Thursday, July 25, 2024

फसवा अर्थसंकल्प

खिसेकापूने खिसा कापला
तरीही नाही कळले मला
देतो म्हणूनी काढून घेणे
असे ही मोठी अजब कला

समस्यांच्या जाळ्यामध्ये
अडकवूनी ठेवली जनता
गांगरला हो करदाता
हसला तो कण्हता कण्हता

आस लावूनी बसला होता
पडेल पदरी काही
पदरी पडले की गमावले
कुणास कळले नाही

ज्यांनी आखले गणित सारे
बेरीज वजाबाकीचे
फसवूनी टाकले गणित त्यांनी
देशाच्या प्रगतीचे

खेळ मांडला गरिबीचा
आघात महागाईचा
हळूहळू हे करती बंद
मार्गही तो बचतीचा

कमवा तुम्ही अन् द्या आम्हाला
भूक यांची मोठी
नेहमी देती जनतेला हो
आश्वासने हे खोटी

तुटपुंजे ते ज्ञान हो यांचे
दुबळी जिद्द सचोटी
झोळी यांची नेहमी फाटकी
नियत यांची खोटी

आयत्या बिळावर नागोबासम
बसले जनतेच्या पैशावर
वाटचाल यांनी चालवली
अधोगतीच्या रस्त्यावर

आतातरी व्हा शहाणे अन् पहा
याकडे गांभीर्याने
अन्यथा अविरत गावे लागेल
असेच हे रडगाणे
असेच हे रडगाणे
K. Satish



Sunday, July 14, 2024

झुंज संकटांशी

दुःखाचा तो डोंगर मोठा
माझ्या नशिबी आला होता,
घावावरती घाव घालूनी
मला चिरडूनी गेला होता

जिद्द, चिकाटी, जबाबदारी
या सार्‍यांच्या मदतीने,
नवी उभारी घेण्या उठलो
मीही नव्या उमेदीने

मान देऊनी परिस्थितीला
पुढे पुढे मी चालत गेलो,
जेव्हा मिळाली अवचित संधी
सोने तिचे मी करू लागलो

अडचणी हे तर सत्य जगीचे
नाही कुणाला चुकलेले,
पाहिले हतबल किती जीव मी
प्राणाला हो मुकलेले

आयुष्याचा रस्ता कठीण
सुकर त्याला हो करायचे,
अंतिम रेषा गाठण्याआधी
संकटांना पुरून उरायचे

हार मानूनी जगणे हे तर
मृत्यूसमान असते हो,
पृथ्वीतलावर त्या व्यक्तीला
मुळीच किंमत नसते हो
✒ K. Satish



Tuesday, July 9, 2024

उर्मी न संपणारी

वाट पाहे कोणी
माझ्या संपण्याची,
तळपूनी मी पुन्हा
उभा समोरी आहे

व्यस्त होतो थोडा
व्यापात दुसर्‍या मी,
वाटले कुणाला
मी संपलोच आहे

आहे अजून बाकी
ते ॠण जीवनाचे,
असा कसा बरे मी
हार मानणार आहे

झगडणार आहे
मी दुष्ट प्रवृत्तींशी,
आत्मविश्वास मनी
माझ्या अजूनी आहे

थोडा मागे सरलो
दोन पावले मी,
कारण झेप मोठी
मजला घ्यायची आहे

डाव दोन घडीचा
खेळायचा असा की,
वाटावे नियतीला
बंदा सच्चा आहे

असेच संपण्यापरी
इतिहास घडवण्याची,
अदम्य जिद्द मोठी
माझ्या मनात आहे
✒ K. Satish




Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts