बालपण सरले अन् तरूणपण आले
बहर आली जीवनात जग बदलून गेले
जोश वाहे अंगी मज भीती नाही कसली
नकळत एक सुंदरी माझ्या मनामधे घुसली
रूप तिचे पाहण्याला व्याकुळ होतो असा
पावसाची वाट पाहत चातक बसतो जसा
कोमल ती काया तिची तेजस्वी कांती
पेटवती ह्रदयातील प्रेमाच्या वाती
भिजलेल्या मातीचा सुगंध दरवळतो
वार्यामध्ये श्वास तिचा जेव्हा विरघळतो
नशीली अदा तिची झिंग येते पाहून
वाजवते ठोके माझ्या ह्रदयात जाऊन
ओढ तिची लागली माझ्या ह्रदयाला
आसुसती नयन माझे तिला पाहण्याला
रोज वाटे मजला तिला सांगू एकदाचे
तिच्यासाठी असलेले भाव अंतरीचे
वाटे मजला भीती ती रूसणार तर नाही
क्षणामधे प्रेम माझे फसणार तर नाही
हिमतीने एकेदिवशी केला तिचा सामना
लिहून दिल्या तिला माझ्या मनातील भावना
वाट पहात होतो मी तिच्या होकाराची
सत्वपरीक्षाच होती माझ्या प्रेमाची
काही क्षण शांतपणे विचार तिने केला
अन् तिरप्या नजरेचा कटाक्ष मला दिला
नजरेतून भाव तिने सांगितले सारे
हर्षाने आले अंगावर शहारे
घालमेल मनातील संपली एकदाची
कदर तिने केली होती माझ्या प्रेमाची
स्वप्न झाले पूर्ण अन् तृप्त झाले मन
चोहीकडे दाटून आले प्रितीचे घन
अशी सुरू जाहली माझी प्रेमकहाणी
भेटली मजला माझ्या प्रितीची राणी...
✒ K. Satish
No comments:
Post a Comment