Tuesday, December 27, 2022

भयाण वास्तव

खर्‍या खोट्याचा मांडून बाजार

धर्मांधतेचा पसरविला आजार,

सारे नेते झाले बघा मालदार

बेरोजगारीनं पोरं झाली बेजार 


कष्टकरी घाम इथं गाळतो

त्याला लुटून नेता उजळतो,

क्षणाक्षणाला त्यांना तो छळतो

कष्टकऱ्याचा आत्मा इथं जळतो 


खोटं बोल पण रेटूनं बोल

सगळीकडे चाललाय मोठा झोल,

स्वातंत्र्य झालेय मातीमोल

क्रांतिकारकांचा संपलाय रोल 


सगळीकडे पैशाचा बोलबाला

सत्तेच्या धुंदीत नेता बघा न्हाला,

गुलाम समजतो हा जनतेला

हाच जनसेवक हे विसरून गेला 


अज्ञानी, गावगुंड नेते झाले

विद्वानांना गुलाम त्यांनी केले,

भ्रष्टाचाराचे साम्राज्य पुढे नेले

स्वतंत्र देशाचे वाटोळे केले 


यावर अंकुश कुणी ठेवायचा

तुम्हा-आम्हालाच निर्णय हा घ्यायचा,

शिक्षण, आरोग्य, रोजगारीच्या

विषयावरतीच सदैव भर द्यायचा 


भूलथापांना उडवूनी लावायचे

माणुसकीला प्राधान्य द्यायचे,

भ्रष्टाचारी, गावगुंड नेत्यांना

एकजुटीने अस्मान दावायचे

✒ K. Satish




Sunday, December 18, 2022

जगावे असे की...

दिस किती सरले
अन् दिस किती उरले
खरेच तुम्ही जगले
की मनातच झुरले
 
वाटते जपावा
आवडीचा तो छंद
पैसे कमावताना
आत्मभान झाले मंद
 
वाटे बागडावे
निसर्गाच्या कुशीतं
कधीच जुळले नाही
पण वेळेचे गणितं


ज्यांच्यासाठी इतकी
धडपड करीत होता
त्या कुटुंबासाठी
कधी वेळ देत नव्हता


पैसा अमाप आहे
आता रे तुजपाशी
पण मुले झाली मोठी
झुंज तुझी जगण्याशी


पैशापेक्षा श्रेष्ठ
शरीर, बुद्धी, वेळं
उमगले तर बसेलं
या जीवनाचा मेळं


एकच मानव जन्म
अन् नश्वरं शरीरं
जगावे मनमुरादं
अवघाची हा संसारं

✒ K. Satish






Monday, December 12, 2022

धार लेखणीच्या शाईची

लेखणीच्या शाईची धार

करी अन्यायावर चौफेर वार

महापुरूषांच्या सन्मानासाठी

होती मावळे जीवावर उदार 


ही परंपरा आहे महाराष्ट्राची

आहे अस्मिता भारत देशाची

थोडीतरी जाणीव ठेवावी

महापुरूषांच्या उपकाराची 


सर नखाची त्या महापुरूषांच्या

नाही तुम्हा आम्हा सामान्यांना

कुणी अक्कल पाजाळू नयेच

हा इशारा आहे सर्वांना 


गर्व कसला या नश्वर देहाला

उतारही असतो जुलमी सत्तेला

भान हे साऱ्यांनी जरूर ठेवावे

लगाम घालावा बेताल जिव्हेला

✒ K. Satish





Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts