एकेदिवशी रात्रीच्या समयी
फेरफटका मारीत असता,
नजरेस पडला चोहीकडे
खोदून ठेवलेला तो रस्ता
पहाता पहाता खिन्न मनाने
विचार माझ्या मनात आला,
आत्ताच बांधलेल्या रस्त्याचा
लगेचच असा अंत का केला ?
रस्ते बांधणे आणि खोदणे
प्रशासनाचा खेळ निराळा,
कर्तव्यशून्य अधिकार्यांना
हव्या फक्त पैशांच्या माळा
कंत्राटदार अन् नेत्यांची ही
खेळी आता जुनी जाहली,
स्वतंत्र भारताची दुर्दशा
आपल्याच राजकारण्यांनी केली
अन्यायाशी लढणार्यांचे
या देशातील प्रमाण घटले,
त्यामुळेच भ्रष्टाचार्यांनी
आजवर या देशाला लुटले
आपल्या पैशाचा हा अपव्यय
उघड्या डोळ्यांनी पाहूनी,
जगत राहते जनता सारी
रक्ताचे आसू पिऊनी
एकजुटीची ताकद आता
दाखवण्याची गरज भासते,
षंढासारखे जीवन जगणे
हे तर मरण्यासमान असते...
✒ K. Satish
No comments:
Post a Comment