Tuesday, June 29, 2021

गरज एकजुटीची

एकेदिवशी रात्रीच्या समयी

फेरफटका मारीत असता,

नजरेस पडला चोहीकडे

खोदून ठेवलेला तो रस्ता


पहाता पहाता खिन्न मनाने

विचार माझ्या मनात आला,

आत्ताच बांधलेल्या रस्त्याचा

लगेचच असा अंत का केला ?


रस्ते बांधणे आणि खोदणे

प्रशासनाचा खेळ निराळा,

कर्तव्यशून्य अधिकार्‍यांना

हव्या फक्त पैशांच्या माळा


कंत्राटदार अन् नेत्यांची ही

खेळी आता जुनी जाहली,

स्वतंत्र भारताची दुर्दशा

आपल्याच राजकारण्यांनी केली


अन्यायाशी लढणार्‍यांचे

या देशातील प्रमाण घटले,

त्यामुळेच भ्रष्टाचार्‍यांनी

आजवर या देशाला लुटले


आपल्या पैशाचा हा अपव्यय

उघड्या डोळ्यांनी पाहूनी,

जगत राहते जनता सारी

रक्ताचे आसू पिऊनी


एकजुटीची ताकद आता

दाखवण्याची गरज भासते,

षंढासारखे जीवन जगणे

हे तर मरण्यासमान असते...

✒ K. Satish






Monday, June 21, 2021

संगीत

जीवनाचा ध्यास संगीत

या देहातील श्वास संगीत

पृथ्वीतलावर जाणवणार्‍या

स्वर्गसुखाचा आभास संगीत


भुकेल्याचा घास संगीत

तहानलेल्याची प्यास संगीत

भगवंताच्या भक्तांसाठी 

ईश्वराचा सहवास संगीत


मराठमोळ्या मावळ्यांकरिता

छत्रपती शिवराय संगीत

मायेसाठी आसुसलेल्यांची

प्रेमळ अशी माय संगीत


सीमेवरील जवानांसाठी

देशाचा अभिमान संगीत

मातृभूमीच्या रक्षणाकरिता

शहीद होण्याचा सन्मान संगीत


लावण्यवतीला लाजवेल अशी

सौंदर्याची खाण संगीत

पृथ्वीतलावर आनंदाने

जगण्यासाठी वरदान संगीत


पृथ्वीला जर देह मानले

तर तिच्यातील प्राण संगीत

उच्च नीचचा भेद मिटवी

जगी श्रेष्ठ असे महान संगीत


जाता जाता एकच म्हणणे

आमुचा प्रत्येक श्वास संगीत

उरलेल्या ह्या आयुष्याला

उरला एकच ध्यास संगीत

✒ K. Satish



Sunday, June 20, 2021

बाप

बाप नावाचे विशाल वृक्ष

आयुष्यात असावे,

त्याच्या छायेत जीवन आपुले

आनंदाने वसावे 


रागीट, तापट, हुकूमशहा

तो वाटे कधी सर्वांना,

परंतु त्यामागील प्रेमभाव

ना दिसे इतरांना 


ढाल होऊनी रक्षण करतो

कुटुंबासाठी अविरत लढतो,

अश्रू कुणाला न दाखवता

एकटाच गपचूप तो रडतो 


मोठ्या मोठ्या वादळामध्ये

ना डगमगता लढतो,

योग्य दिशा दावूनी आपुल्या

मुलांचे भविष्य घडवतो 


मुलीसाठी तर काळीज त्याचे

तुटते क्षणाक्षणाला,

बाप या शब्दाविना किंचितही

अर्थ नसे जीवनाला

✒ K. Satish



Saturday, June 19, 2021

जीवनगाणे

गाणे जीवनाचे

ऐटीत गात आहे,

सूर बिघडले तरीही

आनंद घेत आहे 


बेसूर झाले गाणे

म्हणून का रडावे,

सूर पुन्हा जुळवूनी

हर्षाने गुणगुणावे 


चुकलेल्या त्या सूरांना

नीट ओळखूनी घ्यावे,

पुन्हा ना चुकावे

हे सूत्र मग जपावे 


मैफिल रंगवूनी

हे गीत गुणगुणावे,

असे व्हावे गाणे

जग मंत्रमुग्ध व्हावे 


सूर चुकले म्हणून का

मधेच संपवावे ?,

हे गीत खूप अमूल्य

संपूर्ण गुणगुणावे

✒ K. Satish



Thursday, June 17, 2021

काळाची आली सत्ता

काय बघा परिस्थिती आली

सारी दुनिया हतबल झाली,

मृत्यूने थैमान मांडले

काळाची हो सत्ता आली


आज जो दिसला, हसला बोलला

उद्या अचानक संपून गेला,

काय चालले कळेचना मज

जीव का इतका स्वस्त हो झाला


वयाची ती मर्यादा संपली

तरूणाई मृत्यूने जखडली,

आधारस्तंभ होती जी मंडळी

आधार सोडूनी निघून हो गेली


आयुष्य झिजवूनी कमावलेले

सत्ता, प्रसिद्धी, पैसा अडका,

उपभोगाविन इथेच राहिले

झिजणार्‍यांना असे हा धक्का


नाही भरवसा या जीवाचा

क्षण आनंदी उपभोगावे,

प्रफुल्लित ठेवूनी मनाला

मरण्याआधी जगूनी घ्यावे

✒ K. Satish



Wednesday, June 16, 2021

दुनियेची रीत

अश्रूंच्या थारोळ्यामध्ये

पडलो होतो जेव्हा,

विव्हळत होतो, तडफत होतो

कुणी न होते तेव्हा


सावरून मग स्वतःला मी

घेतली ऊंच भरारी,

कौतुक माझे करावयाला

आली दुनिया सारी


आयुष्यातील एक सत्य मी

जवळून पाहिले आहे,

माणसांची दुहेरी भूमिका

मी अनुभवली आहे


ऐश्वर्याच्या शिखरावर

असताना होते चिकटून,

अपयशाच्या खाईत पडल्यावर

वागले सगळे फटकून


ओळखून मग रीत जगाची

बदलले मी स्वतःला,

मार्ग बदलला जगण्याचा

अन् खचू न दिले मनाला


सुप्त गुण मग स्वतःमधले

मला कळू लागले,

यशप्राप्तीचे नवे सूत्र

आपोआप जुळू लागले


परिस्थितीने मला शिकवली

या दुनियेची रीत,

म्हणून आता संकटांना मी

कधीच नाही भीत...

✒ K. Satish



Monday, June 14, 2021

जवळचेच कातील

आघात सोसूनी मी

झालो किती कठोरं,

हळव्या मृदू मनाचा

बदलूनी गेला नूरं


पाहून व्यथा कुणाची

मना आघात होई,

मन पिळवटूनी जाई

डोळ्यातं पाणी येई


जवळचे जे म्हणवती

त्यांनीच केला घातं,

साधूनी स्वार्थ सगळा

घेतला धुऊनी हातं


आघात खूप मोठा

तो माझ्यासाठी होता,

प्रत्येक तो लुटणारा

माझ्याच निकटचा होता


होता कोणी मित्र

कुणी नात्यातील होता,

दूरचे कुणीच नव्हते

जवळचे ते कातीलं


दगाबाज तुम्हा

समजत नाहीत लवकर,

कीड असते चिटकूनी

झाडालाच निरंतर


स्वार्थी जगातं आता

सर्वांनी शहाणे व्हावे,

वेळीच पोखरणार्‍या

कीडीला ओळखावे

✒ K. Satish



Friday, June 11, 2021

अपेक्षांचे ओझे

अपेक्षांचे ओझे

कोणाकोणाचे वाहू मी,

धावणाऱ्या जगासंगे

असाच किती धावू मी


आरंभ बिंदू जन्म असे अन्

अंतिम बिंदू मृत्यू असे हो,

या बिंदूंना जोडणारा

आयुष्याचा खेळ असे हो


अंतिम बिंदू गाठण्यापूर्वी

खर्‍या सुखाला शोधील जो,

आभासी सुखास हरवूनी

या खेळामध्ये जिंकेल तो


परंतु जाळे भावनांचे

त्यातच ओझे अपेक्षांचे,

पूर्तता त्यांची करता करता

गणित संपते आयुष्याचे


मोहमायेची दुनिया सारी

मानव पडला अडकूनी यातच,

सुख समजूनी जे जे मिळविले

दुःख खरे होते हो त्यातच


आई वडील बंधू भगिनी

नातेवाईक, मित्रमंडळी,

पत्नी मुलांसह समाजदेखील

आस बाळगून असती सगळी


सुखी सर्वांना करता करता

खरे सुख विसरूनीच गेलो,

अंतिम बिंदू गाठण्यापूर्वी

आभासी जगामध्ये हरवूनी गेलो

✒ K. Satish





Tuesday, June 8, 2021

निधर्मी मैत्री

आठवा कधी तुम्ही मैत्री करताना

जात धर्म पाहिला आहे,

परधर्माच्या मित्रांसाठी

नक्कीच स्वधर्मीयांना भांडला आहे


अतूट होती मैत्री तुमची

मनापासून, हृदयापासून,

क्षणालाही करमत नव्हते

तुम्हाला एकमेकांपासून


जात वेगळी, धर्म वेगळे

पक्ष वेगळे, रंग वेगळे,

तरीही जगत होता रे तुम्ही

जिवलग मित्र बनून सगळे


राज्यकर्त्यांना बघवत नाही

मैत्री तुमची अशी अतूट,

पोळी भाजत नाही त्यांची

पाहूनी तुमची एकजूट


कावा त्यांचा ओळखा तुम्ही

बनू नका धर्मांध असे रे,

सत्तेसाठी धडपड त्यांची

तुमचे कुणाला भान नसे रे


सद्सद्विवेक बुद्धी जागवून

विचार स्वतःच करा नेटका,

एकसंघ राहूनी सगळे

द्या दुष्ट शक्तींना झटका


जात पंथ अन् धर्म विसरूनी

भारतीय तुम्ही बना आता रे,

माणुसकीला धर्म मानूनी

सुंदर बनवा या जगता रे...

✒ K. Satish



Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts