Friday, October 29, 2021

सूर्य

किती झाकला तो सूर्य

तरी तेज ना लपावे,

तेजातूनी मग त्याच्या

काळोख दूर व्हावे 


भीती किती ती वाटे

अंधारमय जगाची,

भय दूर सारण्याला

हवी साथ त्या रवीची 


सौंदर्य या धरेचे

आहे विलोभनीय,

पण ते दिसावयाला

हवाय आम्हा सूर्य 


किरणे त्या भास्कराची

जगवी असंख्य जीवं,

करी अवनीचे तो रक्षण

दिनकर त्याचे नावं

✒ K. Satish




Wednesday, October 20, 2021

विश्वासघात

आर्थिक लाभाच्या मोहापायी

विश्वास कधी गमावू नका,

विश्वास टाकणार्‍याला तुम्ही

अगदीच फाडून खाऊ नका


विश्वासाने दिलेला असतो

त्याने तुम्हास मदतीचा हात,

ठेवा जाणीव उपकाराची

करू नका तुम्ही त्याचा घात


स्वार्थ तुमचा दोन घडीचा

नीच बनण्या भाग पाडतो,

उरल्या सुरल्या माणुसकीला

पुरता जमिनीमध्ये गाडतो


कर्तृत्व स्वतःच्या अंगी बाळगा

दुसर्‍याच्या जीवावर खाऊ नका,

फसवणूक तुम्ही कराल एकदा

मिळणार नाही दुसरा मोका

✒ K. Satish



Friday, October 8, 2021

मुर्दाड त्या मनांना

मुर्दाड त्या मनांना

चैतन्य येत नाही,

ते मृत आहे आता

त्यांच्यातं प्राण नाही 


गुलामीचे विषाणू

अंगी भिनले इतके,

की हक्क मागण्याची

तळमळ कुणातं नाही 


स्वार्थी झाले सगळे

स्वतःपुरतेच जगणे,

शोषितांचे अश्रू

पुसण्या उसंत नाही 


अन्याय होतो जेव्हा

स्वतःवरी मग तेव्हा,

शोधीतं क्रांतिकारक

फिरती दिशा ते दाही 


लढणार नाही आम्ही

पण लाभ हवा आम्हा,

असेच आहो आम्ही

आम्हास लाज नाही 


क्रांतिकारी जन्मो

पण घरी दुसर्‍याच्या,

घाव सोसण्याची

ताकद आम्हातं नाही

✒ K. Satish





Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts