Tuesday, April 27, 2021

घुमावा मंगलमयी सूर

तरणंबांड गडी आम्ही मर्द हो

लग्नासाठी आतुर,

पण कोरोनानं केलंया आमचं

जगणं थातूरमातूर


तिशी गाठत आलो आम्ही

तरूणपणानं जाताना,

कंटाळा आला जगण्याचा

रोजगार सापडताना


कशीबशी आता लागली नोकरी

गवसला जगण्याचा सूर

पण कोरोनानं केलंया आमचं

जगणं थातूरमातूर


किती आशेनं ठरवलं होतं

लग्न आता हो करायचं,

सुशील मुलगी पाहून तिला

घरी हो आपल्या आणायचं


विचार करतच होतो अचानक

मध्येच आला हा असूर,

अन् कोरोनानं केलंया आमचं

जगणं थातूरमातूर


आज उद्या संपेल हे संकट

जग आशेवर जगतंय,

गोंधळात या पण हो आमचं

वय हे पुढं सरकतंय


नोकरी अन् छोकरीसाठी आम्ही

होतोय हो चिंतातूर,

अन् कोरोनानं केलंया आमचं

जगणं थातूरमातूर


करतो प्रार्थना संपावी

लवकर हो ही महामारी,

त्रासून गेलीय या महामारीला

हो जनता सारी


बिनलग्नाचे मरण न येवो

लागली जीवाला हुरहूर,

संकट संपूनी जीवनात या

घुमावा मंगलमयी सूर

✒ K. Satish



No comments:

Post a Comment

Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts