स्वतंत्र भारतात वावरताना
भूतकाळाचा विसर नसावा,
सर्वजणांच्या नसानसांमध्ये
देशाभिमानाचा संचार असावा
व्यापार करता करता ब्रिटीशांनी
या देशाची कमजोरी हेरली,
मग फुटीचे राजकारण करूनी
गुलामगिरीची बीजे पेरली
गुलामगिरीचे जगणे म्हणजे
देह असून प्राणच नसणे,
जगण्याचा अधिकार आपुला
दुसर्याच्या हाती देऊन बसणे
असल्या जगण्याला त्रासून
देशभक्त मग पेटून उठले,
सर्वतोपरी लढा देऊनी
सगळे स्वातंत्र्यासाठी झटले
कित्येकांच्या बलिदानाने
रक्तरंजित क्रांतीने,
स्वातंत्र्य मिळवून दिले आम्हाला
त्यांच्या त्या देशभक्तीने
इतक्या खडतर परिस्थितीतून
मिळाले स्वातंत्र्याचे सुख,
परंतु त्यासोबत देशाने
अनुभवले फाळणीचे दुःख
भारतीय संविधानाने
लोकशाहीची बीजे पेरली,
देशभरातील जनता सारी
आनंदाने न्हाऊन गेली
स्वतंत्र भारताची सत्ता
आपल्याच लोकांच्या हाती आली,
भ्रष्ट अन् स्वार्थी नेत्यांमुळे
जनता पुन्हा गुलामगिरीमध्ये गेली
धर्माच्या नावाखाली यांनी
पाडली सर्व जनतेमध्ये फूट,
पुन्हा एकदा सुरू जाहली
स्वकीयांकडून देशाची लूट
आपल्या प्राणांची आहुती देऊन
ज्यांनी नमविले ब्रिटीशांना,
असले स्वातंत्र्य हवे होते का
त्या देशभक्त हुतात्म्यांना...?
✒ K. Satish
देशभक्तिपर
ReplyDelete🙏🏻🇮🇳
Delete