Monday, November 30, 2020

घेऊ कशी मी भरारी

स्त्री जातीमध्ये जन्म जाहला

बनले अबला नारी

बंध खुलेना माझे सांगा

घेऊ कशी मी भरारी


जन्म घेतल्यावर मी स्त्रीचा

फसवा तो आनंद पाहिला,

बालपणापासूनच मजला

दुय्यम दर्जा मिळत राहिला


होते घरच्यांसाठी मी तर

चुकून जन्मलेले मूल, 

पाहिजे होते त्यांना खरेतर

मुलगा ह्या रूपातील फूल


कपडा-लत्ता, जेवण-शिक्षण

विसंगती खूप त्यामध्ये होती,

मुलगा मुलगी भेदाभेदी

या देहाने अनुभवली होती


अद्वितीय असे काहीतरी मी

करण्यासाठी धडपड करते,

पण मुलगी असल्याचे ते बंधन

वेळोवेळी मला जखडते


माणूस म्हणून जगणार कधी मी

मिळणार कधी उभारी,

बंध खुलेना माझे सांगा

घेऊ कशी मी भरारी...!!!

✒ K. Satish



Sunday, November 29, 2020

फसवा आनंद

ओठांवरती एक बोल अन्

पोटामध्ये असे निराळे,

अगणित असती जागोजागी

या वृत्तीचे डोमकावळे


स्पष्ट बोलण्या धजवत नाही

जीभ यांची ही बनावटी,

स्वार्थासाठी गोड बोलती

परंतु वृत्ती असे कपटी


इतरांसाठी खणूनी खड्डा

मार्ग प्रगतीचा हे शोधती,

श्रेय हडपती इतरांचे अन्

उदो उदो स्वतःचा करती


अनेक लोकांचे वाटोळे

यांच्या हातून घडते हो,

तरी ना मिळे शांती मनाला

मनी सदा बेचैनी हो


फलश्रुती वाईट कर्मांची या

कधी ना कधी समोर येते,

सुख समजती ज्याला त्यातून

दुःखाचीच अनुभूती होते

✒ K. Satish



Friday, November 27, 2020

असे हे चमचे

चमचे सगळे होऊनी गोळा
वाजवू लागले ढोल,
खोटेपणाने वागणाऱ्यांचा
सुरू जाहला झोल 

लावालाव्या, कारस्थाने
हा तर यांचा खेळ जुना,
हुजरेगिरी करूनी यांनी हो
कामाला लाविला चुना 

कष्टच यांना नको कराया
आळशी साले जन्माचे,
याचे...त्याचे चमचे बनूनी
केले वाटोळे सर्वांचे 

बसून खाण्यासाठी हे तर
पाय चाटती वरिष्ठांचे,
नेत्यांची चापलूसी करती
जगणे यांचे लाचारीचे 

स्वार्थापोटी, ईर्षेपोटी
इतरांचे केले नुकसान,
सहकाऱ्यांची वाट लावण्या
भरती वरिष्ठांचे हो कान 

ज्याची चलती त्याचे चमचे
हे नाही कोणा एकाचे,
नवा गडी मग नवे राज्य हे
सूत्रच यांचे नेहमीचे...
✒ K. Satish



Thursday, November 26, 2020

बनावटी बगळे

कर्तव्य स्वतःचे पार पाडता येईना

पण दुसर्‍यावरती रूबाब मोठा,

बनावटी ही माणसे करती

कार्यस्थळावरी अविरत तोटा


गलेलठ्ठ हा पगार घेती

कार्य परंतु यांचे क्षुल्लक,

अपयश आपुले झाकण्यासाठी

करती कनिष्ठांची हे पिळवणूक


कागद खोटे भरूनी सदैव

करती दिशाभूल वेळोवेळी,

कष्टकऱ्यांचे श्रेय हडपती

वृत्ती यांची कपटी काळी


सत्य नेहमी लपविले जाते

अधोगती संस्थेची होते,

तरीही होते यांची दिवाळी

कष्टकऱ्यांची होळी होते


समजत नाही कधी थांबेल हे

दुष्टचक्र असे बनावटीचे,

न्याय कधी मिळेल सत्याला

होईल का पतन या असत्याचे ?

✒ K. Satish



Monday, November 16, 2020

स्वभाव माझा जळका

दुसर्‍यावरती जळून

झाले मी खाक,

दुसर्‍याच्या प्रगतीवर

मुरडते सारखे नाक


एखाद्याच्या जमिनीला

भाव आलेला पाहून,

लगेच जाते मी तर बाई

दुःखामध्ये न्हावून


कुढत कुढत आयुष्य मी

जगत आहे दररोज,

पडतोय मला पैसा कमी अन्

दुनिया कशी काय करते मौज ?


शेजारणीने कालच आणली

सोन्याची ती मोहनमाळ,

ती तर पाहून पोटात माझ्या

उठू लागलाय भयानक जाळ


गाडी नवीन घेऊन कोणी

आला जर का माझ्यापुढे,

क्षणात ईर्षेने मग माझे

तोंड होऊ लागते वाकडे


मजेत जगताहेत सगळे

त्यांचे चालले आहे ठीक,

सगळे आहेत आनंदी पण

मलाच लागलीय की हो भीक


दुसर्‍यांवरती जळण्यामध्ये

आयुष्य माझे गेले वाया,

मनात माझ्या चिकटून बसलीय

ह्या दुनियेतील मोहमाया


इतरांचे सुख म्हणजे आहे

माझ्यासाठी मोठे दुःख,

त्यांच्यावरती जळणे हा तर

    माझा जन्मसिद्ध हक्क...!!!

K. Satish



Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts