Friday, October 20, 2023

स्त्री शक्तीचा जागर

जननी साऱ्या जीवांची ती अन्

महिमा तिचा हो अपरंपार

तिच्याविना ना अर्थ जगाला

तिच करी जीवन साकार


स्वराज्याची बीजे रोवली

घडवले थोर अशा राजाला

शूरवीर त्या माता जिजाऊ

मुलासम प्रेम दिले हो प्रजेला


स्वाभिमान त्यागाची मूर्ती

किती गावे तिचे गुणगान

माता रमाईच्याच कृपेने

मिळू शकले आम्हा संविधान


देशातील पहिल्या महिला शिक्षिका

महिलांना हो साक्षर केले

सावित्रीबाईंचे कार्य महान

मानवतेसाठी प्राण वाहिले


मृत्यूलाही मात दिली अन्

दिली दुःखितांना हो माया

माय ती बनली अनाथांची हो

सिंधुताई ममतेची छाया


ब्रिटिशांविरुद्ध रणशिंग फुंकले

पेटवल्या क्रांतीच्या वाती

चिरकाल हो टिकूनी राहील

राणी लक्ष्मीबाईंची ख्याती


ध्येय धोरणी धाडसी होत्या

देशाच्या त्या पंतप्रधान

इंदिरा गांधींना हो मिळाला

' सहस्त्राब्दीच्या महिला ' सन्मान


मूर्ती लहान पण कीर्ति मोठी

अगाध होती जिद्द सचोटी

अंतराळातील वीरांगना ती

कल्पना चावला भारत की बेटी


उपचाराविना मूल गमावूनी

डाॅक्टर बनण्याचा ध्यास घेतला

चूल अन् मूल ही प्रथा बदलूनी

आनंदीबाईंनी आदर्श घडविला


प्रतिकूल परिस्थितीशी लढली

मुष्टियुद्ध रिंगणात उतरली

पदकांवरती पदके जिंकूनी

मेरीकोमने कीर्ति घडवली


क्षमता आहे स्त्रियांमध्येही

बळकट त्यांचे हात करा

बुरसटलेले विचार सोडा

स्त्रीशक्तीचा जागर करा

✒ K. Satish


Thursday, October 19, 2023

कामगार नेता - एक अभिशाप

कामगार नेता आयटीआय पास

पण रूबाब मोठ्या थाटाचा,

चोरून खातो हिस्सा तो बघा

कामगारांच्या वाट्याचा 


कर्तव्याची जाण विसरूनी

दगा देतसे कंपनीला,

काम नेतसे कंपनीबाहेर

नफा यांच्या एजन्सीला 


मालक असती देवमाणूस

त्यांना भेटाया हे जाती,

कामगार जो घाम गाळतो

त्यांची भेट घडू न देती 


कामगारांच्या जीवावरी हो

रान मोकळे फिरण्या यांना,

काम करा म्हटले यांना तर

कमीपणा वाटे का यांना ? 


विसरूनी गेले कष्टाची भाषा

सदा यांना मलईची आशा,

नेतेगिरी करूनी केली हो

कामगारांची घोर निराशा 


अर्धी कंपनी लुटली यांनी

पळवला कामगारांचा हिस्सा,

चाळीस चोरांहूनही मोठा

आहे या नेत्यांचा किस्सा

✒ K. Satish






Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts