Saturday, August 22, 2020

काव्यनक्षत्रे

नक्षत्रांचा मळा तो फुलतो
काव्यमंचाच्या स्थानावर,
काव्यांच्या किती सरी बरसती
रसिकांच्या त्या कानावर

सामाजिक, वैचारिक काही
हास्याचे कुणी उडवी तुषार,
प्रेमकाव्य, विद्रोही कोणी
क्रांतीचे ते मांडी विचार

निरनिराळ्या प्रतिभा दिसती
दिसे इथे हरहुन्नरी मन,
भेदभाव ना इथे हो कसला
सर्वांकडे शब्दांचे धन

काव्यांची ही नक्षत्रे हो
समाजात किती मोलाची,
थोड्या शब्दांमधूनी मांडती
भूमिका किती ती खोलाची

मळा असा हा सदासर्वदा
नक्षत्रांचा फुलतच रहावा,
शब्दफुलांची होऊनी उधळण
आसमंत हा बहरत जावा

✒ K. Satish

 

Tuesday, August 18, 2020

संगोपन निसर्गाचे

खळखळ वाहे पाणी झर्‍याचे
पाहूनी मन प्रफुल्लित होई,
शांत ठिकाणी काठावरती
हर्षाने मन बहरूनी जाई

तगमग तगमग होते जीवाची
जेव्हा होते मन हे अस्थिर,
अद्भुत हाच निसर्ग मनाला
क्षणार्धात करूनी टाके स्थिर

जिकडे तिकडे गजबज गजबज
गडगड गडगड खडखड खडखड,
जीव होतसे व्याकूळ इतका
शोधी शांतता करूनी धडपड

आधुनिक या जगात आता
आहे थोडा निसर्ग शिल्लक,
ऊठ माणसा सांभाळ तयाला
तूच आता हो त्याचा पालक

मुलापरी जीव लाव तू त्याला
तोही करेल सांभाळ तुझाही,
पालनपोषण कर त्याचे तू
   फुलव तू चोहीकडे वनराई...

✒ K. Satish

 

Friday, August 14, 2020

स्वातंत्र्य ?

स्वतंत्र भारतात वावरताना
भूतकाळाचा विसर नसावा,
सर्वजणांच्या नसानसांमध्ये
देशाभिमानाचा संचार असावा

व्यापार करता करता ब्रिटीशांनी
या देशाची कमजोरी हेरली,
मग फुटीचे राजकारण करूनी
गुलामगिरीची बीजे पेरली

गुलामगिरीचे जगणे म्हणजे
देह असून प्राणच नसणे,
जगण्याचा अधिकार आपुला
दुसर्‍याच्या हाती देऊन बसणे

असल्या जगण्याला त्रासून
देशभक्त मग पेटून उठले,
सर्वतोपरी लढा देऊनी
सगळे स्वातंत्र्यासाठी झटले

कित्येकांच्या बलिदानाने
रक्तरंजित क्रांतीने,
स्वातंत्र्य मिळवून दिले आम्हाला
त्यांच्या त्या देशभक्तीने

इतक्या खडतर परिस्थितीतून
मिळाले स्वातंत्र्याचे सुख,
परंतु त्यासोबत देशाने
अनुभवले फाळणीचे दुःख

भारतीय संविधानाने
लोकशाहीची बीजे पेरली,
देशभरातील जनता सारी
आनंदाने न्हाऊन गेली

स्वतंत्र भारताची सत्ता
आपल्याच लोकांच्या हाती आली,
भ्रष्ट अन् स्वार्थी नेत्यांमुळे
जनता पुन्हा गुलामगिरीमध्ये गेली

धर्माच्या नावाखाली यांनी
पाडली सर्व जनतेमध्ये फूट,
पुन्हा एकदा सुरू जाहली
स्वकीयांकडून देशाची लूट

आपल्या प्राणांची आहुती देऊन
ज्यांनी नमविले ब्रिटीशांना,
असले स्वातंत्र्य हवे होते का
    त्या देशभक्त हुतात्म्यांना...?

✒ K. Satish

 

Wednesday, August 12, 2020

वाईटातले चांगले

जे स्वप्नातही आले नव्हते ते आता घडत आहे
जीवाचे महत्त्व सार्‍या जगाला कळत आहे,
पैशालाच सर्वस्व मानणार्‍यांना आता
आयुष्याचा खरा अर्थ हळूहळू उमजत आहे

राग, लोभ, द्वेष, मत्सर याकडे लक्ष जाईना
पैशाची हावही आता मनाचा ठाव घेईना,
मोठ्या हौशेनं बांधलेल्या स्वतःच्याच घरात
माणसांचा वेळ आता काही जाईना

पैशासाठी जीव घेणार्‍यांना स्वतःचे मरण दिसले
कपटाने आपल्याच लोकांना लुटणार्‍यांचे गणित फसले,
असत्याच्या मार्गाने जमा केलेली धनदौलत रुसली
अन् चांगल्या चांगल्यांच्या चेहर्‍यावर मृत्यूचे भय दिसले

एवढ्या मोठ्या आपत्तीने सार्‍यांनाच शिकवण दिली
भोगविलास त्यागून जगण्याची हिम्मत दिली,
पैशाने श्रीमंत नसलेलाही वेळेला उपयोगी ठरतो
गोष्ट किती ही मोलाची सार्‍यांनाच पटवून दिली

वाईटामधूनही चांगले घडलेल्याकडे लक्ष द्यावे
मोठेपणाला सोडून सौजन्याने वागत रहावे,
चांगला बदल जो घडला आहे तो असाच अखंड रहावा
अन् पृथ्वीतलावर माणुसकीने सदैव बहरत जावे...

✒ K. Satish

 

Sunday, August 9, 2020

अनुभवांचे धन

खेळता खेळता झालो मोठे
घेऊ लागलो जीवनाचे धडे,
या धड्यांतून शिकता शिकता
उलगडले जीवनाचे कोडे

कोडे अवघड होते हे तर
पूर्वी कधीच माहित नव्हते,
वरवर दिसतसे सरळ परंतु
हे तर वेडेवाकडे होते

एक प्रश्न सोडवल्यानंतर
दुसरा त्वरीत समोर दिसे,
त्याला सोडवले नाही तर
तिसरा समोरच येऊन बसे

प्रश्नामागून प्रश्ने सुटली
पुढची प्रश्ने सोपी होती,
कारण उत्तरे पुढच्यांची
मागच्यांमध्येच दडली होती

कोडे जीवनाचे उलगडताना
झालो आम्ही अनुभवसंपन्न,
पुढच्या पिढीला देण्यासाठी
हेच खरे आमच्याकडील धन

                                            ✒ K. Satish
 

Friday, August 7, 2020

सुट्टी

पूर्वीची ती सुट्टी मजला
आठवते ठायी ठायी,
आता मात्र सुट्टीची ह्या
मजाच घेता येत नाही

सुट्टी होती मज्जा मस्ती
धमाल करण्यासाठी ती,
जीवनातल्या आनंदाची
छान शिदोरी होती ती

वेळेचे ते भान विसरूनी
खेळती सारे आनंदाने,
तन - मन सारे होई प्रफुल्लित
क्षणात होई ताजेतवाने

आता सुट्टी येते कधी अन्
जाते कधी कळतच नाही,
उरलेली कामे करताना
दिवस सारा निघून जाई

सगळीकडे पैशाचे जाळे
ताणतणावाने भरलेले,
आनंदावर मात करूनी
क्षणिक सुखाने मोहरलेले

शर्यत झाली सुरू ही सगळी
जुनी ती मज्जा संपून गेली,
पैसा आला अगणित किंतु
निखळ करमणूक हरवून गेली

                                                   ✒ K. Satish

Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts