Showing posts with label अर्थबोध ( Meaningful ). Show all posts
Showing posts with label अर्थबोध ( Meaningful ). Show all posts

Thursday, February 2, 2023

हसत जगावे जीवनात या

चमचम तारे जीवनातले

क्षण हे गेले विरून,

हसत जगावे जीवनात या

जगू नये हो झुरून 


जीवन ऐसी नाव की ज्याचा

प्रवास ऐसा होवे,

आनंद-दुःख, प्रेम-मत्सर अन्

यामध्ये हेवेदावे 


क्षण हे पुढे पुढे जगताना

मन ठेवावे तरूण,

हसत जगावे जीवनात या

जगू नये हो झुरून 


वार्धक्य हे कुणा न चुकले

सर्वांना ते येई,

काळानुसार जीवनातले

अनुभव देऊनी जाई 


कवटाळूनी आनंदी क्षणांना

दुःख टाकावे पुरून,

हसत जगावे जीवनात या

जगू नये हो झुरून 


बालपणीचे, तारूण्याचे

आणिक वार्धक्याचे,

जीवनातले टप्पे तीन हे

भिन्न भिन्न वळणाचे 


वार्धक्यानंतरही जगावे

मन प्रफुल्लित करून,

हसत जगावे जीवनात या

जगू नये हो झुरून

✒ K.Satish




Tuesday, January 17, 2023

लाटणे

पोळपाटावर फिरते ऐटीत

रोजचा त्याचा सराव,

कणकेला त्या आकार देई

लाटणे त्याचे नाव 


अन्नासाठी धडपडतो तो

मनुष्य रात्रंदिनी,

बनविती जेवण त्यांच्यासाठी

रोज साऱ्या गृहिणी 


भाजीसंगे पोळी शोभते

शोभत नाही पाव,

कणकेला त्या आकार देई

लाटणे त्याचे नाव 


धार नसे कसलीही याला

तरीही शस्त्र हे मोलाचे,

धाक दावण्या हे आवडते

हत्यार साऱ्या स्त्रियांचे 


परवान्याची गरज नसे

नसे खोल हो याचा घाव,

कणकेला त्या आकार देई

लाटणे त्याचे नाव 


किस्से याचे खूप मजेशीर

विविधतेने नटलेले,

दारूड्याचे डोके पाहिले

याच्यामुळेच फुटलेले 


काळजी घ्यावी जेव्हा हे असती

पत्नीच्या हातातं राव,

कणकेला त्या आकार देई

लाटणे त्याचे नाव 


महती याची मोठी आणिक

कार्यही याचे मोठेच हो,

शान असे स्वयंपाकघराची

जागा व्यापते छोटीच हो 


अस्तित्व याचे घराघरामध्ये

स्वयंपाकघर याचे गाव,

कणकेला त्या आकार देई

लाटणे त्याचे नाव

✒ K. Satish




Sunday, November 20, 2022

असे आम्ही गुलाम

हात आमचे दगडाखाली

बोलायची झाली चोरी

आम्ही दिली दुसर्‍याच्या हाती

आमच्या अस्तित्वाची दोरी 


नको ते उपकार घेतले

झोळी आम्ही भरून घेतली

आज तीच लाचारी आमच्या

सार्‍या हक्कांवरती बेतली 


गुलामीचे जीवन जगतो

अब्रू घालवली सारी

आम्ही दिली दुसर्‍याच्या हाती

आमच्या अस्तित्वाची दोरी 


पश्चात्ताप होतोय आम्हाला

पण सांगू कसे कुणाला

या सार्‍याची खंत माहित

आहे आमच्या मनाला 


स्वार्थ साधला असला तरी

मनाला येईना उभारी

आम्ही दिली दुसर्‍याच्या हाती

आमच्या अस्तित्वाची दोरी 


वाटते आम्हालाही बोलावे

मत आमचे व्यक्त करावे

झाल्या चुकांची मागून माफी

सहकाऱ्यांचे पाय धरावे 


पण चुगल्या करून बरबटलो

विश्वास न कोणी करी

आम्ही दिली दुसर्‍याच्या हाती

आमच्या अस्तित्वाची दोरी 


स्वार्थ साधला दोन घडीचा

भोग मात्र आयुष्यभराचे

माणूस असलो आम्ही तरीही

जगतो जीवन जनावराचे 


सत्यासाठी लढणाऱ्यांचे

लढे उध्वस्त करी

आम्ही दिली दुसर्‍याच्या हाती

आमच्या अस्तित्वाची दोरी 


आमच्यासारखे असंख्य लाचार

आहेत अवतीभवती

म्हणूनच तर सामान्यजनांच्या

जीवनाची झाली माती 


आदेशाचे गुलाम आम्ही

पाप्यांची करी चाकरी

आम्ही दिली दुसर्‍याच्या हाती

आमच्या अस्तित्वाची दोरी

✒ K. Satish




Friday, November 18, 2022

कपाट

तुमच्या सेवेसाठी अविरत

ओझे घेऊनी उभा मी ताठ

गरज तुमची भागवतो मी

नाव माझे आहे कपाट


रंग निराळे रूप निराळे

वापर माझा निरनिराळा

कधी असे मी स्वच्छ नि सुंदर

कधी असे मजवरी धुराळा


कपडे लत्ते, दागदागिने

प्राॅपर्टीचे पेपर, पैसा

सामावले मजमध्ये सारे

हस्ती नसे मी ऐसा तैसा


कधी मोडकळीला येतो

तरीही अविरत सेवा देतो

गरज माझी संपल्यावरती

अलगद भंगारामध्ये जातो


मनुष्य म्हणजे कपाटच हो

सारे काही सामावूनी घेतो

कार्यभाग तो संपल्यावरती

साऱ्यांनाच नकोसा होतो


अविरत ओझे वाहत जातो

अखेर कधीतरी हतबल होतो

झीज होऊनी या देहाची

या सृष्टीला सोडूनी जातो

✒ K. Satish




Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts