Sunday, May 30, 2021

प्राण गुंतला तुझ्यात गं

का जाने कुणास ठाऊक

तुझे नि माझे नाते कसले,

भेटीसाठी तुझिया माझे

मन हे आतुर होऊन बसले


तुझ्याविना मी काहीच नाही

जीव गुंतला तुझ्यात माझा,

आस मनाला तुझी सदैव

ध्यास जीवाला लागला तुझा


हरवून गेलो तुझ्यात मी गं

भान मला ना आता कसले,

मीच न उरलो माझा आता

प्राण हे माझे तुझ्यात वसले


जाऊ नकोस दूर तू आता

मन हे माझे मोडू नको,

आयुष्याच्या वाटेवरती

एकटे मला तू सोडू नको


तुझ्याविना जग शून्य हे भासे

जिथे पहावे तूच तू दिसे,

तुझ्याविना जगणे हे आता

माझ्यासाठी व्यर्थच असे...

✒ K. Satish



Wednesday, May 26, 2021

वंदन तथागतांना

मानवता अन् विज्ञानाचा

थोर असा संदेश तयांचा,

मार्ग दाविला अहिंसेचा

उद्धार केला सकलजनांचा


मूळ शोधले दुःखाचे अन्

ते निवारण्याचा मार्ग शोधला,

रक्तपात अन् संहाराचा

दुष्ट पापी विचार भेदला


तथागतांच्या शिकवणीची

आपण सगळे कास धरूया,

बुद्ध पौर्णिमेला सगळे

नमूनी तयांना वंदन करूया...!!!


बुद्धं शरणं गच्छामि

धम्मं शरणं गच्छामि

संघं शरणं गच्छामि


सर्व भारतीयांना

वैशाख बुद्धपौर्णिमेच्या

      मनःपूर्वक शुभेच्छा...!!!

✒ K. Satish



Friday, May 14, 2021

अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज

शूरवीर अन् महाप्रतापी

छत्रपतींचे छावे,

अद्वितीय असे कार्य की

सार्‍यांनी नतमस्तक व्हावे


स्वराज्याचे द्वितीय छत्रपती

शिवरायांची सावली ते,

प्रजाजनांची आशा आणिक

स्वराज्याची भाषा ते


मैत्री त्यांची अमूल्य होती

ज्ञानही होते त्यांचे अपार,

स्वराज्यद्रोह आणि फितुरी

करणार्‍यांना केले ठार


लाज राखिली स्त्रियांची अन्

मान राखिला धर्माचा,

मृत्यू आला तो ही लाजला

असा थाट महाराजांचा

असा थाट महाराजांचा...

✒ K. Satish



Thursday, May 13, 2021

खोटी प्रतिष्ठा

वाढदिवस श्रीमंताच्या मुलाचा

धुमधडाक्यात झाला साजरा,

लाखो रुपयांच्या सजावटीकडे

उपस्थितांच्या लागल्या नजरा


आमदार आले, खासदार आले

सगेसोयरे झाडून आले,

नेत्रदीपक रोषणाईने

डोळे त्यांचे दिपून गेले


मनोरंजनाचा खजिनादेखील

सर्वांसाठी तयार होता,

संगीत, नृत्य, ऑर्केस्ट्रासोबत

फटाक्यांचा धुमधडाका होता


ठिकठिकाणी अवतरली होती

जत्रा खाद्यपदार्थांची,

काय खावे अन् काय न खावे

पंचाईत झाली लोकांची


ज्याच्यासाठी सोहळा होता

तो हिरा कुठे दिसतच नव्हता,

एक वर्षाचा राजकुमार तो

केव्हाच झोपी गेला होता


खरे म्हणजे अशा सोहळ्यांचे

महत्त्व अनेकांना माहीत नसते,

निमित्त यांचे साधून त्यांना

स्वतःची प्रतिष्ठा मिरवायची असते


खोट्या अशा प्रतिष्ठेपायी

नाहक पैशांचा अपव्यय होतो,

याच पैशाची चणचण भासून

गरीब शेतकरी यमसदनाला जातो


समाजासाठी या पैशाचा

सुयोग्य वापर करून पहावे,

दीनदुबळ्यांचे अश्रू पुसूनी

आनंदामध्ये न्हावून जावे


खोट्या प्रतिष्ठेला महत्व द्यावे

की, महत्व द्यावे सत्कार्याला,

एकदा तरी विचारून पहावे

स्वतःच स्वतःच्या मनाला

✒ K. Satish



Saturday, May 8, 2021

आई

माया आणि ममता आई

प्रेम आणि करूणा आई,

स्नेहभाव तो तिच्यासारखा

कोणाच्याच हृदयामध्ये नाही 


चिमटा काढून पोटाला ती

घास भरवते पिल्लांना,

दुःख मागते स्वतःसाठी अन्

सुखी बनवते इतरांना 


भलेभले ते होते अगदी

नतमस्तक तिच्या चरणी,

काळीज तुटते मनातूनी पण

ओरडे मुलांना वरकरणी 


महिमा तिचा या जगी हो मोठा

किती गावे तिचे गुणगान,

त्यागाची अतिसुंदर मूर्ती

आई या सृष्टीची हो शान

✒ K. Satish



Thursday, May 6, 2021

राजर्षी छत्रपती शाहूमहाराज

🙏🏻 विनम्र अभिवादन 🙏🏻

वसा घेतला समाजसुधारणेचा

ठाव घेतला बहुजनांच्या मनाचा

प्रतिकार केला दुष्ट जातीभेदाचा

अभिमान वाटतो महान आमच्या राजाचा


शिक्षणाचे महत्त्व जाणूनी त्यांनी

बहुजनांना शिक्षित केले

अज्ञानाच्या काळ्या छायेतूनी

ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेले


शेतीला दिले सर्वोच्च प्राधान्य

दीनदुबळ्यांची दूर केली लाचारी

रयतेचे शोभतात राजे खरे

बहुजनांचे खरे कैवारी...!!!


तळागाळातील लोकांसाठी लढणाऱ्या,

बहुजनांना ज्ञानाचा अधिकार मिळवून देणाऱ्या,

अंधश्रद्धा आणि जातीभेदावर कडाडून प्रहार करणार्‍या,

शेतीला सुजलाम् - सुफलाम् करण्यासाठी विविध उपाययोजना राबवणार्‍या

अशा या रयतेच्या महान राजाला

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन...!!!

✒ K. Satish



Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts