Saturday, November 16, 2024

सरमिसळ

एक एक पदार्थ चावून खावा
आनंद त्याचा अविरत घ्यावा
प्रत्येकाचीच लज्जत भारी
स्वतंत्र चवीचा आस्वाद घ्यावा

गोड, तिखट, आंबट, कडू
महत्त्व प्रत्येक चवीचे
प्रत्येकाचा आस्वाद घेऊनी
हट्ट पुरवायचे जिभेचे

परंतु हट्ट पुरवतानाही
नियम घालून द्यायलाच हवे
जिभेला आनंदी करता करता
पोटाला पचेल तसेच खावे

कधीतरी होते गफलत आणिक
सरमिसळ होते साऱ्यांची
नको ते होते एकत्र अन्
पंचाईत साऱ्याला पचवायची

अन् मग शरीर-स्वास्थ्य बिघडते
जिभेचे चोचले तिलाच नडते
अन्न जे पोटात पचले नाही
हळूहळू ते तिथेच सडते

असेच झालेय राजकारणाचे
कोणी कुठेही पळतो आहे
तत्त्व, निष्ठा अन् लाज सोडूनी
इतर पक्षात विरघळतो आहे

या साऱ्यांची सरमिसळ अन्
वाट लागली देशाची,
यांनी भरली घरे स्वतःची
दयनीय अवस्था जनतेची

जनतेच्या पैशाने जगती
हे तर सेवक जनतेचे
अफाट कर वाढवूनीदेखील
धिंडवडे अर्थव्यवस्थेचे

यांची सरमिसळ अन् भेसळ
लोकशाहीला पचली नाही
सत्तेची अधाशी भूक ही
जनतेलापण रूचली नाही

जनतेनेही शहाणे व्हावे
आपले सेवक यांना मानावे
नेत्यांना वठणीवर आणूनी
लोकशाहीला प्रबळ करावे
✒ K. Satish



1 comment:

  1. सध्याची परिस्थिती थोडी फारशी अशीच आहे

    ReplyDelete

Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts