनी जर का मी ही
सोसत राहिलो क्षणोक्षणी,
घोडदौड मग अन्यायाची
 रोखू शकेल कसे कुणी ?

न्याय, हक्क अन् समतेसाठी
क्षणाक्षणाला घडायचे,
अन्यायाशी लढण्यासाठी
सदा सज्ज मज रहायचे

स्वातंत्र्य मी देतो मिळवूनी
तुुम्ही रक्त द्या तुमचे मला,
नेताजींनी उभारली सेना
शत्रूचा मोडिला कणा

अन्यायाला गाडण्यासाठी
असंख्य नेताजी घडवायचे,
अन्यायाशी लढण्यासाठी
सदा सज्ज मज रहायचे

त्याग आणि बलिदानाविना
क्रांती घडणे अशक्य आहे,
आणि क्रांती घडली नाही
तर मग गुलामी अटळच आहे

त्याग आणि बलिदानाचे
बीज मनामध्ये रूजवायचे,
अन्यायाशी लढण्यासाठी
सदा सज्ज मज रहायचे
✒ K. Satish


Tuesday, March 15, 2022

नवे क्रांतीपर्व

क्रांतीची ती मशाल पुन्हा

पेटवण्याची आलीया वेळ,

दुष्टजनांचा सुरूच आहे

गरीबांना छळण्याचा खेळ


अन्यायाची परिसीमा ही

ब्रिटिशांहूनही वाईट हाल,

पारतंत्र्य संपले कसे बरे

आजही आहे जे होते काल


तेव्हा होते परकीय आता

स्वकीयच छळती जनतेला,

म्हणूनच आता लढा हा अवघड

होऊनी बसला क्रांतीला


निस्वार्थी, लढवय्ये आणिक

स्वाभिमान आहे ज्यांच्या उरी,

नव्या दमाचे क्रांतीकारक

या शत्रूंवर मात करी


निमूटपणाने अन्यायाला

सोसणे आता सोडूनी द्या,

नव्या क्रांतीच्या पर्वामध्ये

    नव्या दमाने सामिल व्हा...!!!

✒ K. Satish




Friday, April 30, 2021

कामगार देशाची शान

आर्थिक योद्धे देशाचे आम्ही

देशाची हो शान,

उद्योगाचा पाया आम्ही

उद्योगाचा मान


क्षेत्र असो मग कोणतेही आम्ही

भीत नाही हो कष्टाला,

अर्थशास्त्राचा कणा आम्ही

संकटात तारतो देशाला


घरघर घरघर यंत्र चालवीत

चक्र फिरवतो प्रगतीचे,

कामे करतो सर्वतर्‍हेचे

कष्टाचे नि बुद्धीचे


संकटकाळी कोरोनाच्या

जगणे होते अवघड हो,

भय होते जीवाचे तरीही

ना टाळले कामाला हो


प्रगतीपथी नेण्या देशाला

करू आम्ही जीवाचे रान,

कामगार देशाची संपत्ती

देश आमचा जीव की प्राण

✒ K. Satish






Tuesday, February 16, 2021

एकजुटीची नवी दिशा

मनात माझ्या संघर्षाची

लाट उसळली आता,

एकजुटीची नवी दिशा मी

देईल जाता जाता


दुर्बल सोसती अन्यायाचे

येथे निरंतर घावं,

पैसा, ताकद, सत्तेवाल्यांचा

हो वाढला भावं


अक्कलशून्यांनाही सलाम

लागे करावा आता,

एकजुटीची नवी दिशा मी

देईल जाता जाता


घावावरती घाव सोसूनी

मन झाले हो कठोरं,

पित्त खवळते पाहूनी

लोकांचे मन ते निष्ठुरं


लढा देऊनी अन्यायाला

संपवायचे आता

एकजुटीची नवी दिशा मी

देईल जाता जाता


निमूटपणाने हुकूमशाहीला

शरण कधी ना जावे,

स्वार्थ साधूनी स्वतःचा

इतरांना कधी ना छळावे


अन्यायाला ना घाबरता

समोर जावे आता,

एकजुटीची नवी दिशा मी

देईल जाता जाता


प्रामाणिक राहूनी

समाजात नीट वागावे,

शब्द दिला इतरांना तर

त्याला हो नीट जागावे


ओळखूनी फितुरांना

करावे शहाणे जाता जाता

एकजुटीची नवी दिशा मी

देईल जाता जाता


मनात माझ्या............

✒ K. Satish





Sunday, February 14, 2021

उपकार सैनिकांचे

मरताना पण हसतो

तो देशाचा सैनिक असतो,

देशासाठी आपुल्या

तो अविरतपणे लढत असतो


तारूण्याचे क्षण तो

स्वतःसाठी जगत नाही,

तरूणाईची उमेद सगळी

सदैव देशासाठी वाही


जीव अडकला त्याचा

आपुल्या कुटुंबामध्ये जरी,

डोळ्यांत तेल घालून तो

असंख्य कुटुंबांचे रक्षण करी


ऊन, वारा, पाऊस, शत्रू

यांचे त्याला भय नसते,

देशासाठी लढण्याची

अदम्य जिद्द त्याच्यामध्ये असते


अतिरेक्यांचा हल्ला होतो

हाच मृत्यूला सामोरा जातो,

शत्रूंचा त्या खात्मा करूनी

आपल्या देशाची लाज राखतो


छोट्यांचा आधारस्तंभ अन्

आई वडिलांची आशा तो,

वाट पाहणार्‍या पत्नीच्या

ओल्या नयनांची भाषा तो


प्राण पणाला लावून ज्याने

आपणाला जीवदान दिले,

थोर असे उपकारच त्याने

आपणा सर्वांवर केले


कृतघ्न होऊन जर का आपण

विसरून गेलो उपकारांना,

किती यातना होतील सांगा

त्या असंख्य हुतात्म्यांना


स्वार्थ सोडूनी आपण सगळे

कृतज्ञतेची कास धरू,

एक होऊनी आपण त्यांच्या

भवितव्यासाठी कार्य करू


छोट्या छोट्या मदतीने मग

कुटुंब त्यांचे सुखी करू,

उदात्त अशा कार्याने करूया

मानवतेचे पर्व सुरू...

✒ K. Satish



Monday, January 25, 2021

संविधान

आमच्या देशाची शान

आमचे संविधान महान,

सार्‍या ग्रंथाहूनी श्रेष्ठ आम्हा

हा ग्रंथ महान


वेशभूषा, प्रांत, भाषा

विविधता इथे किती,

तरीही एकसंघ होऊनी

इथे सर्व नांदती


सर्वांना एकरूप

बनवले या ग्रंथाने,

जरीही असले भिन्न सगळे

जाती आणि पंथाने


स्वातंत्र्य लिहिण्याचे

स्वातंत्र्य बोलण्याचे,

स्वातंत्र्य हसण्याचे

मुक्तपणे जगण्याचे


भिन्न भिन्न ग्रंथ इथे

तरीही देश एक हा,

कारण हा ग्रंथ जपतो

सार्‍यांच्या भावना


स्त्रियांना हक्क देई

पीडितांना न्याय देई,

रंजल्या गांजलेल्यांच्या

हाताला काम देई


दुष्टांना शासन इथे

हक्कांसाठी भाषण इथे,

गरीबांना राशन इथे

कारण संविधान इथे


भाग्यवान आहोत आम्ही

या पृथ्वीतलावरी,

या महान ग्रंथाचे

राज्य या देशावरी


हित यात जनतेचे

राज्य इथे जनतेचे,

शिवरायांच्या मनातील

स्वराज्य इथे समतेचे


यामुळेच इथे आता

नाही कोणीही गुलाम,

करूनी वंदन तयाला

करूया सगळे सलाम...!!!

✒ K. Satish




Friday, August 14, 2020

स्वातंत्र्य ?

स्वतंत्र भारतात वावरताना
भूतकाळाचा विसर नसावा,
सर्वजणांच्या नसानसांमध्ये
देशाभिमानाचा संचार असावा

व्यापार करता करता ब्रिटीशांनी
या देशाची कमजोरी हेरली,
मग फुटीचे राजकारण करूनी
गुलामगिरीची बीजे पेरली

गुलामगिरीचे जगणे म्हणजे
देह असून प्राणच नसणे,
जगण्याचा अधिकार आपुला
दुसर्‍याच्या हाती देऊन बसणे

असल्या जगण्याला त्रासून
देशभक्त मग पेटून उठले,
सर्वतोपरी लढा देऊनी
सगळे स्वातंत्र्यासाठी झटले

कित्येकांच्या बलिदानाने
रक्तरंजित क्रांतीने,
स्वातंत्र्य मिळवून दिले आम्हाला
त्यांच्या त्या देशभक्तीने

इतक्या खडतर परिस्थितीतून
मिळाले स्वातंत्र्याचे सुख,
परंतु त्यासोबत देशाने
अनुभवले फाळणीचे दुःख

भारतीय संविधानाने
लोकशाहीची बीजे पेरली,
देशभरातील जनता सारी
आनंदाने न्हाऊन गेली

स्वतंत्र भारताची सत्ता
आपल्याच लोकांच्या हाती आली,
भ्रष्ट अन् स्वार्थी नेत्यांमुळे
जनता पुन्हा गुलामगिरीमध्ये गेली

धर्माच्या नावाखाली यांनी
पाडली सर्व जनतेमध्ये फूट,
पुन्हा एकदा सुरू जाहली
स्वकीयांकडून देशाची लूट

आपल्या प्राणांची आहुती देऊन
ज्यांनी नमविले ब्रिटीशांना,
असले स्वातंत्र्य हवे होते का
    त्या देशभक्त हुतात्म्यांना...?

✒ K. Satish

 

Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts