Saturday, July 24, 2021

प्रलयंकारी पाऊस

पाऊस आला बरसत गेला

मृत्यू घेऊनी आला,

पाहूनी त्याचे तांडव मानव

पुरता हतबल झाला


काय करावे काही कळेना

पैसा असूनी अन्न मिळेना,

आयुष्याची गाडी अडली

काही केल्या पुढे पळेना


वाट पाहूनी होते सगळे

आतुरतेने ज्याची,

झाली अचानक सगळ्यांवरती

अवकृपा हो त्याची


वयोवृद्ध अन् छोटी बालके

पशु पक्षी अन् नर नारी,

दया न केली कुणावरीही

नेले मृत्यूच्या दारी


जीव मुठीत घेऊनी जो तो

करू लागला त्याची विनवणी,

पाहिजे होता आम्हांस तू पण

आता क्षणात जा तू परतूनी


पाणी म्हणजे जीवन किंतु

जीवन संपवूनी गेला,

नयनांमध्ये न संपणारे

अश्रू देऊनी गेला


प्रलयंकारी पाऊस आला

मानवास खूप शिकवूनी गेला,

जात धर्म अन् पैसा अडका

मानव क्षणात विसरूनी गेला...

✒ K. Satish



No comments:

Post a Comment

Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts