Showing posts with label क्रांतीकारी ( Revolutionary ). Show all posts
Showing posts with label क्रांतीकारी ( Revolutionary ). Show all posts

Monday, February 20, 2023

अविरत लढा

महान देश माझा

कुणी पोखरित आहे,

उघड्या नयनांनी हे

सारे पहात आहे


होते दुःख भयंकर

रागाने होतो लालं,

षंढासम तरीही

मी पहातच आहे


वाटे करावे बंड

या भ्रष्ट व्यवस्थेशी,

पण वाट पहा थोडी

मना सांगत आहे


किती काळं लोटला हा

तरी ना हे बदलले,

स्वातंत्र्य मिळूनही

सगळे गुलाम आहे


टप्पा जीवनाचा

अंतिम आला आहे,

लढा न्यायासाठी

अविरत द्यायचा आहे


हा लढा खूप मोठा

नाही दोन घडीचा,

भावी पिढीस मजला

प्रेरित करायचे आहे

✒ K. Satish





Tuesday, January 17, 2023

स्वाभिमानी जगणे

अन्यायाला शरण न जावे

अन्यायाप्रती पेटून उठावे,

न्याय मिळो अथवा न मिळो

हक्कासाठी लढत रहावे 


हुजरेगिरी करूनी मिळाली

भीक जरी अनमोल किती,

त्याहून अगणित आनंद देते

स्वाभिमानाची महती 


त्रास नको पण सुख तर हवे

असे कसे होईल बरे,

आगीत तापल्यानंतरच

सोने घडते हेच खरे 


स्वार्थपूर्ण लाचारीचे जीवन

जगणे आता सोडून द्या,

मरण्याआधी स्वाभिमानाने

जगण्याचा तुम्ही आनंद घ्या

✒ K. Satish




Tuesday, December 27, 2022

भयाण वास्तव

खर्‍या खोट्याचा मांडून बाजार

धर्मांधतेचा पसरविला आजार,

सारे नेते झाले बघा मालदार

बेरोजगारीनं पोरं झाली बेजार 


कष्टकरी घाम इथं गाळतो

त्याला लुटून नेता उजळतो,

क्षणाक्षणाला त्यांना तो छळतो

कष्टकऱ्याचा आत्मा इथं जळतो 


खोटं बोल पण रेटूनं बोल

सगळीकडे चाललाय मोठा झोल,

स्वातंत्र्य झालेय मातीमोल

क्रांतिकारकांचा संपलाय रोल 


सगळीकडे पैशाचा बोलबाला

सत्तेच्या धुंदीत नेता बघा न्हाला,

गुलाम समजतो हा जनतेला

हाच जनसेवक हे विसरून गेला 


अज्ञानी, गावगुंड नेते झाले

विद्वानांना गुलाम त्यांनी केले,

भ्रष्टाचाराचे साम्राज्य पुढे नेले

स्वतंत्र देशाचे वाटोळे केले 


यावर अंकुश कुणी ठेवायचा

तुम्हा-आम्हालाच निर्णय हा घ्यायचा,

शिक्षण, आरोग्य, रोजगारीच्या

विषयावरतीच सदैव भर द्यायचा 


भूलथापांना उडवूनी लावायचे

माणुसकीला प्राधान्य द्यायचे,

भ्रष्टाचारी, गावगुंड नेत्यांना

एकजुटीने अस्मान दावायचे

✒ K. Satish




Monday, December 12, 2022

धार लेखणीच्या शाईची

लेखणीच्या शाईची धार

करी अन्यायावर चौफेर वार

महापुरूषांच्या सन्मानासाठी

होती मावळे जीवावर उदार 


ही परंपरा आहे महाराष्ट्राची

आहे अस्मिता भारत देशाची

थोडीतरी जाणीव ठेवावी

महापुरूषांच्या उपकाराची 


सर नखाची त्या महापुरूषांच्या

नाही तुम्हा आम्हा सामान्यांना

कुणी अक्कल पाजाळू नयेच

हा इशारा आहे सर्वांना 


गर्व कसला या नश्वर देहाला

उतारही असतो जुलमी सत्तेला

भान हे साऱ्यांनी जरूर ठेवावे

लगाम घालावा बेताल जिव्हेला

✒ K. Satish





Wednesday, April 20, 2022

एक जाहलो आम्ही

एक जाहलो आम्ही आता

नाही कुणाची भीती,

चालतो मार्गाने सत्याच्या

निर्मळ आमची नीती


विचार ठेवूनी उच्च प्रतीचे

प्रगतीची धरतो वाटं,

उगाच छेडूनी आम्हाला

तुम्ही लावू नका हो नाटं


कळते आम्हा प्रेमाची भाषा

दावू नका तुम्ही उगाच धाशा,

पडेल पाऊल उलटे तुमचे

ठरेल कारणी तुमच्या नाशा


होतो गेलो विखुरले आम्ही

घेतला होता तुम्ही फायदा,

आता एकीच्या जोरावर

उखडू हुकूमशाहीचा कायदा


पाडू नका आता फूट हो तुम्ही

कावा तुमचा आहे समजला,

सदैव राहू एकच आता

मार्ग एकीचा आम्हा उमजला

✒ K. Satish



Thursday, March 31, 2022

लेखणी असावी अशी

देशाला हवी आहे
सत्याची कास धरणारी लेखणी,
जिच्या सडेतोड लिखाणाने
ती दिसेल खूपच देखणी

लेखणीला कधीच नसतो
जात, धर्म, पंथ
अन् क्रांतिकारी विचार मांडणे
कधीही होवू नये संथ

लेखणी असावी निर्भीड
असत्याचा बुरखा फाडणारी,
पीडितांचे प्रश्न मांडणारी अन्
अन्यायाविरूद्ध लढणारी

प्रस्थापितांची, बाहुबलींची
लेखणी नसावी गुलाम,
कार्य करावे तिने असे की,
सर्वांनी करावा तिला सलाम...!!!
✒ K. Satish





Wednesday, March 30, 2022

अन्यायाशी लढण्यासाठी

गुलामगिरी मज नाही मंजूर
स्वाभिमानाला जपायचे,
अन्यायाशी लढण्यासाठी
सदा सज्ज मज रहायचे

सोशिक बनूनी जर का मी ही
सोसत राहिलो क्षणोक्षणी,
घोडदौड मग अन्यायाची
 रोखू शकेल कसे कुणी ?

न्याय, हक्क अन् समतेसाठी
क्षणाक्षणाला घडायचे,
अन्यायाशी लढण्यासाठी
सदा सज्ज मज रहायचे

स्वातंत्र्य मी देतो मिळवूनी
तुुम्ही रक्त द्या तुमचे मला,
नेताजींनी उभारली सेना
शत्रूचा मोडिला कणा

अन्यायाला गाडण्यासाठी
असंख्य नेताजी घडवायचे,
अन्यायाशी लढण्यासाठी
सदा सज्ज मज रहायचे

त्याग आणि बलिदानाविना
क्रांती घडणे अशक्य आहे,
आणि क्रांती घडली नाही
तर मग गुलामी अटळच आहे

त्याग आणि बलिदानाचे
बीज मनामध्ये रूजवायचे,
अन्यायाशी लढण्यासाठी
सदा सज्ज मज रहायचे
✒ K. Satish


Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts