Wednesday, April 20, 2022

एक जाहलो आम्ही

एक जाहलो आम्ही आता

नाही कुणाची भीती,

चालतो मार्गाने सत्याच्या

निर्मळ आमची नीती


विचार ठेवूनी उच्च प्रतीचे

प्रगतीची धरतो वाटं,

उगाच छेडूनी आम्हाला

तुम्ही लावू नका हो नाटं


कळते आम्हा प्रेमाची भाषा

दावू नका तुम्ही उगाच धाशा,

पडेल पाऊल उलटे तुमचे

ठरेल कारणी तुमच्या नाशा


होतो गेलो विखुरले आम्ही

घेतला होता तुम्ही फायदा,

आता एकीच्या जोरावर

उखडू हुकूमशाहीचा कायदा


पाडू नका आता फूट हो तुम्ही

कावा तुमचा आहे समजला,

सदैव राहू एकच आता

मार्ग एकीचा आम्हा उमजला

✒ K. Satish



Saturday, April 2, 2022

मार्ग गवसला आनंदाचा

अंधारलेल्या काळोखामध्ये
शोधत होतो वाट
विचारांनी थैमान घातले
होते मनात दाट

भरकटलेल्या आयुष्याला
दिशाच सापडत नव्हती
नैराश्याचे ढग हे
दाटले होते अवती भवती

किरण आशेचा दिसतंच नव्हता
दूर दूरवर मजला
काय करावे नि काय करू नये
समजत नव्हते मजला

क्षणभर मनात वाटून गेले
संपले आता सगळे
बुझूच शकणार नाहीत आता
माझ्या आयुष्याची ठिगळे

विचार करता करता अचानक
समोर दिसली प्रेतं
त्यांचं उरलं नव्हतं आता या
पृथ्वीतलाशी नातं

लगेच माझ्या मनामध्ये
एक विचार येऊन गेला
अरे कधीतरी मातीमध्ये
जायचे आहे या देहाला

का व्हावे बरे दुःखी कष्टी
का बाळगावा मोह
मिळाले आयुष्य एकदाच अन्
मिळाला एकदाच देह

सुंदर आहे जीवन त्याला
सुंदर रितीने जगायचे
इथून पुढे प्रत्येक दुःखाला
सुखाच्या चष्म्यातून बघायचे...!!!
✒ K. Satish


Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts